जळगाव : महापालिकेत रस्त्याचा कोट्यवधीचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले जातेय. अधिकारी आणि पदाधिकारी रस्त्याचे नकाशे आणि निधी मंजूर झाल्याचे पत्रच घेऊन फिरत आहेत. मात्र, जनता ऐन पावसाळ्यात खड्ड्यातून मार्ग काढत आहे. मग हा कोट्यवधीचा निधी नेमका कुठे जातोय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता जनता संतप्त झाली असून, लवकरच त्यावर आंदोलन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शहरातील कोणत्याही भागात गेल्यास रस्ता दिसतच नाही; केवळ खड्डे आणि खड्डेच दिसत आहेत. त्यामुळे रस्त्यावरून चालावे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दूध फेडरेशन ते रेल्वेस्थानकचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यावर खड्डेचखड्डे आहेत. विशेष म्हणजे, या रस्त्यासाठी म्हणे निधी मंजूर आहे. ४२ कोटी रुपयांच्या निधीतून या रस्त्यांची कामे होणार आहेत. गेल्या वर्षभरापासून नागरिकांना हेच सांगितले जात आहे. मात्र, या रस्त्यावर अद्याप एक रुपयाची मातीही टाकण्यात आलेली नाही.
लाकूडपेठेतील अवस्था बिकट
शिवाजीनगरातील लाकूडपेठ भागातील रस्त्याची अवस्था तर अत्यंत बिकट आहे. लाकूडपेठ क्रांती चौकापर्यंतचा रस्ता खड्डेमय झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे, या रस्त्यासाठीही निधीही मंजूर करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षभरापासून नागरिकांना हेच सांगण्यात आले. मात्र, पावसाळा आला तरी या रस्त्याचे काम करण्यात आले नाही. आज नागरिकांना या रस्त्यावरून चालणेही अवघड झाले आहे.
...तर मग या रस्त्याचे काम का नाही?
महापालिकेचे शहर अभियंत्यांनी शहरातील रस्त्याचे काम पावसाळ्यातही सुरू राहतील, असे सांगितले आहे. या रस्त्यासाठी निधी मंजूर आहे. मग पावसाळा संपण्याची वाट का पाहिली जात आहे. शिवाजीनगरातील या रस्त्याचे कामही आता सुरू करण्यात यावे, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे. शिवाजीनगरातील नागरिक आता संतप्त झाले असून, आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचेही सांगण्यात येत आहे.
रस्त्यामुळे आयुक्तांचा निवास लांबला
महापालिका आयुक्त विद्या गायकवाड यांचे शिवाजीनगरात शासकीय निवासस्थान आहे. आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर या बंगल्याचे काही प्रमाणात नूतनीकरण करण्यात आले. त्यांचे नावही या बंगल्यावर लावले आहे. मात्र, शिवाजीनगरातील पुलाचे संथ काम सुरू आहे. तो केव्हा सुरू होणार याची शाश्वती नाही, तसेच शिवाजीनगरातील दूध फेडरेशनचा रस्ताही खराब आहे. त्यामुळे सध्यातरी त्या बंगल्यात अद्याप राहावयास आलेल्या नाहीत. त्यामुळे या खराब रस्त्याचा आणि शिवाजीनगर पुलाच्या संथ कामाचा फटका आयुक्तांनाही बसला आहे.
''शिवाजीनगरातील रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. चालणेही अत्यंत कठीण झाले आहे. या रस्त्यात भर टाकावा, अशी मागणी आम्ही अनेक वेळा केली आहे. ही मागणी तातडीने मंजूर झाली नाही, तर नागरिक तीव्र आंदोलन करतील.''
-विनायक पाटील, अध्यक्ष, धर्मरथ फाउंडेशन, जळगाव
''शिवाजीनगरातील दूध फेडरेशनचा रस्ता ४२ कोटींच्या निधीतून घेण्यात आला आहे. त्यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे. आता पावसाळ्यात त्याचे काम सुरू करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत.''
-ॲड. दिलीप पोकळे, नगरसेवक, शिवाजीनगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.