जळगाव : अंत्योदय योजनेत जिल्ह्यातील दिव्यांग, विधवा, परितक्त्या, भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, दुर्धर आजारग्रस्त, आदिवासी व्यक्ती, ६० वर्षावरील वृद्ध ज्यांना कुठलाही आधार नाही तसेच दारिद्रय रेषेखालील नागरिकांचा समावेश करून त्यांना या योजनेंतर्गत धान्याचा लाभ द्यावा.
ज्या लाभार्थींनी गेल्या वर्षभरात धान्य घेतलेले नाही त्यांची यादी तयार करावी. गरजूंना धान्याचा लाभ देण्यासाठी धोरण आखावे, रेशनच्या मालाची अफरातफर होत असल्याचे आढळून आल्यास दोषींवर कठोर कारवाई करावी, अशा सूचना अन्न, नागरिपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी (ता. २५) येथे दिल्या.
येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात मंत्री भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, वैधमापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक बी. जी. जाधव, निरिक्षक सी. डी. पालीवाल, जिल्हा मार्केटींग अधिकारी एन. डी. मगरे, आयुक्त कार्यालयातील तहसीलदार साहेबराव शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.
शिवभोजन केंद्रात सर्वांना इष्टांक सारखा
मंत्री भुजबळ म्हणाले, की राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब योजनेत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना प्राधान्याने रेशनकार्ड उपलब्ध द्या. शिवभोजन केद्राच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत. शिवभोजन केंद्रांना नियमितपणे भेट देऊन तेथील तपासणी करावी. गरजू नागरीकांची शिवभोजनची गरज लक्षात घेऊन केंद्र वाढविण्यात यावेत. प्रत्येक केंद्रासाठी इष्टांक एकसारखा राहील याची दक्षता घ्यावी. भरडधान्य केंद्रावर नावनोंदणीची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपत आहेत. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन नाव नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहे.
५७ टक्के लाभार्थी प्राधान्य कुटुंब योजनेत
यावेळी जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले की, जिल्ह्यातील ५७ टक्के लाभार्थी प्राधान्य कुटुंब योजनेत समाविष्ट आहेत. आगामी काळात तीन महिन्याच्या धान्याची उचल करावयाची असल्याने पाळधी येथील गोडावून भाड्याने घेणे आवश्यक आहे. अमळनेर व पाचोरा येथे गोडावून बांधण्याचा प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे त्यास मंजुरी मिळावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.