जळगाव : बौद्ध समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संजू बिस्मिल्ला पटेल या संशयिताला सोमवारी (ता. २१) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयीन कामकाजाप्रसंगी एकवटलेल्या जमावाने संशयितावर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हल्ला करणाऱ्यांपैकी एकाला पकडून झोडपून काढल्याने पळून गेलेल्या तरुणांनी नंतर न्यायालयाच्या दिशेने दगडफेक करून संताप व्यक्त केला.
जळगाव शहरात दूध फेडरेशनमागील राजमालतीनगरातील संजू बिस्मिल्ला पटेल व त्याचा भाऊ राजू पटेल यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात ॲट्रॉसीटी अंतर्गत गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्यात संजू पटेल याला शहर पोलिसांनी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयात संशयिताला आणत असल्याची माहिती झाल्यापासूनच न्यायालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणावर बौद्ध समाजबांधवांनी गर्दी करायला सुरवात केली होती. (Repercussion of Slander towards Buddhist community Stones thrown at suspect in court Crowd dispersed after baton Jalgaon News)
न्यायालय परिसरात तणाव
कामकाजाप्रसंगीच हल्ला होतो, की काय याची कल्पना आल्याने संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी संशयिताला सुरक्षित कैदी गार्डमध्ये बसवून ठेवत ‘कोणीही संशयिताला विचारल्याशिवाय बाहेर काढू नका’, अशा सूचना दिल्या होत्या. न्यायालयीन कामकाज होऊन दोन पोलिस संजू पटेल याला गाडीच्या दिशेने नेत असताना, चार-पाच तरुणांचा टोळक्याने धावत येत संशयिताला पोलिस गाडीतून ओढून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखल्याने ते अयशस्वी झाले.
सौम्य लाठीमाराचे पडसाद
न्यायालयाच्या आवारात परिस्थिती चिघळत असल्याची जाणीव झाल्याने खबरदारी म्हणून रखीव पोलिस बलाच्या तुकडीला पाचारण करण्यात आले. संशयित संजू पटेल याला पोलिस गाडीतून ओढून बाहेर काढत असताना, राखीव पोलिसांनी लाठीचार्ज केला. दोघा- तिघांना लाठ्या बसल्याने एक ताब्यात आला, तर इतर पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलिसांनी लाठीमार केला, म्हणून न्यायालयाबाहेर असलेल्या जमावाने पोलिसांच्या दिशेनेच दगडफेक केल्याने एकच खळबळ उडाली.
संशयितास पोलिस केाठडी
संशयित संजू पटेल याला न्यायाधीश शरद पवार यांच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने संशयितास ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे ॲड. केतन ढाके यांनी कामकाज पाहिले.
दगडफेकीत पोलिस, लाठीमारात दोघे जखमी
न्यायालय आवारात संशयितावर हल्ला चढविण्याचा, दगडफेकही झाली. त्यात सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशींसह अन्य एक कर्मचारी जखमी झाला, तर पोलिसांच्या लाठीमारात विशाल राजू अहिरेच्या डोक्यात काठी लागली व विजय वसंत अहिरे हाही जखमी झाला. त्यांच्यासह अन्य आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
आरसीबी प्लाटूनची खरडपट्टी
न्यायालय आवारात संशयितावर हल्ला व दगडफेक झाल्याचा प्रकार घडला. शहर पोलिस ठाण्यासमोरील रविवारी झालेला तणाव लक्षात घेता सोमवारी शीघ्र कृती दलाचे (आरसीबी) जवान तैनात केले होते. असे असूनही न्यायालय आवारात हा प्रकार कसा घडला, त्यावरून अतिरिक्त पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक संदीप गावित यांनी या जवानांची चांगलीच खरडपट्टी काढली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.