जळगाव : केंद्राच्या योजना राज्यापर्यंत आणि राज्याचा निधी जिल्हा व गावपातळीपर्यंत पोचविण्याचे काम आम्ही करू. तो निधी उपयोगात आणायची किमया सरपंचांनी साधली पाहिजे. पाणीपुरवठामंत्री या नात्याने मी पाणी योजना घेऊन येणाऱ्यांना त्यांची ‘पार्टी’ विचारत नाही आणि विचारणारही नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
सरपंच परिषद, मुंबईच्या वतीने जळगावात आयोजित सरपंच मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यात आदर्श गाव हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या वेळी व्यासपीठावर सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे, खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, आमदार मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील पोपटराव व्हा
गावच्या विकासाची कास धरली तर सरपंचांचा लौकिक वाढेल. केवळ राजकारण न करता ग्रामपंचायत अधिनियमाचा अभ्यास करावा. गावात पाण्याची समस्या दूर केली तरी सरपंच पुढच्या वेळी निवडून येईल. पोपटराव पवार गावचे सरपंच असूनही देशाला माहिती झाले, आपण जिल्ह्यातील पोपटराव व्हावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
अभ्यासू सरपंच व्हा : पवार
सत्काराला उत्तर देताना पोपटराव पवार म्हणाले, की कोणत्याही योजना आली, की त्यावर टीकाटिप्पणी करण्यापेक्षा सर्वानुमते ती योजना गावात कशी यशस्वी होईल, याचा विचार सरपंचांसह सर्वांनीच करावा. विकासाची मानसिकता ही सर्वांत मोठी समस्या आहे. विकासासाठी आर्थिक बाब ही समस्या नसते. श्रमदानाद्वारे अनेक योजना पूर्ण करता येतात. समाज पूर्वीही चांगला होता. समाज आजही चांगला आहे. कामे करताना हेतू चांगला असेल, तर सर्वांचेच सहकार्य मिळते. अभ्यासू सरपंच व्हा. गावाच्या समस्यांची कुंडली करा, त्या सोडवा. गाव व यंत्रणा प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांच्या पाठीशी असते.
सरपंच भवनाला ५० लाख
मेळाव्यात मार्गदर्शन करताना खासदार उन्मेष पाटील व मंगेश चव्हाण यांनी जिल्ह्यात सरपंच भवन उभारण्याचा मानस व्यक्त केला. त्यावर भाष्य करताना गुलाबराव पाटील यांनी सरपंच भवनासाठी जिल्हा नियोजन समितीतून ५० लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.