Jalgaon News : शासनाने माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी अहिल्याबाई होळकर मोफत एसटी पास सवलत योजना लागू केली आहे. परंतु हा मोफत पास जळगावच्या एसटी आगारातून मिळविताना अनेक अडचणी, चुकीच्या फतव्याचा अडथळा पार करावा लागत आहे.
या आगारात त्यासंबंधी विद्यार्थिनींची अडवणूक केली जात असल्याचाही प्रकार सुरू आहे.(Students demand for free ST pass jalgaon news)
मोफत एसटी पाससंबंधी एसटी आगारासह शाळाही सहकार्य करीत नाहीत. त्यामुळे शेकडो विद्यार्थिनी या पास सवलत योजनेपासून वंचित आहेत. २०२३-२४ मध्ये शाळांचे पहिले सत्र सुरू होतानाच म्हणजेच जूनमध्ये शाळांकडून आपल्या विद्यालयातील मोफत एसटी पास सवलत योजनेसाठी पात्र विद्यार्थिनींची यादी, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे पत्र पाठविण्यात आले.
त्यानंतर संबंधित विद्यार्थिनींचा वर्ग व इतर माहिती नमूद करून या पास सवलतीचा लाभ विद्यार्थिनींना दिला जावा, असे स्वतंत्र पत्रही जळगावच्या एसटी आगाराला देण्यात आले. यानंतर या योजनेतून त्रैमासिक मोफत पास ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना देण्यात आले. ही पास देतानाच सर्व कागदपत्र, शेरे एसटी आगाराने शाळांकडून घेतले होते.
या पासचे नूतनीकरण दर तीन महिन्यांनी करताना पुन्हा शाळेचे पत्र, एसटी पास योजनेसाठी संबंधित विद्यार्थिनी पात्र असल्याची यादी, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे पत्र जळगाव येथील एसटी आगार किंवा संबंधित प्रशासन विभागाकडून मागितले जात आहे. ही कागदपत्रे न दिल्यास पास मिळणार नाही, असे एसटीचे आगारप्रमुख व संबंधित विद्यार्थिनींसह त्यांच्या पालकांना सांगत आहेत.
ही कागदपत्रे विद्यार्थिनी पुन्हा कशी मिळवतील, असा मुद्दा आहे. एकदा पत्र, यादी व शिक्षण विभागाचे पत्र एसटी आगाराला संबंधित शैक्षणिक वर्षासाठी दिल्यानंतर ते पुन्हा एसटीच्या जळगाव आगारातून किंवा संबंधितांकडून का मागितले जात आहेत, असाही प्रश्न विद्यार्थिनी, पालकांनी उपस्थित केला आहे. हा प्रकार म्हणजेच अडवणुकीचा असून, शासकीय योजनांचा लाभ मिळू न देण्यासाठीच जणू जळगावचा एसटी विभाग काम करीत असल्याची तक्रारही पालक करीत आहेत.
अनेक विद्यार्थिनी पास मिळत नसल्याने पदरचे भाडे खर्च करून एसटीतून प्रवास करीत आहेत. त्यामुळे योजनांचा उपयोगच काय, तिचे उद्दिष्टच यशस्वी होत नसल्याची नाराजीही पालक व्यक्त करीत आहेत.
''मोफत एसटी पास योजनेतून माझ्या कन्येसाठी पास मिळविताना मी २०२३-२४ हे शैक्षणिक वर्ष सुरू होतानाच शिक्षणाधिकारी यांच्या सहीचे किंवा मंजुरीचे पत्र, शाळेचे पत्र, माझी पाल्य पास योजनेत पात्र असल्याची यादी जळगावच्या एसटी आगारास दिली होती.
पास नूतनीकरण करताना पुन्हा हीच कागदपत्रे एसटी आगारात पास वितरण विभागात मागितली जात आहेत. त्यासाठी पालकांना हकनाक त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रकार ‘हम करे सो कायद्या’चा आहे.''- एक पालक, जळगाव
''मोफत एसटी पास सवलत योजनेतून पासचे नूतनीकरण करतानादेखील संबंधित विद्यार्थिनींनी शाळेतून पास सवलत योजनेसाठी पात्र असल्यासंबंधीचे आवश्यक पत्र, शिक्षण विभागाचे पत्र व शाळेतून यादी आणावी.
त्याशिवाय अहिल्याबाई होळकर मोफत पास सवलत योजनेतून विद्यार्थिनींना पासचे नूतनीकरण करून दिले जाणार नाही. शानादेशानुसार आम्ही ही कार्यवाही करीत आहोत.''- संदीप पाटील, आगार व्यवस्थापक, जळगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.