पाचोरा : महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सोमवार (ता. १९)पासून नागपूर येथे सुरू होत आहे. या अधिवेशनात जळगाव ते चाळीसगावदरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग ७५३ च्या दुर्दशेचा धुराळा आमदार किशोर पाटील पोचविणार आहेत. (National highway is in dire straits in Dhurala Nagpur session MLA Kishor Patil presented various online questions Jalgaon News)
राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण व्हावे. भडगाव तालुक्यातील नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी, पाचोरा-तारखेडा रस्त्यासाठी रेल्वेलगत जागा मिळावी, रेल्वेपुलासाठी निधी मिळावा, गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करावीत यांसह पाटचाऱ्या, पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, बंधाऱ्यांसाठी संपादित जमिनीचा शेतकऱ्यांना मोबदला, रेशनिंग ठेका, साठवण बंधाऱ्यांसाठी निधी, सफाई कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावीत, यांसारखे अनेक प्रश्न आमदार किशोर पाटील यांनी ऑनलाइन पद्धतीने सादर केले असून, हे प्रश्न चांगलेच गाजणार आहेत व पाचोरा- भडगाव मतदारसंघातील जनतेला खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे.
नव्याने झालेला जळगाव ते चांदवड राष्ट्रीय महामार्ग ७५३ वरील जळगाव ते चाळीसगाव या शंभर किलोमीटर लांबीच्या रस्त्यात १३ ठिकाणी वळणावरील जमीन अधिग्रहित न केल्याने कामे अर्धवट आहेत. रस्त्याच्या दुर्दशेमुळे वाहनचालकांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत असून, अपघात व हानीची झळही नित्याची झाली आहे.
रस्त्याचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करून रस्त्याची होणारी दुर्दशा थांबवावी, यासाठी अनेक निवेदने व आंदोलने करण्यात आली. मात्र, कार्यवाही न झाल्याने आता आमदार किशोर पाटील हा विषय विधानसभा अधिवेशनात चांगलाच गाजविणार आहेत. यासोबतच जून २०१९ मध्ये भडगाव तालुक्यात झालेल्या चक्रीवादळ व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन तीन वर्षे उलटली, तरी न मिळालेली भरपाई मिळावी.
हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...
वीज वितरण कर्मचारी हरीश आदिवाल यांच्या वारस मुलाच्या नोकरी प्रकरणी होत असलेल्या शासकीय आदेशाची पायमल्ली थांबवून वारसास नोकरी द्यावी. भुसावळ ते मनमाडदरम्यान तिसऱ्या रेल्वेमार्गाचे काम सुरू असल्याने पाचोरा ते तारखेडा रस्ता बंद होऊन हजारो ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. पाचोरा-तारखेडा पर्यायी रस्त्यासाठी रेल्वेरुळालगतची जागा मिळावी. रेल्वे ओव्हर ब्रिजसाठी विशेष बाब म्हणून निधी द्यावा. जळगाव जिल्ह्यातील शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करून मिळावीत. कनाशी पाटचारीतून पाथर्डी शिवारात नवीन पाटचारी व पाझर तलावातून पाणी मिळावे.
पाचोरा व भडगाव येथील पोलिस अधिकारी व कर्मचारी निवासस्थानांची दुर्दशा झाली असून, नवीन निवासस्थाने व प्रशासकीय इमारतीच्या बांधकामास मंजुरी व निधी मिळावा. वसाडे, दहिगाव, डोकलखेडा भागातील शेतकऱ्यांची दहिगाव गिरणा बंधाऱ्यासाठी संपादित केलेली जमीन संबंधित शेतकऱ्यांना परत द्यावी. गिरणा कालव्यासाठी खास बाब म्हणून मंजुरी व निधी मिळावा. पाचोरा व भडगावातील शासकीय रेशनिंग दुकानांच्या मालवाहतुकीचा ठेका राज ट्रान्स्पोर्टला दिला आहे तो रद्द करावा व त्याची चौकशी व्हावी. वडगाव नालबंदी प्रस्तावित साठवण तलावास मंजुरी व सहा कोटींचा निधी मिळावा.
राज्यातील पालिकांमध्ये १९९३ पूर्वी लागलेल्या रोजंदारी सफाई कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावे. जळगाव जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत व्यायामासाठी विकास योजनेस वाढीव निधी मिळावा. भडगाव येथील क्रीडासंकुलासाठी निधी प्राप्त व्हावा. पथराड कालवा दुरुस्तीस मंजुरी व निधी मिळावा. सेवेत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना २०२२-२३ मध्ये होणाऱ्या पोलिस भरतीत विशेष आरक्षण द्यावे. राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागातील चालक व वाहक प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांची योग्य ती चाचणी घेऊन त्यांना नोकरीत सामावून घ्यावे, असे विविध प्रश्न आमदार किशोर पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात सादर केले असून, या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी व मागण्या पूर्ण करण्यासाठी भक्कमपणे बाजू मांडणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी अधिवेशनास रवाना होण्यापूर्वी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.