जळगाव : जून महिन्यातील मृग नक्षत्र, आर्द्रा नक्षतातही समाधानकारक पाऊस (Rain) न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे लहान सिंचन प्रकल्पात पाणीसाठा नाही. मोठ्या प्रकल्पातील साठाही दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे (Water scarcity) संकट आ वासून उभे आहे. पाणी वापरावर निर्बंध घालण्याची वेळ प्रशासनावर पावसाअभावी आली आहे. (No rain in june Fear of water scarcity Jalgaon News)
मृग नक्षत्रात पाऊस झाला, तर शंभर टक्के पेरण्या होऊन उत्पादनही चांगले येते. यंदा मात्र मृग व आद्रा नक्षत्रातही पाउस न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. दमदार पावसाच्या प्रतिक्षेत शेतकऱ्यांचे डोळे पुन्हा आकाशाकडे लागले आहेत. बागायतदार शेतकऱ्यांच्या कपाशीची चांगली उगवण झाली आहे. मात्र, कोरडवाहू शेती असणाऱ्यांना पावसावरच अवलंबून राहावे लागत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात फक्त सरासरी ८८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
५२ टक्के पेरण्या...
काही ठिकाणी अधूनमधून पाऊस सुरू असल्याने आतापर्यंत बागायतीसह कोरडवाहू पिकांच्या ३ लाख ९७ हजार हेक्टरवर अर्थात ५२ टक्के पेरण्या झाल्यायाची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली.
‘वाघूर’मध्ये ६३.५० टक्के साठा
वाघूर धरणात ६३.५० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे धरण परिसरातील गावाना पाणी टंचाईची भिती नाही. हतनूर (ता.भुसावळ) धरणात ४८ टक्के जलसाठा आहे. हा जलसाठा विदर्भात झालेल्या पावसामुळे झालेला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाऊसच नसल्याने धरणात पाणी साठा होवू शकत नसल्याचे धरणावरील अधिकाऱ्यांनी सांगितले. धरणात गाळ अधिक असल्याने जादा पाणी साठविता येत नाही. यामुळे धरणाचे चार दरवाजे १ मिटरने उघडण्यात आले आहे. जिल्ह्यातील इतर मध्यमप्रकल्पात अद्यापही पाणी साठलेले नाहीत.
आतापर्यंत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
तालुका--पाऊस
जळगाव--४६.९
भुसावळ--१०१
यावल--६७.८
रावेर--६४.६
मुक्ताईनगर--८४.८
अमळनेर--९०.३
चोपडा--८६.९
एरंडोल--७९.५
पारोळा--७८.२
चाळीसगाव--१६५.८
जामनेर--८३.३
पाचोरा--७०.३
भडगाव--१५५.१
धरणगाव--६२.२
बोदवड--११३
एकूण सरासरी--८८.३
"दर आठवड्याला पाणीटंचाईची आपण बैठक घेतो. गतवर्षी झालेल्या अतीवृष्टीमुळे यंदा पाणीटंचाई तीव्र स्वरूपात जाणवत नसल्याचे चित्र आहे. १५ जुलैपर्यंत पाऊस झाला नाही, तर चिंता वाढेल. खरिपाच्या पेरण्या मात्र लांबल्या आहेत." -अभिजित राऊत, जिल्हाधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.