Jalgaon Agriculture News : मागील आठवड्यात असलेल्या सततच्या ढगाळ हवामानामुळे तालुक्यात केळीवर सीएमव्ही (कुकुंबर मोझाक व्हायरस) रोगाचा प्रभाव वाढत आहे. तालुक्यातील मोरगाव खुर्द येथील एका अल्पभूधारक केळी उत्पादक शेतकऱ्याने मंगळवारी (ता. १२) आपल्या शेतातील सुमारे साडेतीन हजार केळीची रोपे उपटून नष्ट केली.
यामुळे शेतकऱ्याचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील किमान दहा-बारा गावांमध्ये सुमारे ५०० हेक्टर्सपेक्षा जास्त क्षेत्रावर या रोगाचा प्रभाव जाणवत असून, असेच ढगाळ हवामान कायम राहिल्यास रोगाचा प्रभाव व व्याप्ती वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. (Outbreak of CMV disease on about 500 hectares of banana in Raver taluka jalgaon news)
तालुक्यातील मोरगाव खुर्द येथील सुनील रघुनाथ पाटील या युवा शेतकऱ्याकडे अडीच एकर एवढी जमीन आहे. यातील २ एकर क्षेत्रावर या शेतकऱ्याने २५ जून रोजी ३५०० केळी खोडांची लागवड केली होती.
टिशू कल्चर केळीची ही रोपे पुणे येथील एका कंपनीकडून घेतल्याचे या शेतकऱ्याने सांगितले. लागवडी पूर्वीची मशागत व लागवडीनंतर खते, लागवड, मजुरी, टिश्यू कल्चर रोपांचा खर्च आदी धरून १ लाख ४० हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च झाल्याचे शेतकऱ्याने सांगितले.
मागील चार-पाच दिवसांपासून काही केळी खोडांवर सीएमव्ही रोगाचा प्रभाव दिसून आला. पाने पिवळी पडत असून ४ - ५ दिवसातच केळी बागेतील ७० टक्क्यांपेक्षा जास्त केळी रोपे या रोगामुळे प्रभावित झाली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अखेर आज (ता. १२) जड अंत:करणाने निर्णय घेत सुनील पाटील यांनी सगळी रोपे उपटून नष्ट केली. मोरगाव व अन्य आजूबाजूच्या गावात सीएमव्ही रोगाचा प्रभाव वाढत असल्याचे या शेतकऱ्याने सांगितले. दरम्यान, त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
वरिष्ठांच्या आदेशानुसार पंचनामे
दरम्यान, याबाबत तालुक्याचे कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी केळीवर सीएमव्ही रोग झपाट्याने वाढत असल्याचे मान्य केले. त्यांनी सोमवारी (ता. ११) तालुक्यातील केऱ्हाळा, अभोडा व लालमाती येथे केलेला पाहणीत मोठ्या प्रमाणात सीएमव्ही आढळून आला तर तापी काठावरील निंबोल आणि ऐनपूर पट्ट्यातही कमी प्रमाणात का असेना पण हा रोग आढळून आला आहे.
उद्या पाल येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ महेश महाजन व कृषी सहाय्यकांच्या पथकासह निरूळ, अहिरवाडी, रसलपूर, विवरा, चिनावल, कुंभारखेडा यासह परिसरातील गावांचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे श्री. वाळके यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. सर्वेक्षणानंतरच किती प्रमाणात सीएमव्ही पसरला आहे, याची आकडेवारी उपलब्ध होणार असून, त्यानंतरच वरिष्ठांच्या आदेशानुसार पंचनामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.