कोरोना काळात रेल्वेची आर्थिक गाडी सुसाट..मिळविले ६०० कोटी रुपये उत्पन्न 

कोरोना काळात रेल्वेची आर्थिक गाडी सुसाट..मिळविले ६०० कोटी रुपये उत्पन्न 
Updated on

भुसावळ  : मागील वर्षी सुरू झालेल्या कोरोना महामारीमुळे विविध क्षेत्रांवर विपरीत परिणाम झाला होता. मात्र, त्या काळापासून २९ मार्चपर्यंत रेल्वेने विक्रमी मालवहन करून मागील वित्तीय वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात २० टक्के अधिक उत्पन्न मिळविले आहे. तसेच मागील वित्त वर्षापेक्षा १३ टक्के अधिक मालवहन भुसावळ विभागाने केले आहे. रेल्वेने ५.२ मिलियन टन लोडिंग करून ६०० कोटी रुपये उत्पन्न मिळविले, अशी माहिती भुसावळ विभागाचे मंडळ रेल्वे प्रबंधक विवेककुमार गुप्ता यांनी दिली. 


गुप्ता म्हणाले, की मागील कोरोना महामारीच्या काळात भुसावळ विभागातील रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनत आणि कार्याप्रति समर्पण वृत्ती यामुळे चालू वित्त वर्षात विभागाला केवळ मालवहन या क्षेत्रात २० टक्के अधिक उत्पन्न घेता आले. वित्तीय वर्ष २०१९-२०२० मध्ये विभागाने ५.२ मिलियन टन लोडिंग केले होते, तर चालू वित्त वर्षात आजपर्यंत विक्रमी ५.७ मिलियन टन लोडिंग केली आहे. विभागाला मालवाहन क्षेत्रात मागील वर्षी पाचशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. तर चालू वित्त वर्षात (२९ मार्च २०२१ पर्यंतची आकडेवारी) २० टक्के अधिक ६०० कोटी रुपये उत्पन्न मिळविले आहे. कोरोना काळात प्रवासी वाहतूक गाड्या काही कालावधीसाठी बंद असल्याने प्रवासी वाहतूक उत्पन्नात जवळपास ७५ टक्के घट मागील वर्षाच्या तुलनेत चालू वर्षात रेल्वेला सहन करावी लागली आहे.

२२० मालगाडी रेक्सचे वहन

मागील वित्त वर्षात मिळालेल्या ६०० कोटी रुपयाचे उत्पन्न यंदाच्या आर्थिक वर्षात मिळू शकले नाही. केवळ १२५ कोटींचे उत्पन्न प्रवासी वाहतुकीमधून विभागाला मिळाले आहे. भुसावळ विभागाने खाद्यान्न खाते आणि अन्य फळफळावळ शेती उत्पन्नावर आधारित मालाची एकूण २२० मालगाडी रेक्सचे वहन केले आहे. यामध्ये ६५ रेक्स कांद्याचे बांगलादेशला पाठविले. 

‘किसान’द्वारे केळीची मोठी वाहतूक 
देशात किसान रेल्वेची सुरवात भुसावळ विभागातून झाली आहे. आज देशभरात जवळपास एक हजाराहून अधिक किसान रेल्वे चालविल्या आहेत. त्यापैकी ७० किसान रेल्वे भुसावळ विभागाने संचालित केल्या आहेत. मागील पाच-सहा वर्षांपासून बंद असलेल्या केळी मालाची वाहतूक रेल्वेने पुन्हा सुरू केली असून, भुसावळ विभागातून रावेर, सावदा या भागातून मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या केळीसाठी जानेवारी ते मार्च २०२१ या काळात १६ मिनी रेक्स अवघ्या तीस तासांत रेल्वेने किशनगढ (दिल्ली) येथे पाठविल्या आहेत. भुसावळ आणि बोरगाव येथून नऊ मिनी रेक कापूस असलेले उत्तरपूर्व रेल्वेच्या राजपुरा आणि बनगाव येथे पाठविण्यात आले. तर नाशिक येथून १५० ऑटोमोबाईल रेक्स हटिया, फतुहा, चांगसरी, कलाईकुंडा याठिकाणी रवाना करण्यात आले. मागील वित्त वर्षीपेक्षा (५० रेक्स) ऑटोमोबाईल रेक्स वहनामध्ये तीनपट वाढ झाली आहे. 


संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.