जळगाव : शहरातील भिलपुरा चौक ते ममुराबाद रेल्वे ब्रिजचा रस्ता दोन समुदायांतील दंगलीचे कारण ठरणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. रात्री नऊच्या सुमारास दाढी-टोपीवाल्या तरुणाला मारझोड केल्यावर एका गटाचा जमाव चालून आला होता. हल्लेखोरांची दुचाकी जप्त असताना, पाच लोकांची नावे स्पष्ट झाल्यावरही शनिपेठ पोलिसांनी मांडवली करून प्रकरण आपसांत मिटविले. त्यानंतर मध्यरात्रीनंतर दीडला भिलपुरा चौकात डिवचण्याच्या उद्देशाने काही चॉपरधारी तरुणांनी हल्ला चढविला. पुन्हा दगडफेक होऊन हल्लेखोरांनी वाहन सोडून धूम ठोकल्याची घटना घडली.
जळगाव शहरात भिलपुरा-काटाफैल, शनिपेठ हा परिसर पोलिस रेकॉर्डवर अतिसंवेदनशील म्हणून नोंद आहे. गेल्या काही महिन्यांपासून विशिष्ट पेहराव असलेल्या वयोवृद्ध महिलांवर लेंडी नाल्यातील घाण टाकून मारझोडीचे प्रकार वाढले आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादीतर्फे पोलिस अधीक्षकांना २३ ऑगस्टला निवेदनही देण्यात आले आहे. अद्याप यावर कुठल्याही ठोस उपाययोजना प्रशासनाकडून होताना दिसून येत नाहीत. उलट किरकोळ म्हणून शनिपेठ पोलिसांकडूनच मांडवली करून प्रकरण दडपण्यात येत असल्याचे वारंवार घडत आहे.
(police settled matter after giving warning of cross complaint Jalgaon news)
‘क्रॉस कम्प्लेंट’च्या
धाकाने प्रकरण दडपले
रात्री नऊच्या सुमारास उस्मानिया पार्कमधील रहिवासी तौसिफ शेख फारूक या तरुणाला किरकोळ कारणावरून घेरून मारहाण करण्यात आली. हल्लेखोरांवर जमाव उलटल्यावर त्यांनी वाहने सोडून पळ काढला. शनिपेठ पोलिसांनी या प्रकरणी दादू नावाच्या तरुणासह पाच मारहाण करणाऱ्यांची नावे निष्पन्न केली. मात्र, डीबी पथकाने मारहाण झालेल्या तरुणाने तक्रार देऊ नये यासाठी त्याला ‘क्रॉस कम्प्लेंट’चा धाक दाखविला. तुलाही आत बसावे लागेल. दुचाकीची नुकसानभरपाई घेऊन शांत राहा, असा मंत्र देत प्रत्येकी १५ हजारांची उघड वसुली करून प्रकरण दडपण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
रात्री दीडला परत हल्ला
रात्री दीडच्या सुमारास ॲक्टिव्हासह दोन दुचाकींवर ट्रिपलसीट आलेल्या तरुणांनी भिलपुरा मशिदीजवळून आत शिरत थेट मरीमाता मंदिराजवळ येत विनाकारण डिवचण्यासाठी शिवीगाळ सुरू केली. चौकात बसलेल्या एका अल्पवयीन मुलाच्या मागे चॉपर घेऊन धावल्यानंतर परिसरातील रहिवाशांचा जमाव एकवटून दगडफेक सुरू झाली. दगडफेकीनंतर पुन्हा वाहन सोडून या भामट्यांनी धूम ठोकली. परिसरातील रहिवाशांनी पांढऱ्या रंगाची ॲक्टिव्हा पोलिसांत जमा केली असून, घडल्या प्रकारात दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत कुठलाच गुन्हा दाखल झालेला नव्हता.
तक्रारदारच समोर येईना
रात्री नऊला घडलेली घटना असो की दीडला झालेली दगडफेक असो दोन्ही प्रकरणांत साधी नोंद घेण्याची तसदी पोलिसांनी घेतली नसून तक्रारदारच नसल्याने पकडून आलेल्या तरुणांना सोडून देण्यात आल्याचे ठाणे अंमलदाराने सांगितले. रात्री दीडच्या दगडफेकीबाबत पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र ते बंदोबस्तात व्यस्त असल्याने संपर्क होऊ शकला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.