जळगाव : गेल्या चार- पाच वर्षांपासून अत्यंत दुरवस्था झालेल्या जळगाव शहरातील प्रमुख रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. यापैकी सहा रस्त्यांच्या कामांचे कार्यादेश देण्यात आले असून जवळपास ८ कोटींच्या निधीतून होणाऱ्या या कामास सुरवातही झाली आहे. मार्च अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य आहे. (The main roads in Jalgaon will be developed in march end)
जळगाव शहरातील रस्त्यांची गेल्या पाच वर्षांपासून दुरवस्था कायम आहे. २०१७-१८ मध्ये अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा व भुयारी गटारांचे काम सुरू झाल्यानंतर तर शहरातील प्रमुख व उपरस्त्यांची पूर्णपणे वाट लागली. वस्त्यांमधील रस्तेही या कामांसाठी खोदून ठेवल्याने संपूर्ण शहर खड्ड्यात गेले. गेल्या चार- पाच वर्षांपासून या प्रचंड खराब झालेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना अक्षरश: नरकयातना भोगाव्या लागत होत्या. सातत्याने बोंब उठल्यानंतर आता कुठे मनपा प्रशासन जागे झाले असून शासन, पालकमंत्री व मनपाच्या प्रयत्नातून रस्तेकामांचा मार्ग मोकळा झाला आहे.
रस्त्यांची कामे सुरू
अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेसाठी सर्व प्रमुख रस्ते दुतर्फा खोदण्यात आले. त्यावर तात्पुरते पॅचवर्कही झाले. तरीही रस्त्यांची दुरवस्था दूर झाली नाही. आता मात्र पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिलेल्या व काही प्रमाणात मनपाच्या निधीतून प्रमुख सहा- सात रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत. या कामांना सुरवातही झाली आहे.
स्वातंत्र्यचौक ते पांडेडेअरी
प्रमुख सहा- सात रस्त्यांच्या यादीत प्राधान्यक्रम ठरवून देण्यात आला आहे. त्यापैकी स्वातंत्र्यचौक ते पांडे डेअरी चौकापर्यंतच्या रस्त्याचे पूर्ण नूतनीकरणाचे काम गुरुवारपासून (ता. १३) हाती घेण्यात आले. हा रस्ता थेट अण्णाभाऊ साठे पुतळ्यापर्यंत होणार आहे. मात्र, पांडे डेअरी ते साठेंचा पुतळा या टप्प्यात अमृतचे काम बाकी असल्याने आधी ते तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे स्वातंत्र्य चौक ते साडे पुतळा (नेरीनाका चौक) अशा या खराब झालेल्या रस्त्याचे काम काही दिवसांत पूर्ण होऊ शकणार आहे.
मार्चपर्यंत पूर्ण होणार
एकाच मक्तेदाराकडे सोपविण्यात आलेल्या या रस्त्यांचे काम निधी अथवा यंत्रणेअभावी रखडणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. ही कामे ३१ मार्च २०२२पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. पालकमंत्र्यांनी नियोजन समितीतून दिलेल्या निधीपैकी ६ कोटी व मनपा निधीतून २ अशा ८ कोटींमधून ही कामे होत आहेत.
मक्तेदारावर असेल जबाबदारी
मनपा हद्दीत(jalgaon carporation) होणाऱ्या कामांच्या दर्जाबाबत नेहमी ओरड होत असते. त्यामुळे ही कामे करत असताना त्या कामांचा दर्जा व गुणवत्ता राखणे ही मक्तेदाराची जबाबदारी असेल. कार्यादेश देताना अटी- शर्तींमध्ये त्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. कामाच्या दर्जामुळे रस्ता खराब झाला तर त्याची दुरुस्ती मक्तेदारावर बंधनकारक असून पाच वर्षांसाठी ही तरतूद आहे.
या रस्त्यांचा समावेश
एकाच मक्तेदाराकडे या प्रमुख रस्त्यांच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत.
स्वातंत्र्यचौक- पांडे डेअरी- नेरीनाका चौक
पुष्पलता बेंडाळे चौक- पांडे डेअरी- सिंधी कॉलनी
टॉवर चौक- भिलपुरा चौक- ममुराबाद रस्त्यापर्यंत
स्टेट बँक (मुख्य शाखा)- बी.जे. मार्केट
रेल्वेस्थानक- नेहरु चौक
जुने एलआयसी ऑफीस- दाणाबाजारपर्यंत
यासह नवीपेठेतील काबरेज टायपिंग ते सरस्वती डेअरी (पूर्ण बँक स्ट्रीट), गोलाणी मार्केटलगतचे दक्षिणमुखी हनुमान मंदिर ते शीतल कलेक्शन, जुनी सरस्वती डेअरी ते जळगाव जनता बँक सेवा शाखा व पुढे निलेश गारमेंटस्पर्यंत हे रस्तेही यात होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.