Jalgaon News : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ च्या फागणे-तरसोद टप्प्यातील चौपदरीकरणाचा टप्पा पूर्णत्वास येत आहे.
अद्याप पाळधी बायपाससह काही उड्डाणपुलांची कामे अर्धवट असली, तरी दोन महिन्यांत या मार्गावरून जाताना वाहनधारकांना टोल भरावा लागणार आहे. काम पूर्ण होण्याआधीच टोल वसुलीची तयारी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चालवली आहे. (Now toll on highway till Bhagane Paldhi In two months nose starts Flyover bypass also partial but preparation for recovery Jalgaon News)
गुजरात-खानदेश-विदर्भाला जोडणाऱ्या आणि विकास प्रक्रियेत नव्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ बनलेल्या नवापूर-अमरावती या टप्प्यातील महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी चार टप्पे करण्यात आले.
त्यापैकी फागणे-तरसोद व पुढे तरसोद ते चिखली या धुळे, जळगाव व बुलढाणा जिल्ह्यांतील टप्प्यांतील दोन टप्प्यांची कामे सहा वर्षांपूर्वी सुरू झाली. तीन जिल्हे जोडणाऱ्या या दोन टप्प्यांतील १५० किलोमीटरपैकी जवळपास १२० किलोमीटरचा टप्पा एकट्या जळगाव जिल्ह्यातून जातो.
त्यामुळे जळगाव जिल्ह्यासाठी हे दोन्ही टप्पे पूर्ण होणे खूप महत्त्वाचे होते. पैकी तरसोद-चिखली टप्प्याचे काम दीड वर्षापूर्वी पूर्ण होऊन एप्रिल २०२२ ला त्याचे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पणही झाले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
आता फागणे-तरसोद टप्पा
या दोन टप्प्यांतील बऱ्यापैकी रखडलेल्या फागणे-तरसोद या ८४ किलोमीटरच्या टप्प्याचे काम आता पूर्णत्वाकडे आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यातील मुकटी आणि पारोळा या महत्त्वाच्या बायपासचे काम पूर्ण होऊन ते वाहतुकीसाठी खुलेही झाले.
त्यातही पारोळा बायपासवरून सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. तरीही जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाल्याने जळगाव जिल्ह्यातील पाळधीपासून फागणेपर्यंत हा चौपदरी महामार्ग काही ठिकाणचे अपवाद वगळता सरसकट वाहतुकीसाठी खुला आहे.
पुलांसह पाळधी बायपासचे काम बाकी
आता जुलैपासून पाऊस सुरल होणार, असे गृहित धरून या महामार्गाच्या विकासातील डांबरीकरणाचे काम सप्टेंबरपर्यंत होणार नाही. मात्र, कॉंक्रिटचे काम सुरू राहील. त्यात पारोळा तालुक्यातील दळवेल, मोंढाळे, सारवे, एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा, पाळधी आदी ठिकाणी उड्डाणपुलांचे काम प्रगतिपथावर आहे.
सध्या या कामांचे स्वरूप पाहता, त्याला आणखी किमान सहा महिने लागतील, तर पाळधीहून जळगाव शहराला वळसा घालून जाणाऱ्या (बायपास) टप्प्याचे कामही अपूर्ण असून, त्यालाही सहा महिन्यांहून अधिक कालावधी लागू शकतो.
...तरी टोलवसुलीची तयारी
या महत्त्वपूर्ण टप्प्याच्या चौपदरीकरणासाठी उड्डाणपुलांसह पाळधी-जळगाव-तरसोद बायपासचे काम, म्हणजे जवळपास ३० टक्के काम बाकी असूनही महामार्ग प्राधिकरणाने या महामार्गावर टोलवसुलीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पाळधी ते फागणेदरम्यान जेवढे उड्डाणपूल आहेत, ते दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येतील, असा दावाही सूत्रांनी केला आहे. त्यामुळे तरसोद-चिखली टप्प्याप्रमाणेच काम पूर्ण होण्याआधीच फागणे-पाळधी टप्प्यावर वाहनधारकांना टोल भरावा लागणार आहे.
धरणगाव-अमळनेर पर्यायी मार्गाचा वापर
सहा वर्षांपासून फागणे-तरसोद टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम सुरू होते. ॲग्रोव्ह इन्फ्रा या एजन्सीने हे काम हाती घेतले असून, मुदतीपेक्षा तिप्पट कालावधीतही ते पूर्ण झालेले नाही. निर्माणाधीन महामार्गावरील अडथळे लक्षात घेता तीन- चार वर्षांपासून वाहनधारकांनी जळगावहून धुळे, नाशिकला जाण्यासाठी मुसळी फाटा-पिंप्री-धरणगाव-अमळनेर या पर्यायी मार्गावरून जाण्यावर भर दिला. सध्याही अनेक खासगी वाहनधारकांची याच मार्गावरून वाहतूक सुरू आहे.
६० किलोमीटरसाठी १५० रुपयांचा टोल
फागणे-तरसोद महामार्ग चौपदरीकरणाचा टप्पा ८४ किलोमीटरचा. पैकी पाळधी ते तरसोद या बायपासचे अंतर जवळपास १६-१७ किलोमीटर. पूर्ण रस्त्याच्या अंतरात काही ठिकाणी उड्डाणपूल, वळणे, मोऱ्यांवरील छोट्या पुलांचे काम सुरू आहे.
त्या ठिकाणी ‘वन वे’च वापरावा लागतो. उर्वरित ६० किलोमीटरसाठी टोल सुरू होणार असल्याने किमान १५० रुपये (एकीकडून) टोल भरावा लागणार आहे.
"फागणे-तरसोद टप्प्यातील काम पाळधी-जळगाव बायपास वगळता जवळपास पूर्ण झाले आहे. ज्याठिकाणी उड्डाणपूल, अंडरपासचे काम आहे, ते दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल. पाळधी ते फागणे हा महामार्ग पूर्णपणे खुला करून दोन महिन्यांत त्यावर टोलही सुरू करण्याचे नियोजन आहे."
-शिवाजी पवार, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जळगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.