जळगाव : ‘मिशन ५०० कोटी लिटर पाणी साठवण’ या शेतकऱ्यांच्या चळवळीला गती देऊन चाळीसगाव तालुका पाणीदार करणारे चाळीसगावचे भूमिपुत्र तथा आयकर विभागाचे अपर आयुक्त डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणाऱ्या पाचपाटील टीमचे कार्य संयुक्त राष्ट्रसंघात पोचले आहे. (Panchpatal of Chalisgaon in UNO Presentation of Deputy Engineer paigavane Jalgaon News)
न्यू यार्कमध्ये नुकत्याच झालेल्या ‘जल परिषद २०२३’ मध्ये डॉ. चव्हाण यांनी पाणी अडविण्यासाठी लोकसहभागातून राबविलेल्या विविध संकल्पनांचे सादरीकरण या परिषदेत जगासमोर करण्यात आले. या परिषदेत संयुक्त राष्ट्रसंघाच्या १९३ सदस्य देशांमधील मंत्री, सचिव, आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
भारतातर्फे सरकारचे प्रतिनिधी म्हणून जलशक्ती मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री गजेंद्रसिंह शेखावत हे शिष्टमंडळासह उपस्थित होते. पाचपाटील टीममधील सहकारी तथा ‘बीएमसी’मध्ये उपअभियंता म्हणून कार्यरत असलेल्या श्रीकांत पायगव्हाणे यांचाही या परिषदेत सहभाग होता.
‘डिझेल टाका आणि मशिन वापरा’ या माध्यमातून डॉ. चव्हाण यांच्या पाचपाटील टीमने लोकसहभागातून केलेल्या रचनात्मक कार्याची माहिती श्री. पायगव्हाणे यांनी ‘युनो’च्या माध्यमातून संपूर्ण जगासमोर मांडली.
मिशन ५०० कोटी लिटरची संकल्पना ग्रामसभांच्या माध्यमातून घराघरांत कशी पोचविली, यात लोकसहभाग कसा वाढविला, प्रत्यक्ष कार्य करताना कसे नियोजन केले, नदी खोलीकरण, रुंदीकरण, गावात बंधारे व तलावांचे बांधकाम आदींची सविस्तर माहिती या परिषदेत श्री. पायगव्हाणे यांनी दिली. संयुक्त राष्ट्रसंघातील ही पहिलीच जल परिषद असल्याने जगातील विविध देशांचा यात सहभाग होता.
हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?
विविध कामे
केवळ चाळीसगाव तालुकाच नव्हे, तर राज्यातील नऊ जिल्ह्यांतील ८० गावांमध्ये ४५० कोटी लिटर पाणीसाठे आणि खंदक तयार करण्यात आले आहेत. यासोबतच तब्बल ४५ हजार झाडे लावून ३० किलोमीटर शेतरस्त्यांची दुरुस्तीदेखील या चळवळीच्या माध्यमातून पाचपाटील टीमने केली आहे.
डॉ. चव्हाण यांच्या या कार्याची दखल केंद्रीय जलमंत्रालयासह अनेक मान्यवरांनी घेतली. काही दिवसांपूर्वी भारताचे जलपुरुष म्हणून ज्यांची ख्याती आहे अशा डॉ. राजेंद्रसिंह यांनी स्वतः चाळीसगावला दोन दिवस राहून पाचपाटील टीमचे कार्य पाहून डॉ. चव्हाण यांचे कौतुक केले.
‘पाचपाटील’चा अर्थ
सिटी युनिव्हर्सिटीच्या ब्रॉन्क्स कम्युनिटी कॉलेज आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीत झालेल्या या जल परिषदेत सादरीकरण करताना श्री. पायगव्हाणे यांनी सांगितले, की पूर्वी गावे जलव्यवस्थापनाने स्वयंपूर्ण आणि शाश्वत होती.
इंग्रज भारतात येण्यापूर्वी गावाचे नियोजन करणाऱ्या प्रमुखाला ‘पाटील’ म्हणायचे. त्यामुळे या मिशनमधील पाच गावांची जबाबदारी सांभाळणाऱ्या स्वयंसेवकांना ‘पाचपाटील’ असे म्हणतात. असे सुमारे २१ ‘पाचपाटील’ गेल्या सहा वर्षांपासून महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांत कार्यरत आहेत.
या सर्व पाचपाटलांच्या निःस्वार्थ कार्याने लोक प्रेरित व प्रभावित झाले आहेत. ‘जेसीबी’ आणि ‘पोकलेन’द्वारे तलाव व बंधाऱ्यांमधील गाळ काढून अनेक गावे पाचपाटलांनी लोकसहभागातून पाण्याने समृद्ध केली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.