Jalgaon Accident News : पहूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक तथा ‘सकाळ’चे पहूर येथील बातमीदार शंकर भामरे हे आपली मुलगी ज्ञानेश्वरी भामेरे हिला सायकलने बसस्थानकावर घेऊन येत असताना मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. (student died in collision with truck jalgaon accident news)
या अपघातात वडील शंकर भामरे व मुलगी ज्ञानेश्वरी रस्त्यावर फेकले गेले. यात विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी भामेरे (वय ११) हिला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर शंकर भामेरे हे जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (ता. ८) सकाळी पावणेआठच्या सुमारास घडली. दरम्यान, ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समजताच संतप्त नागरिकांना ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.
अपघातात मृत झालेली ज्ञानेश्वरी ही आज जळगाव येथे स्वतः लिहिलेल्या कविता सादर करण्यासाठी कविसंमेलनाला जात होती. तिला बसस्थानकावर सोडविण्यासाठी वडील शंकर भामरे सायकलवर तिला घेऊन येत होते. दरम्यान, आयशर ट्रक (क्रमांक एमएच २३, ए यू ५५८२) वरील चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रकने समोरून जाणाऱ्या पिता-पुत्रीच्या सायकलला जोरदार धडक दिली.
यात ज्ञानेश्वरीचा जागीच मृत्यू झाला. शवविच्छेदन करून दुपारी एकला शोकाकुल वातावरणात ज्ञानेश्वरी हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, ट्रकचालक सुनील ज्ञानदेव सोनवणे (रा. अंजनवटी, ता. जि. बीड) यास पहूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नागरिकांनी महामार्ग रोखला
सध्या सर्वत्र रस्त्याचे काम सुरू असून, काम अपूर्ण अवस्थेत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. त्याचाच बळी ज्ञानेश्वरी ठरली आहे. जळगाव -संभाजीनगर महामार्गालगत असलेल्या वाघूर नदीवरील पुलाचे काम सध्या सुरू आहे. रस्त्याचे अवस्था गंभीर असून, येणाऱ्या जाणाऱ्यांना त्याचा भयंकर त्रास होत आहे. या ठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघातही दररोज होत आहे.
या रस्त्याचे काम त्वरित व्हावे, यासाठी अंत्यसंस्कार आटोपताच पहूर येथील सर्वपक्षीय नेत्यांनी व नागरिकांनी पहूर बसस्थानक परिसरात रास्तारोको आंदोलन केले. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा, रामेश्वर पाटील, महेश पाटील आदींनी संतप्त भावना व्यक्त करून रस्त्याचे काम त्वरित करावे, दरम्यान रस्त्याचे काम त्वरित न झाल्यास पुन्हा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा तसेच बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला.
...अन् ज्ञानेश्वरीची कविता राहिली अधुरी
ज्ञानेश्वरी ही पहूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाची पाचवीत शिकणारी अत्यंत हुशार विद्यार्थिनी होती. तिचे वडील शंभर भामेरे हे त्याच शाळेत शिक्षक आहेत. ज्ञानेश्वरी आज जळगाव येथे स्वतः लिहिलेल्या कविता सादर करण्यासाठी कविसंमेलनाला जात होती तर तिचे वडील तिला सायकलवरून बसस्थानकावर सोडवून जामनेर येथे विज्ञान प्रदर्शनासाठी जाणार होते.
दरम्यान, नदीवरील पुलाजवळ आल्यानंतर भरधाव ट्रकने त्यांच्या सायकलला धडक दिल्याने पिता-पुत्री दोघेही फेकले जाऊन क्षणार्धात ज्ञानेश्वरीची प्राणज्योत मालवली.काळाने घाला घातल्याने तिची कविता अधुरीच राहिली. तिच्या पश्चात आई, वडील, बहिण, आजोबा, काका असा परिवार आहे. ती शिवभक्त रंगनाथ महाराज यांची नात होती. तिच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.