Jalgaon News : जिल्हा पोलिस दलातर्फे एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाईत मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी पथक आणि एमआयडीसी पोलिसांनी ही कामगिरी केली.
यामध्ये ४ गावठी कट्टे, ५ तलवारी, दोन चॉपर, १ चाकू आणि जिवंत काडतूस असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी संबधीत प्रभारी अधिकाऱ्यांना बैठकीत सूचना केल्या होत्या. गेल्या महिन्याभरापासून त्यानुसार काम सुरू आहे.
त्याअंतर्गत हद्दपारी, एमपीडीए, मोक्कासारख्या मोठ्या कारवायांचा धडाका पोलिस अधीक्षकांनी लावला होता.
पत्रकार परिषदेला भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, परिरक्षावधीन उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, आप्पासाहेब पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे, अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गणेश बुवा आदी उपस्थित होते.
दरोड्याचा प्रयत्न उधळला
अजिंठा चौफुलीच्या पुढे गुरुवारी रात्री एस. टी वर्कशॉपजवळ अंधारात काही तरुण मोटार सायकलसह उभे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
निरीक्षक जयपाल हिरे, कर्मचारी हेमंत कळसकर, चंद्रकात पाटील, प्रदीप पाटील, दिपक चौधरी, अशपाक शेख यांच्या पथकाने रात्री उशिरा तीनच्या सुमारास रस्ता लुट व दरोड्याच्या प्रयत्नात असलेले स्वप्नील उर्फ गोल्या धर्मराज ठाकूर, (वय १९), निशांत प्रताप चौधरी (वय १९, दोघे रा. शंकररावनगर), पंकज चतुर राठोड (वय १९, रा. तुकारामवाडी), यश देवीदास शंकपाळ (वय १९, रा. हरिओमनगर, आसोदा रोड) यांच्यासह दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून गावठी बनावटचे पिस्टल, चाकु, मिरचीची पुड, दोर, ३ जिवंत काडतुस, दोन मोटार सायकली जप्त करण्यात आल्या.
हे सर्व संशयीत हे अट्टल गुन्हेगार असून, स्वप्नील ऊर्फ गोल्या व निशांत चौधरीवर प्रत्येकी ५ गुन्हे, यश शंकपाळ याच्यावर १ गुन्हा दाखल आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, योगेश बारी तपास करीत आहेत.
भुसावळमध्ये कारवाई
भुसावळ शहरात वाल्मीकनगर परिसरातून उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सूरज पाटील, रमण सुरळकर, यासिन पिंजारी, संकेत झांबरे यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ललित तुलसीदास खरारे, जितेन आनंद बोयत यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूस, दोन मोबाईल, एक दुचाकी असे साहित्य जप्त केले. भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कंडारीत पिस्तूल, तलवारी
कंडारी (ता. भुसावळ) गावात मयुर नारायण मोरे याने घरात विना परवाना गावठी पिस्तूल आणि तलवारी बाळगल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळाली होती.
उपनिरीक्षक गणेश वाघमारे, सहाय्यक फौजदार अनिल जाधव, कमलाकर बागुल, अनिल देशमुख, जयंत चौधरी, महेश महाजन, दीपक पाटील, श्रीकृष्ण देशमुख, महेश सोमवंशी, ईश्वर पाटील यांच्या पथकाने मयुर मोरे व कल्पेश राजू मोरे यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, ५ तलवारी, १ काडतूस जप्त केले. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अडावदला गावठी कट्टा जप्त
अडावद येथे शुक्रवारी (ता. १९) एक तरुण गावठी कट्टा तस्करी करणार असल्याची गुप्त माहिती गुन्हेशाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळाली हेाती.
त्यानुसार रविंद्र पाटील, दीपक शिंदे यांच्या पथकाने तत्काळ ॲक्शन घेत बस (एमएच २०, बीएल २२७७)मधून प्रवास करणाऱ्या रमेश घुमरसिंग भिलाला यास ताब्यात घेतले.
झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि जीवंत काडतूस मिळून आला. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.