जळगाव : येथील जिल्हा सर्व सेवा समितीने 'खादीचा प्रचार' या राष्ट्रीय कार्यासाठी दिलेल्या जागेचा अनधिकृतरीत्या व्यावसायिक वापर केला आहे. या प्रकरणी जिल्हा सर्व सेवा समितीची जागा सरकार जमा करण्याचे आदेश जळगावचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार नोटीस देवूनही संस्थेने अनधिकृत व्यावसायिक (वाणिज्य) वापर न थांबविल्याने ही कारवाई करण्यात आली. (Latest Marathi News)
तहसिल कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले, की शहरातील सिटी सर्व्हे क्रमांक २८३७ क्षेत्र १४८.६ चौरस मीटर जागा जळगाव जिल्हा सर्व सेवा समिती या संस्थेला अटी, शर्तीवर देण्यात आलेली आहे. ही मिळकत ‘ब’ सत्ता प्रकारातील आहे. उत्तर बाजूस प्रेस्टीज एक्सक्लुझिव्ह हे दुकान भाडेतत्वावर दिलेले आहे. उर्वरित क्षेत्रात जिल्हा सर्व सेवा समितीचे कपड्यांचे दुकान व कार्यालय आहे. वरील मजल्यावर पकवान हॉटेलला जागा भाड्याने दिलेली आहे. तिचे क्षेत्रफळ १४४.६५ चौरस मीटर आहे. या प्रकरणात शर्तभंग झालेला आहे. शर्तभंग नियमानुकूल होण्याआधीच त्या जागेचा वाणिज्य वापर सुरु ठेवलेला असल्याने ती जमीन सरकार जमा का करण्यात येवू नये? याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी १७ जानेवारी २०२२ ला नोटीस बजावली होती. संस्थेच्या चिटणीसांनी शर्तभंगबाबत भाडेकरुंना जागा खाली करुन देण्याबाबत नोटीस दिली आहे. लवकरच जागा खाली करुन घेऊ, असा खुलासा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केलेला आहे.
शासनाची फसवणूक
खादी प्रचार या राष्ट्रीय कार्यासाठी दिलेल्या जागेवर त्रयस्थ पक्षाकडून व्यावसायिक उपयोग करुन घेणे ही गंभीर बाब असून जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस देवूनही संस्थेने आजपर्यंत मिळकतीचा अनधिकृत वाणिज्य वापर थांबवला नाही. त्यामुळे शासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. म्हणून संपूर्ण जागा ताब्यात घेऊन बांधकामासह सरकार जमा करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. ही जागा सोमवारी (ता. १८) सकाळी अकराला सील करण्याची कारवाई महसूलचे अधिकारी करणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.