जळगाव : भारत सरकारने अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रध्वजाच्या संहितेत बदल करून ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले. जळगाव शहरातील तरुण योगेश बडगुजर याने चक्क युरोप खंडातील सर्वोच्च ‘एल्ब्रुस’ शिखरावर चढाई करत स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकवला.
जळगाव शहरातील गुजराल पेट्रोलपंपाजवळील दादावाडी परिसरातील रहिवासी योगेश प्रकाश बडगुजर (वय २८) मुंबई महापालिकेत फायरमन आहे. नोकरीनिमित्त तो मुंबईत स्थायिक असून, दादावाडी येथे वडील प्रकाश, आई रत्नाबाई, मोठा भाऊ विजय राहतात. (Latest Marathi News)
यापूर्वीही शिखर सर
त्याने यापूर्वी त्याने आफ्रिका खंडातील सर्वांत उंच शिखर माऊंट किलीमांजारो (उंच ५८९५ मीटर) २५ जून २०२२ ला सकाळी पावणेआठला सर केले होते. महाराष्ट्रातील सोंडाई, कर्नाळा, पेबविकट, कळसुबाई आणि माहुली, सिक्कीममधील रेनॉक आदी शिखरे सर करून आपल्या कर्तबगारीची ओळख महाराष्ट्राला करून दिली आहे.
सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करण्याचा संकल्प
जगात ७ खंड असून, योगेशने युरोप, आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखरे पादाक्रांत केली आहेत. उत्तर अमेरिका खंडातील डेनाली (६१९० मीटर), दक्षिण अमेरिका खंडातील माउंट ऑक्सोबोव्ह (६९६२ मीटर), अंटार्टिका खंडातील विन्सन मॅसीक (४८९२), ऑस्ट्रेलिया खंडातील कॉस्ट्यूज-को (२२२८ मीटर) आणि आशिया खंड व जगातील सर्वांत मोठे शिखर एव्हरेस्ट (८८४८. ८६ मीटर) शिखर पादाक्रांत करण्याचा मनोदय योगेशने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.
प्रतिकूल स्थितीत जिद्द कायम
रशिया- युक्रेन युद्धामुळे व्हीसा मिळण्यापासून अडचणींची सुरवात झाली. त्यावर मात करत १० ऑगस्टला युरोपात दाखल झाल्यानंतर मूळ अभ्यासाची उजळणी करून शुक्रवारी (ता. १२) योगेश बडगुजर (जळगाव), प्रणीत शेळके (मुंबई), अभय मोरे (सांगली), डॉ. मनीषा सोनवणे (पुणे) यांनी चढाईला सुरवात झाली. ताशी ४५ ते ५० किलोमीटर वेगाचा वारा, उणे २५ ते ३० अंश तापमानात एब्रुल्स नॅशनल पार्कच्या तज्ज्ञांनी नकार दिला. मात्र, चौघांच्या मनाचा दृढनिश्चय आणि ‘अमृतमहोत्सवी’ उद्दिष्ट्य त्यांना या शिखरावर घेऊन गेले.
गरीबाची शिखरांऐवढी स्वप्न
योगेशने एम. जे. कॉलेजमधून बीएस्सीचे शिक्षण पूर्ण केले. अगदी सामान्य कुटुंबात वडील आजही दुसऱ्याच्या दुकानावर शिवणकाम करायला जातात. आई गृहिणी असून, अल्पशिक्षितच आहे. त्याने दार्जिलिंगच्या हिमाचल माऊंटेनरिंग स्कूलमधून गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतले आहे.
आई-बाबा अन् मीही रडलो...
कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताचीच. मी युरोप खंडातील सर्वोच्च एल्ब्रुस शिखर सर केल्यावर घरी बोलायचे होते. मात्र, कुटुंबात भ्रमणध्वनी नसल्याने इंटरनेटअभावी बोलणे होईना. आत्याच्या घरी फोन केल्यावर आई-बाबा, भावाशी बोललो. आई अल्पशिक्षित असल्याने मी काहीतरी केलयं इतकंच तिला कळालं. आईच्या जडस्वरातून लेकराचं कौतुक कानी पडल्यावर आम्हाला तिघांनाही रडू कोसळलं, असा अनुभव योगेशने सांगितला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.