अडावद (ता. चोपडा) : एखाद्याने खूप मेहनत करावी अन् उच्चशिक्षण घेण्यासाठी नेहमीच झटावे मात्र, यश हाती लागायला खूपच उशीर व्हावा, पण जिद्द कामी यावी अन् घेतलेल्या कष्टाला फळ मिळून अखेर ठरवलेलं ध्येय गाठता आलं, याचा अनुभव येथील सार्वजनिक विद्यालयात नुकतेच शिक्षक म्हणून रुजू झालेले जीवन हटेसिंग सिसोदे यांनी प्रत्यक्ष अनुभवला. सिसोदे यांची गावात पावविक्रेता ते आता शिक्षकपदापर्यंचा कष्टमय प्रवास तरुणाईसाठी निश्चितपणे प्रेरणादायी असाच आहे. (Success Story young pav seller became teacher)
जामनेर तालुक्यातील देवळसगाव येथील रहिवासी असलेले जीवन यांची कौटुंबीक आर्थिकस्थिती बिकटच. अशिक्षित आईवडिलांसह कंपनीत काम करणारा मोठा भाऊ राहुलसोबत राहत होते. शिक्षण घेऊन मोठं व्हावं, ही जिद्द ठेवणाऱ्या जीवनचं प्राथमिक शिक्षण गावातच झालं, माध्यमिक शिक्षण आश्रमशाळेत राहून पूर्ण केले.
दहावीनंतर बारावीच्या परीक्षेचा पल्ला गाठताना शालेय खर्च भागविण्यासाठी जीवनने तालुक्याच्या गावावरून पाव आणून गावात पहाटे उठून विकले. त्यातून आलेल्या पैशांतून शाळेचा खर्च भागवला. बारावीला विशेष प्रावीण्य मिळाल्यावर म्हसावद येथील अध्यापक (डीएड) विद्यालयात प्रवेश मिळाला.
खर्च भागावा म्हणून हॉटेलमध्ये रात्री वेटरची नोकरी केली. दिवसा कॉलेज व रात्री वेटरची नोकरी जीवनने केली. त्यातून येणाऱ्या पैशांतून खर्च भागवला. परंतु, जिद्द होती शिक्षक होण्याची. म्हणून डीएड झाल्यावर जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयात ‘बीए’ला प्रवेश घेतला. त्याचवेळी जळगावातील खासगी रुग्णालयात ‘वार्डबॉय’ म्हणून नोकरी करीत शिक्षणाचा व राहण्याचा खर्च भागवीत ‘बी.ए.’ पूर्ण केलं.
त्यानंतर २०१५ व २०१६मध्ये टीईटी व सीईटी परीक्षा उत्तीर्ण केली. स्पर्धा परीक्षाही अनेकदा उत्तीर्ण केल्या मात्र, थोड्या गुणांनी यश हुलकावणी द्यायचे. २०१७मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली मात्र, नोकरी मिळाली नाही. म्हणून २०१९मध्ये सेट (व्याख्याता पात्रता परीक्षा) परीक्षा उत्तीर्ण केली. (latest marathi news)
त्यानंतर आशेचा किरण गवसला अन् जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयात तासिका तत्त्वावर प्राध्यापकाची नोकरी मिळाली. मात्र, २०२२मध्ये दिलेल्या ‘टीईटी’ परीक्षेत यश मिळाल्यावर ‘पवित्र पोर्टल’द्वारे जीवन यांना अडावद येथील सार्वजनिक विद्यालयात शिक्षकाची नोकरी मिळाल्याने ते नुकतेच रुजू झाले.
इथपर्यंतच्या प्रवासात महामंडलेश्वर जनार्दन महाराज, भरत ननवरे, हेमंत झोपे आदी अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रांतील व्यक्तींनी, मित्रांनी त्यांना मदत केली. जळगावच्या नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील यांनी नुकताच त्यांचा सत्कार केला. शिक्षकाची नोकरीसोबतच जीवन सध्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाअंतर्गत पीएच.डी. व स्पर्धा परीक्षेचाही अभ्यास करीत आहेत.
"जीवनात कष्टाला खूपच महत्त्व आहे. म्हणून ध्येय ठरवलेल्या माझ्या सारख्या अनेक मित्रमैत्रिणींनी कष्ट करीत परिस्थितीवर मात करीत नियमित अभ्यास केला, तर आपल्याला यश निश्चितपणे मिळते, हे मी अनुभवलंय, एवढच मी सांगेन."
- जीवन हटेसिंग सिसोदे, शिक्षणसेवक, सार्वजनिक विद्यालय, अडावद.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.