मेहुणबारे (जि. जळगाव) : रायगड जिल्ह्यातील वाट चुकलेल्या मनोरुग्ण महिलेने रेल्वेसह अन्य वाहनातून प्रवास करत चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड गाठले.
उंबरखेडच्या महिला पोलिस पाटील अर्चना मोरे यांनी त्या महिलेची दखल घेत दोन दिवस देखभाल करुन तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि आज मेहुणबारे येथे पोलिसांच्या साक्षीने या महिलेला पतीच्या स्वाधीन करण्यात आले. (Psychiatric woman was handed over to her husband on witness of police jalgaon news)
विशेष म्हणजे, मनोरुग्ण महिलेचा पती शोध घेत असताना पती-पत्नीची भेट झाल्यावर परस्परांच्या गळ्यात हुंदके देत दोघेही रडत होते. हे दृश्य मन हेलावून टाकणारे होते. त्याचबरोबर माणुसकी जपणारे चित्र येथे दिसून आले.
रायगड जिल्ह्यातील उतेखोल आवडी (ता. माणगाव) येथील रहिवासी असलेली मनोरुग्ण महिला आशा बबन जाधव (वय ३०) ही महिला ४ फेब्रुवारीपासून स्वतःच्या घरातून कुणालाही काहीएक न सांगता निघून गेली होती. वाट चुकलेली आशा जाधव ही रेल्वेने थेट चाळीसगाव शहरात पोचली. शहरात सर्व अनोळखी वाटत असल्याने ती जिकडे रस्ता मिळेल तिकडे पायी चालत गेली.
उंबरखेडे गाठले
पायी चालत चालत आशाने उंबरखेडे गाठले. गावाबाहेर असलेल्या युवराज मोरे यांच्या शेतात रात्री थांबली. दरम्यान, श्री. मोरे ६ फेब्रुवारीला सकाळी शेतात गेल्यावर त्यांना शेतात ही महिला दिसली. त्यांनी धावत गावात येऊन ही घटना सांगितली. या शेतात त्या महिलेला बघण्यासाठी एकच गर्दी झाली.
हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम
भेदरलेल्या अवस्थेत महिलेला गावातील पोलिस पाटील अर्चना मोरे यांनी मायेचा आधार देत गावात आणले. यानंतर या महिलेला मेहुणबारे पोलिस ठाण्यात आणले. पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड यांनी संपूर्ण माहिती घेतली व शोध लागेपर्यंत त्या महिलेला पोलिस पाटील अर्चना मोरे यांनी तिला स्वतःच्या घरी ठेवायची जबाबदारी घेतली.
पत्नीला शोधण्यास धावपळ
आशा जाधव हिचे पती बबन जाधव यांनी संपूर्ण रायगड जिल्ह्यात शोध घेतला. मात्र, ती आढळून आली नाही. त्यामुळे बबन जाधव यांनी माणगाव (जि. रायगड) पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. मात्र पत्नी आशा ही उंबरखेडे येथील पोलिस पाटील यांच्या घरी होती.
त्यावेळी त्यांनी आशाला विश्वासात घेत तिच्याजवळ असलेल्या आधार कार्डच्या आधारे तपास लावला व पोलिस पाटील यांनी माणगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी विक्रांत फडतरे यांच्याशी अर्चना मोरे या बोलल्या व त्यांनी सांगितले, महिला ही बेपत्ता आहे. या महिलेला घेण्यासाठी तिचे पती आज (ता. ८) मेहुणबारे पोलिस ठाण्यात आले. त्यांनी पोलिस पाटील अर्चना मोरे यांचे आभार मानले.
पोलिस पाटील अर्चना मोरेंनी जपली माणुसकी
हातमजुरी करून कुटुंबांच्या ओझे वाहणाऱ्या बबन जाधव यांची पत्नी पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याने ते व्यथित झाले होते. कामावर न जाता पोटाला चिमटा देऊन त्यांनी पत्नीच्या शोधासाठी परिसरात जंग जंग पछाडले.
अखेर, पत्नीचा तपास लागल्यानंतर ते मेहुणबारे पोलिस ठाण्यात पोचले व आपल्या पत्नीला पाहून धाय मोकलून रडले. या वेळी पोलिस पाटील अर्चना मोरे यांनी महिलेला साडीचोळी देऊन निरोप दिला.
या प्रसंगी पोलिस ठाण्याचे भूषण बाविस्कर, सुदर्शन घुले, धर्मराज पाटील, नीलेश लोहार, ऋषिकेश जगताप, उमेश निकम आदी उपस्थित होते. खासकरून पोलिस पाटील अर्चना मोरे यांचे माणगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी विक्रांत फडतरे यांनी आभार व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.