Rajya Natya Saprdha 2023 : खुनाचा आरोप असलेल्या एका निर्दोष युवकाची न्यायालयात सुरू असलेली लढाई आणि खटल्याचा निकाल देण्यासाठी असलेल्या ज्युरींची त्याबाबतची मत-मतांतरे या विषयावर आधारित शिंदे-नंदुरबारच्या गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळाने ‘निखारे' नाटकाचे सादरीकरण केले. (Not feeling smack of difference of opinion Nikhara rajya natya spardha 2023 jalgaon news)
निमित्त होते, महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेचे. संस्थेने पाचवे पुष्प गुंफताना रत्नाकर मतकरी लिखित, क्षमा वासे वसईकर दिग्दर्शित हे नाटक सादर केले.
रत्नाकर मतकरी यांची सर्वच नाटकं ही दिग्दर्शकाला जितकी आव्हानात्मक तितकीच ती प्रेक्षकांच्याही क्षमतेला आव्हान देणारी असतात...‘द ट्वेल ॲग्री मॅन' या इंग्रजी नाटकाचे भारतीयकरण करून रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेले हे नाट्य. त्याकाळात इतके प्रभावी झाले होते की, त्यावर ‘एक रुका हुवा' फैसला हा समांतर हिंदी चित्रपट झाला होता.
सध्या ट्वेटी -२० जमान्यात लोकांना अडीच तास एकच ठिकाण, एकच वेळ-काळ आणि एकाच पद्धतीचं दृश्य बघण्याची सवय नाही ; त्यामुळेच ‘निखारे' हे नाटक दिग्दर्शकाला अधिकच आव्हानात्मक ठरते. हे नाटक कंटाळवाणे होऊ नये म्हणून रंगमंचीय हालचालींमध्ये ‘मुव्हमेंट ऑफ कॉन्ट्रास' ठेवणे आवश्यक असते.
मतकरींनी लिहिलेल्या या नाटकातील हे आव्हान पेलण्यास दिग्दर्शक क्षमा वासे वसईकर काहीशा अपयशी ठरतात. केवळ रंगमंचीय हालचालीच नव्हे तर प्रत्येक पात्राची त्याच्या स्वभाव गुणांप्रमाणे असलेल्या हालचाली, संवादफेक, पाठांतर आदी गोष्टींवर अधिक मेहनत घेतली असती, तर नाट्य अधिक प्रवाही व प्रभावी ठरले असते.
एका तरुणाने त्याच्याच बापाचा खून केल्याचा त्याच्यावर आरोप आहे आणि दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आपापली बाजू मांडून झाल्यावर निर्णय ज्युरींवर म्हणजे ९ लोकांवर सोपवला आहे. या पार्श्वभूमीवर नाटक प्रत्यक्ष सुरू होतं, ते ज्युरी एका ‘रूम'मध्ये निर्णय घेण्यासाठी येतात इथपासून. सुरुवातीला ९ पैकी ८ लोक जाहीर करतात की, मुलगाच दोषी आहे.
पण त्यातील एकट्यालाच वाटतं असतं की, मुलगा निर्दोष असू शकतो आणि सुरू होतो उलटसुलट चर्चेचा, नात्यांचा आणि सत्य शोधायचा चर्चात्मक खेळ. तसं पाहायला गेले, तर हे नाटक फक्त त्या निकालापुरतं मर्यादित नाही, तर आपल्या वागण्याने निर्माण होणारे गैरतणाव, पूर्वग्रहदुषितपणे केलेली माणसांची पारख, विशिष्ट समाजाकडे पाहण्याचा लोकांचा कल आणि एक-दोन व्यक्तींच्या गैरवर्तनाने आपल्या सर्वच जगाकडे बघण्याचा चुकीचा दृष्टिकोन या सर्वांवर लेखकाने सूचक भाष्य केले आहे.
ज्युरींच्या वैयक्तिक आयुष्याचा, स्वभावाचा, विचारांचा, निकालावर कसा परिणाम पडतो अथवा त्यापद्धतीने त्यांचे विचार कसे उत्पन्न होतात, एखाद्यास दोषी मानले की, आपले विचारही तो दोषी कसा या पद्धतीनेच विचार करायला लागते. याला फाटा देत एखाद्यानेही त्यांच्या दुसऱ्या बाजूने विचार केल्यास प्रकाशाची बाजू हळूहळू उजळ होते.
गरज असते ते त्या वेगळ्या विचारांची हे अधोरेखित करणाऱ्या या नाटकात ज्युरींची भूमिका पुरुषोत्तम विसपुते, राजेश जाधव, मनोज सोनार, जितेंद्र कावळे, रत्नदीप पवार, अविनाश भामरे, ऋषिकेश मंडलीक, नागसेन पेंढारकर, योगेंद्र पाटील यांनी केली होती, तर रोहित हराळ (कारकून), विष्णू जोंधळे (आवाज) यांनी भूमिका केल्यात. तांत्रिक बाजूत पार्थ जाधव (पार्श्वसंगीत), धमेंद्र भारती (प्रकाशयोजना), कुणाल वसईकर (नेपथ्य), तुषार सांगोटे (रंगभूषा) नाट्यास पोषक अशी होती.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत आव्हानात्मक नाटकाची निवड करून प्रेक्षकांना नाट्यानंद शिंदे-नंदुरबारच्या गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळाच्या कलावंत व तंत्रज्ञांचे मनःपूर्वक अभिनंदन!
गुरुवारचे (ता. ३०) नाटक
अंकल वान्या
लेखक व दिग्दर्शक : सोनल चौधरी
सादरकर्ते : जननायक थिएटर, जळगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.