Jalgaon PWD News: तांत्रिकदृष्ट्या बंधारा अशक्य म्हणून... सार्वजनिक बांधकाम विभागाचा दावा

PWD News
PWD Newsesakal
Updated on

PWD News : गिरणा नदीवर बांभोरी- निमखेडीला जोडणाऱ्या जुन्या महामार्गावर प्रस्तावित बंधारा वजा पुलाचा प्रश्‍न चांगलाच चिघळला आहे. याठिकाणी तांत्रिकदृष्ट्या बंधारा शक्य नसल्याचा अहवाल नाशिक येथील संकल्पचित्र विभागाने दिल्यामुळे बंधाऱ्याचे काम वगळण्यात आल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.

गिरणा नदीवर जुन्या महामार्गावर निमखेडी व बांभोरी जोडणारा जुना पूल होता. त्याच ठिकाणी बंधारा वजा पूल करण्यासंबंधी जुलै २०२२मध्ये शासन निर्णय होऊन ४० कोटींच्या निधीला मान्यता देण्यात आली होती. (pwd claims Technically embankment is impossible on girna river jalgaon news)

मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने बंधारा वगळून पूल बांधण्यासाठी निविदा मागविल्या, त्या स्वीकृत करून कार्यादेश देण्याची प्रक्रियाही सुरु केली. मात्र, त्याला सर्व स्तरातून विरोध होत असून ‘सकाळ’ने सोमवारच्या अंकात याबाबत वृत्त ठळकपणे प्रसिद्ध केल्यानंतर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत.

कृती समितीचे निवेदन

पुलासोबतच बंधाऱ्याचेही काम व्हावे म्हणून त्यासाठी पूल वजा बंधारा निर्मिती कृती समिती स्थापन झाली आहे. समिती सदस्यांनी सोमवारी (ता.२०) बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांचे प्रतिनिधी उपअभियंता गिरीश सूर्यवंशी व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन या कामाबाबत निवेदन दिले. पूल वजा बंधाऱ्याचे बांधकाम होण्यासाठी प्रशासकीय मंजुरी असताना केवळ पुलाच्या कामाचा घाट घातला जात असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले.

संकल्पचित्र विभागाने काढली अचानक त्रुटी

बंधारा बांधण्यासाठी मंजुरी असताना सुद्धा चारच दिवसांत कार्यकारी अभियंता संकल्पचित्र विभाग, नाशिक यांनी त्यांच्या पत्रानुसार यात त्रुटी काढली. गिरणा नदीचा सध्याचा वेग जास्त आहे त्यामुळे या ठिकाणी पूल कम बंधारा बांधणे योग्य नाही, असा अभिप्राय त्यांनी अहवालात दिला.

तसेच त्यासंबंधी त्रुटी दूर करून त्याची पूर्तता करण्याचे निर्देश कार्यकारी अभियंता, जळगाव यांना दिले होते. मात्र, त्याची कोणतीही पूर्तता न करता प्रशासकीय शासन निर्णयातून बंधाऱ्याला वगळण्यात आले व पुलाच्या कामाला ४० कोटींची मान्यता देऊन कार्यादेशही देण्यात आल्याचे कृती समितीने म्हटले आहे.

PWD News
Leprosy: जळगाव जिल्ह्यात कुष्ठरोग निर्मूलन मोहीम; ‘शून्य कुष्ठरोग रुग्ण’ उद्दिष्ट

कृती समिती आक्रमक

बंधारा रद्द केला म्हणून त्याचा पुन्हा समावेश करण्यात यावा व जळगाव शहर व ग्रामीण विभागाची पाण्याची टंचाई दूर करावी या मागणीसाठी कृती समितीने निवेदनही दिले. बंधाऱ्याचे काम समाविष्ट केले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समितीने या पत्राद्वारे दिला आहे. या वेळी सरिता माळी - कोल्हे, विष्णू भंगाळे, जमील देशपांडे, अनंत जोशी, फारुक शेख, आशुतोष पाटील व ललित शर्मा आदी उपस्थित होते. कृती समिती जळगाव जिल्ह्यातील तिन्ही मंत्री महोदयांची बैठक घेऊन यावर पुढील रणनीती ठरवेल, असे कळविण्यात आले आहे.

नदीचे पात्र बघता बंधारा तांत्रिकदृष्ट्या अशक्य : सोनवणे

गिरणा नदीचे याठिकाणचे पात्र जवळपास ३०० मीटरचे आहे. सध्याचा महामार्गावरील पूल किती उंच व मोठा आहे, त्यावरुन जुन्या पुलाच्या ठिकाणी असलेल्या पात्राची भव्यता दिसून येते. तांत्रिकदृष्ट्या याठिकाणी बंधाऱ्याचे काम शक्य वाटत नाही. तापी नदीवरील निम्न तापी प्रकल्प (पाडळसे धरण) पूर्ण झाल्यानंतर त्याचे बॅकवॉटर आणि बांभोरीलगत बंधारा केल्यास त्याचे बॅकवॉटर यामुळे वेगळीच समस्या निर्माण होऊ शकते.

शिवाय बंधाऱ्याचे काम समाविष्ट केल्यास किमान १२५ ते १५० कोटी रुपयांचा निधी लागेल, मान्यता केवळ ४० कोटींचीच आहे. अशा वेळी ४० कोटीत पुलाचे काम शक्य आहे म्हणून मंत्री व सचिव पातळीवरुन हा निर्णय झाला आहे, तो बदलता येणार नाही. तसा तो बदलायचा असेल व बंधाऱ्याचे काम समाविष्ट करायचे असेल तर शासनाकडून धोरणात्मक निर्णय व आवश्‍यक तेवढा निधीही लागेल, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

PWD News
Crop Insurance: विमा कंपनीचे अपील फेटाळले; शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळायचा मार्ग मोकळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.