Jalgaon Maratha Survey : राज्य मागासवर्ग आयोगामार्फत होत असलेल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या सर्वेक्षणासाठी नेमण्यात आलेल्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांच्या प्रशिक्षणाची कार्यवाही पूर्ण झाली असून मंगळवार(ता.२३) पासून प्रत्यक्ष घरोघरी जावून सर्वेक्षणास प्रारंभ होणार आहे.
सर्वेक्षणासाठी नियुक्त सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी योग्यप्रकारे पार पडण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत. (Open category survey with Maratha community from today in jalgaon news)
जिल्हाभरात नियोजन
मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी जळगाव जिल्ह्यातील शहर महानगरपालिका, तालुक्यातील सर्व नगरपालिका/नगरपरिषदा व तालुक्यानिहाय सुमारे ८ हजारापेक्षा जास्त प्रगणक नेमण्यात आले आहेत. प्रत्येक तालुक्यात ठराविक प्रगणक राखीव असून उर्वरित प्रगणक प्रत्यक्ष सर्वेक्षणाची कार्यवाही करणार आहेत.
नोडल अधिकाऱ्यांनादिली जबाबदारी
सर्वेक्षणाच्या कामासाठी जिल्ह्यात सुमारे एक हजार पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच सर्वेक्षणाच्या कामकाजात समन्वय ठेवण्यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी नोडल अधिकारी आणि सहायक नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
परिपूर्ण होण्यासाठी प्रशिक्षण
जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी प्रगणक, पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे. २३ जानेवारीपासून प्रगणक घरोघरी जावून सर्वेक्षणाला सुरुवात करतील. सर्वेक्षणासाठी मोबाईल अॅप्लिकेशन तयार करण्यात आले असून नागरिकांनी सांगितलेली माहिती प्रगणक या मोबाईल अॅप्लिकेशनमध्ये भरणार आहेत.
सर्वेक्षणाची कार्यवाही अचूक, परिपूर्ण होण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे येथील मास्टर ट्रेनरच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात मोबाईल अॅप्लिकेशनची माहिती देण्यात आली आहे.
जिल्हा आणि तालुकास्तर असे दोन टप्प्यात हे प्रशिक्षण पार पडले. शनिवारी जिल्हास्तरीय प्रशिक्षणात जिल्ह्यातील मास्टर ट्रेनर्स यांचे प्रशिक्षण देण्यात आले, तसेच दुसऱ्या टप्प्यात सोमवारी प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना प्रत्येक तालुकास्तरावर प्रशिक्षण देण्यात आले.
प्रगणकांना सहकार्य करावे : जिल्हाधिकारी
जिल्ह्यातील सर्वेक्षण अचूक आणि परिपूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. सर्वेक्षणासाठी घरी येणाऱ्या प्रगणकांना नागरिकांनी आवश्यक माहिती देवून सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.