भडगाव : शेतकरी आत्महत्या कुटुंबाला धीर देण्यासाठी शासनाने उभारी अभियान हाती घेतले आहे. त्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला विविध योजनांचा लाभ दिला जातो. पण प्रांताधिकारी राजेंद्र कचरे व तत्कालीन तहसीलदार माधुरी आंधळे यांच्या आवाहनाला साद देत अंजनविहिरे (ता. भडगाव) येथील ‘त्या’ शेतकऱ्याच्या विधवा पत्नीला एका दानशूर व्यक्तीने शिलाई मशिन भेट दिले, तर ग्रामपंचायतीने त्या महिलेची शिवणकामाच्या प्रशिक्षणाचे शुल्क भरून तिला खऱ्या अर्थाने उभारी देण्याचे काम केले.
शासानाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना धीर देण्यासाठी उभारी अभियान हाती घेतले आहे. भडगाव तालुक्यात प्रशासनाने या अभियानांतर्गत अशा कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला, तर अंजनविहिरे येथील निंबा पुरुषोत्तम पाटील या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीला स्वतःच्या पायावर उभे राहता यावे म्हणून दानशूर व्यक्तींना आवाहन केले होते. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे व तत्कालीन तहसीलदार माधुरी आंधळे यांच्या या आवाहनाला साद देत भडगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते जाकिर कुरेशी यांनी आशा निंबा पाटील यांना एक शिवणयंत्र भेट दिले, तर अंजनविहिरे ग्रामपंचायतीने या महिलेला ग्रामपंचायत निधीतून प्रशिक्षण दिले. नुकताच नऊ हजार रुपये प्रशिक्षण शुल्काचा धनादेश त्यांना देण्यात आला.
या वेळी सरपंच सपना पाटील, ग्रामसेवक एच. बी. पाटील, शशिकांत पाटील आदी उपस्थित होते. त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. यामुळे ‘त्या’ स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकणार आहेत. याशिवाय पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर केला असल्याचे ग्रामसेवक एच. बी. पाटील यांनी सांगितले. प्रशासनाच्या या मदतीमुळे खऱ्या अर्थाने उभारी मिळाल्याची प्रतिक्रिया आशा पाटील यांनी व्यक्त केली. तालुका प्रशासनाकडून इतर आत्महत्याग्रस्त कुटुंबांनाही विविध माध्यमातून मदत केली जात आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.