Jalgaon Rain News : अंजनी प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा झाल्यामुळे प्रकल्पातून अंजनी नदीच्या पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. प्रकल्पातून नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
यावर्षी पावसाळा सुरू होऊन सुमारे तीन महिन्यांचा कालावधी उलटून देखील जोरदार पाऊस न झाल्यामुळे अंजनी नदीचे पात्र कोरडेठाक पडले होते. नदीच्या पात्रातून केवळ शहरातील गटारींचे सांडपाणी वाहत असल्यामुळे पात्राला डबक्याचे स्वरूप आले होते. नदीच्या पात्रात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. (water Discharge into river bed from Anjani project jalgaon news)
शनिवारी रात्री शहरासह ग्रामीण भागात अतिवृष्टी झाल्यामुळे नदी व नाल्यांना पूर आला तसेच अंजनी प्रकल्पात शंभर टक्के जलसाठा झाल्यामुळे प्रकल्पातून नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
अंजनी नदीचे पात्र वाहू लागल्यामुळे हिंगोणा, जवखेडा, कल्याणे, भोड यासह नदीकाठच्या गावांना त्याचा फायदा होणार असून, विहिरींच्या पातळीत वाढ होण्यास मदत होणार असल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे नदीचे पात्र वाहू लागले
असून, नदीच्या पात्रातील घाण वाहून जाण्यास मदत होत आहे. प्रशासनाने नदीच्या पात्राची स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष केले. मात्र निसर्गाने नदीचे पात्र स्वच्छ केल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. अंजनी नदीवर रंगारी गल्ली ते गांधीपुरा या भागांना जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम करण्यात आल्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे. यावर्षी पावसाळ्यात प्रथमच अंजनी नदीचे पात्र वाहत आहे.
अंतरमशागतीच्या कामांना वेग
मागील तीन वर्ष सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे नदीचे पात्र सुमारे चार महिने सतत वाहत होते. सुमारे एक महिन्याच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार आगमन केल्यामुळे पिकांच्या अंतरमशागतीचे कामे करण्यात शेतकरी व्यस्त दिसत आहेत.
पावसामुळे गणेशोत्सवामध्ये देखील भाविकांचा उत्साह वाढला आहे. दरम्यान, तालुक्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे कपाशी, सोयाबीन, कांदा यासह अन्य खरीप पिकांचे नुकसान झाले असून, प्रशासनातर्फे नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.