जळगाव : बी. जे. मार्केटच्या वॉशिंग सेंटरवर काम करताना तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी तीन महिन्यांनी जिल्हापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दाखल गुन्ह्यात दुकानमालक, वॉशिंग सेंटरचालक यांना सोडून चक्क दुकानमालकाच्या मुलावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेला. तत्पूर्वी तक्रारदाराने पोलिस निरीक्षकांच्या समक्ष तक्रार नसल्याचे सांगितल्यानंतर आठ दिवसांनंतर परत त्याला बोलावून पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा अजब-गजब प्रकार जळगाव उपविभागात घडला आहे. (Latest marathi news)
जळगाव शहरातील बी. जे. मार्केट परिसरात रेडक्रॉस रक्तपेढीच्या गल्लीत सुपर वॉशिंग सेंटरवर काम करताना २५ मार्च २०२२ ला तौसिफ शेख अफजल हा तरुण काम करताना चक्कर येऊन खाली कोसळला. तत्काळ त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने आकस्मिक मृत्यूची नोंद जिल्हापेठ पोलिसांत करण्यात आली. पंचनामा करून शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपविण्यात आला. शवविच्छेदन अहवाल आणि विद्युत निरीक्षकाच्या तपासणीकरिता गेल्या तीन महिन्यांपासून या आकस्मिक मृत्यूचा तपास सुरू होता.
जाबजबाब, चौकशीसत्र
तपासात पोलिसांनी मृताचे कुटुंबीय, आई-वडिलांची चौकशी, विचारपूस झाली. दुकानमालक, वॉशिंग सेंटरचालकाची विचारपूस झाली. घटनास्थळावरून माहिती घेतली गेली, पंचनामासत्र झाले. प्रकरण आपसांत मिटले म्हणून पोलिसांनीही हात टेकत माघार घेतली.
रोकडसह लिहून दिला प्लॉट
सुपर वॉशिंग सेंटरचालक आसिफ भिस्ती यांच्याकडे तौसिफ कामाला असल्याने मानवतेच्या भावनेतून एकुलता मुलाचा मृत्यू झाल्याने पै-पै गोळा करून घेतलेला पाचशे चौरस फूट प्लॉट मुलाच्या वडिलांना लिहून दिला. वर चाळीस हजार रुपये रोखही दिले. याची रीतसर रजिष्टर नोटरी करण्यात आली. त्याच नोटरीचा कागद पोलिसांनाही दाखविला गेला.
गुन्ह्यासाठी पोलिसाची मेहनत
शवविच्छेदनासह विद्युत निरीक्षकाचा अहवाल प्राप्त झाला. आता जिल्हापेठ पोलिस ठाण्याचा तडवी नामक हवालदार वॉशिंग सेंटरवर चकरा मारायला लागला. त्या पोराच्या बापाला बोलावून आण, असे सांगण्यात आले. लगेच सायंकाळी मृत मुलाचे वडील अफजल शेख यांना घेऊन आसिफ भिस्ती पोचला. त्याला पोलिस निरीक्षकासमक्ष हजर केले गेले. साहेबांचा प्रश्नोत्तराचा तास संपल्यावर त्यांना नोटरी दाखविली गेली. ‘घडलेली घटना अपघात आहे. आता माझा मुलगा परत येणे नाही’, असे म्हणून मुलाचे वडील पोलिस ठाण्यातून निघून गेले. परत देान दिवसांनी याच तडवीने मृत मुलाच्या आई-वडील दोघांना सोबत आणण्याचा निरोप दिला.
बाप राहिला अन् पोरगा आला
वॉशिंग सेंटरचालक आसिफ भिस्ती, दुकानमालक वहाब शेख या दोघांचा नोटरीमध्ये उल्लेख असल्याने त्यांना वगळून दुकानमालकाचा मुलगा शेख साबीर शेख वहाब याच्याविरुद्ध पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली.
''मृत मुलाच्या वडिलांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात विद्युत निरीक्षकाचाही अहवाल आला असून, त्या आधारे गुन्हा नोंद झाला आहे.'' - पुरुषोत्तम वाघळे (तपासाधिकारी), सहाय्यक फौजदार जिल्हापेठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.