चोपडा (जि. जळगाव) : देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना महाराष्ट्रात राहून आमच्या नशिबी मरणयातना सोसत आहेत. सीमाभागातील ही आदिवासी जनता अजूनही मूलभूत समस्यांशी झगडत आहे. राज्य शासन जि. प. सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थाही समस्यांकडे ढुंकून पाहायलाही तयार नाही, अशी भावना मध्य प्रदेश सीमेवर स्थायिक चोपडा तालुक्यातील दुर्गम पाड्यातील आदिवासी बांधवांची आहे. (sentiments of the tribals in the border areas of Chopda due to lack of facilities Latest Jalgaon News)
आदिवासी बहुल तालुका असलेल्या चोपड्याच्या उत्तर भागात पर्वत भागातील सातपुडा पर्वतरांग म्हणजे महाराष्ट्र व मध्य प्रदेशाची सीमा आहे. या सीमेवर महाराष्ट्र राज्यातील ३२ आदिवासी गावे, वाड्या-वस्त्या वसलेल्या आहेत. आदिवासी गावे मध्य प्रदेशाची सीमेच्या नजीक आहेत. फक्त मधे अनेर नदी आहे. नदी ओलांडली तर मध्य प्रदेश आहे.
नागरी सुविधांपासून वंचित
रस्ते, वीज, पाणी, मोबाईल कनेक्टिव्हिटी, शाळा, आरोग्य या सगळ्याच बाबी दुर्लक्षित आहेत. स्वातंत्र्य मिळून साडेसात दशक उलटूनहनही रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, बससेवा अशा मूलभूत सुविधाही अजून काही वाड्या-वस्त्यांवर पोचलेल्या नाहीत.
उत्तमनगर, मोरचिडा, सत्रासेन, अमलवाडी, उमर्टी, गौऱ्यापाडा, वैजापूर, कर्जाणे, खाऱ्यापाडाव, मुळ्यावतार, शेंदपाणी यांसह ३२ गावे सातपुडा पर्वतरांगांमध्ये आदिवासी बांधव विखुरलेले आहेत.
नदी ओलांडल्यावर नेटवर्क
राज्याच्या सीमेत या पाड्यांवर मोबाईल नेटवर्कही मिळत नाही. दोन्ही राज्यांच्या मधली अनेर नदी ओलांडल्याबरोब नेटवर्क मिळते. तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही एवढा फरक असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
हेही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?
एसटी पोचलीच नाही
देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना अजूनही काही आदिवासी भागातील वाड्या-वस्त्यांत एसटी पोचली नाही. आदिवासींना पायपीट करीत यावे लागते. घोडाचापर, गोमाल, गौऱ्यापाडा यांसह नवाड भागातील आदिवासींपर्यंत एसटी पोचू शकलेली नाही.
रस्ते नाहीत, वाट बिकट
पक्के रस्ते नाहीत. साधं पायी चालता येत नाही, वाहन कुठून जाणार? शाळेपर्यंत जाण्यास रस्ते नाहीत, दळणवळणाची साधनेही नाहीत. रुग्णवाहिका पोचू शकत नसल्याने गरोदरमाता, स्तनदामाता यांना वेळेवर सेवा मिळत नाहीत. लसीकरणासाठी अनेक अडचणी येतात. नवाड भागात तर रस्तेच नाहीत.
पुलाची मागणी धूळखात
महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांच्या सीमेवर जोडणारा कर्जाणे ते धवलीदरम्यानच्या रस्त्यावर पुलाची मागणी तब्बल १२ वर्षांपासून केली आहे. थेट राष्ट्रपती, मुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी यांच्याकडे मागणी करूनही अद्याप कारवाई होत नसल्याने प्रस्ताव धूळखात पडून असल्याचे माजी सरपंच प्रकाश बारेला यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
"या क्षेत्रातील रहिवासी अनेक वर्षांपासून नागरी सुविधांपासून वंचित आहेत. मूलभूत सुविधा नसताना गावपाड्यांचा विकास तर दूरच राहिला. वर्षानुवर्षे हीच स्थिती असेल, तर नदी ओलांडून पलीकडच्या राज्यात चांगल्या सुविधा मिळत असतील तर आम्ही तेथे जाऊ, अशी भावना ग्रामस्थांची आहे."- प्रकाश बारेला, माजी सरपंच, कर्जाणे (ता. चोपडा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.