Jalgaon Crime News : वाळूची चोरट्या व अवैध मार्गाने होणारी वाळू वाहतूक रोखणारे प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील महसूल कर्मचाऱ्यांवर उत्राण येथील गिरणा नदीपात्रात वाळूमाफियांनी प्राणघातक हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला.
वाळूमाफियांच्या गुंडांनी प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांना मारहाण करून खाली पाडले आणि त्यांचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. (Provincial officer assaulted by sand mafia jalgaon crime news)
महसूल कर्मचाऱ्यांनी वाळूमाफियांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून प्रांताधिकारी गायकवाड यांचीही सुटका करून त्यांना वाचविले. वाळूमाफियांनी महसूल पथकावर दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याबाबत दहा ते पंधरा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलेले ट्रॅक्टर कर्मचाऱ्यांवर दगडफेक करून पळवून नेले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी विखरण येथे देखील सहाय्यक पोलिस निरीक्षकांवर जमावाने हल्ला करून पोलिस वाहनाची तोडफोड केल्यामुळे तालुक्यात शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रांताधिकारी गायकवाड यांच्यासह भालगावचे मंडळाधिकारी दीपक ठोंबरे, तलाठी शकील अहमद शेख, विश्वंभर शिरसाठ, उत्राणचे मंडळाधिकारी प्रमोद गायधनी, उत्राण अहिरहद्दचे पोलिसपाटील प्रदीप तिवारी, उत्राण गुजरहद्दचे पोलिसपाटील राहुल महाजन.
आडगावचे कोतवाल अमोल पाटील हे शुक्रवारी (ता. १२) रात्री खासगी वाहनाने वाळूचोरी रोखण्यासाठी उत्राण रस्त्यावरील दर्ग्याजवळ असलेल्या गिरणानदी पात्रात गेले होते. नदीपात्राची पाहणी करीत असताना प्रांताधिकारी गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांना सुमारे आठ ते दहा ट्रॅक्टर पात्रातून वाळूचा उपसा करीत असल्याचे दिसून आले.
...असा झाला प्रांतांवर हल्ला....
पथकातील कर्मचारी ट्रॅक्टरकडे जात असताना सात ते आठ चालकांनी ट्रॅक्टर परधाडे गावाच्या दिशेने पळवून नेले तर दोन ट्रॅक्टर पथकाने पकडले. प्रांताधिकारी गायकवाड व पथकातील कर्मचारी ताब्यात घेतलेल्या ट्रॅक्टरजवळ उभे असताना चार ते पाच युवक त्याठिकाणी आले आणि कर्मचाऱ्यांशी वाद घालू लागले.
ट्रॅक्टर पुढे नेल्यास हातपाय तोडू, अशी धमकी कर्मचाऱ्यांना युवकांनी दिली. प्रांताधिकारी गायकवाड यांनी आम्ही महसूल कर्मचारी असून, तुम्ही वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक करीत असल्यामुळे ते जप्त करणार असल्याचे सांगितले. त्यावेळी युवकांनी अमोल, राहुल, दादाभाऊ, सागर यांना आरोळ्या मारून ट्रॅक्टरजवळ बोलावले. त्यावेळी सुमारे पंधरा ते वीस युवक त्याठिकाणी आले आणि त्यांनी प्रांताधिकाऱ्यांसह
पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण करू लागले. वाळूमाफियांच्या गुंडांनी केलेल्या मारहाणीत कर्मचाऱ्यांचे कपडे फाटले तसेच ते जखमीही झाले.
प्रांताधिकाऱ्यांचा गळा दाबला
झटापट सुरू असताना काही युवकांनी प्रांताधिकारी गायकवाड यांना खाली पाडून त्यांच्या छातीवर बसून त्यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. प्रांताधिकारी गायकवाड यांना सात ते आठ युवक मारहाण करून गळा दाबत असल्याचे पाहून पथकातील कर्मचाऱ्यांनी जमावाच्या ताब्यातून स्वत:ची सुटका करून प्रांताधिकारी गायकवाड यांची सुटका केली.
या झटापटीनंतर वाळूमाफियांच्या गुंडांनी पथकावर दगडफेक करून दोन्ही ट्रॅक्टर पळवून नेले. वाळूमाफियांनी दगडफेक करण्यास सुरवात केल्यामुळे पथकातील कर्मचारी स्वत:चा जीव वाचविण्यासाठी आडोशाला लपण्याचा प्रयत्न करीत होते. वाळूमाफियांच्या मारहाणीत प्रांताधिकारी व पथकातील कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यानंतर उत्राण अहिरहद्दचे पोलिसपाटील प्रदीप तिवारी यांनी हल्लेखोरांपैकी एकास ओळखून त्याचे नाव आकाश राजेंद्र पाटील असल्याचे सांगितले.
गुंडांना पकडण्याचे आव्हान
मंडळाधिकारी प्रमोद गायधनी यांनी दिलेल्या तक्रारीवरून कासोदा पोलिस ठाण्यात सुमारे दहा ते पंधरा अज्ञात व्यक्तींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक मोहन गुंजाळ तपास करीत आहेत. प्रांताधिकारी गायकवाड यांच्यासह महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. यापूर्वी उत्राण येथील माजी सरपंचांच्या पतीने वाळूमाफियांच्या गुंडगिरीला कंटाळून तहसीलदार कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली भेट
वाळूमाफियांनी रात्रीच्या वेळेस ठिकठिकाणी काही युवकांना बसवून पथकातील सदस्यांची माहिती पुरविण्याची जबाबदारी सोपवलेली असते. विशिष्ठ सांकेतिक शब्दांचा वापर करून मोबाईलच्या माध्यमातून वाळूमाफिया एकमेकांशी संपर्क करीत असतात.
प्रांताधिका-यांसह कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न वाळूमाफियांकडून केला जात आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना घटनेची माहिती समजताच एरंडोल येथे भेट देऊन प्रांताधिकारी व जखमी कर्मचाऱ्यांनी भेट घेत विचारपूस केली. महसूल पथकावर हल्ला करणाऱ्या गुंडांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.