जळगावः वाळू माफियांचा पाठलाग करणाऱ्या फैजपूर विभागीय अधिकाऱ्यांच्या (प्रांताधिकाऱ्यांच्या) गाडीला बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने पळून जाण्याच्या प्रयत्नात जोरदार धडक दिल्याची खळबळजनक घटना काल रात्री उशिरा यावल तालुक्यातील न्हावी जवळ घडली. यावेळी विभागिय अधिकाऱ्यांचा जीपचा चालक जखमी झाला असून शासकीय गाडीचेही नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती उपविभागीय महसूल अधिकारी कैलास कडलग यांनी सकाळशी बोलताना दिली.बुधवारी रात्री उशिरा अकराच्या सुमारास बेकायदेशीर वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी आपल्या शासकीय वाहनातून चालक उमेशसह या डंपरचा पाठलाग यावल- किनगांव दरम्यान केला. मात्र अंधाराचा फायदा घेत हा डंपर किनगाव भागात पळून जाण्यात यशस्वी झाला. तेथून परत येताना श्री. कडलग यांना न्हावी गावाकडे एक वाळू वाहतूक करणारा डंपर जाताना दिसला. त्यांनी या डंपरचा पाठलाग करतात डंपर सुसाट वेगाने न्हावी गावातील अडचणीच्या अरुंद गल्लीत शिरला. तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात डंपर रिव्हर्स नेताना शासकीय गाडीला पुढून जोरात धक्का लागून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे वाहन चालक उमेश यांनाही झालेल्या ओढाताणीत वाळूमाफियांनी धक्काबुक्की केली असून त्यांना मुका मार लागलेला आहे.
चालकाला पोलिसांनी केली अटक
याप्रकरणी या डंपरला संरक्षण देणाऱ्या १०१० क्रमांकाच्या पांढऱ्या कारसह डंपरला ताब्यात घेण्यात आली आहे. सुसाट वेगाने डंपर चालवणाऱ्या अठरा एकोणीस वर्षाच्या युवकाला ही पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
पोलिस केव्हा कारवाई करणार
विना क्रमांकाच्या या डंपर्समधून वाळू वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने होत असल्याचे महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी धडक कारवाई करण्याची अपेक्षा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
ती कार कोणाची?
या बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरला संरक्षण देणारी १०१० क्रमांकाची पांढऱ्या रंगाची कार कोणाची आहे? राजकिय नेते अशा प्रकारे बेकायदेशीर वाळू वाहतुकीला संरक्षण देत असतील,अधिकाऱ्यांच्या गाडीची नुकसान होणार असेल, कर्मचारी जखमी होणार असतील तर अधिकाऱ्यांनी काम कसे करायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.