जळगाव : पोलिस अधीक्षकांच्या पदानंतरची ‘पॉवरफुल’ समजली जाणारी ‘हॉटसीट’ म्हणजे गुन्हे शाखेचा पदभार. निरीक्षक किरणकुमार बकाले यांची मध्यरात्रीतून तडकाफडकी बदली केल्यानंतर रिक्त जागेसाठी जिल्ह्यातील मातब्बर निरीक्षकांनी या ‘सीट’साठी फिल्डिंग लावलीय.
कोरोना संसर्गाची लाट चरमसिमेवर असताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापू रोहम यांची बदली झाल्यानंतर अलीबाग ॲण्टीकरप्शन विभागातून बदली होऊन आलेले किरणकुमार बकाले यांनी ऑक्टोबर-२० मध्ये गुन्हेशाखेचा पदभार घेतला. नुकतीच निरीक्षक पदाची पदोन्नती झालेली असताना बकाले यांना जळगाव जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या स्थानिक गुन्हेशाखेचा पदभार भेटला होता.
परिणामी गुन्हेशाखा तेव्हा चर्चेत आली होती. दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असतानाच मंगळवारी (ता.१३) बकालेंची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आल्याने पुन्हा या ‘हॉट सीट’साठी इच्छुकांना आपसूकच संधी चालून आली आहे.(who will become LCB In Charge after kirankumar bakale termination Latest Jalgaon News)
गुन्हे शाखेला अस्थिरतेचे ग्रहण..
स्थानिक गुन्हेशाखेत तपासात निष्णांत असणे अपेक्षित असताना राजकिय वशिल्यातून आलेल्या याद्यांवरील कर्मचार्यांचा सर्वाधीक भरणा असतो.त्यातून एकत्र कामे करणाऱ्यांच्या टोळ्याच गुन्हेशाखेत कार्यरत झालेल्या आहे. पंधरा तालुक्यांच्या बीटनिहाय कर्मचाऱ्यांच्या टोळ्यांमधील आपसातील वादातून गुन्हेशाखा नेहमीच चर्चेत राहिली आहे.
या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण मिळवण्याचे कसब असणाराच अधिकारी गुन्हेशाखेची धुरा यशस्वी सांभाळू शकातो. मात्र, सर्वांनाच गुन्हेशाखेची ‘हॉट सीट’ हवी असल्याने प्रत्येकाचे आपआपल्या परिने प्रयत्न सुरु असतात.
गुन्हेशाखेचे अर्थकारण..
गुन्हेशाखेच्या निरीक्षक पदासाठी पाच वर्षांपूर्वी ३५ लाखांपर्यंत बोली लावली जात होती. जो अधिकारी पैसा देऊन या शाखेवर बसत असेल तर, त्याची गुंतवणूक काढून कमाई करणे अपेक्षित आहे. याला निरीक्षक राजेशसिंह चंदेल आणि बापू रोहोम हे दोन्ही निरीक्षक अपवाद ठरले. दोघांना स्वतःहून गुन्हे शाखेचे पद चालून आले.
निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येनंतर बदनाम झालेल्या गुन्हेशाखेतील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण मिळवू शकणारा सक्षम अधिकारी कोण? असा प्रश्न समोर आला असतांना राजेशसिंह चंदेल यांना संधी भेटली तर, पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी निरीक्षक सुनील कुराडे यांना कार्यकाळ पूर्ण झाल्याचे कारण पुढे करत तडकाफडकी कार्यमुक्त केल्यानंतर बापू रोहम यांन संधी भेटली. आता या जागेसाठी ८० लाख ते १ कोट पर्यंत खर्च करण्याची तयारी असलेले निरीक्षकही रांगेत असल्याचे बोलले जात आहे.
प्रयत्नशीलांची धावपळ
निरीक्षक किरणकुमार बकाले यांची नियुक्ती (ऑक्टोबर २०) झाली तेव्हाच पाचोरा पोलिस निरीक्षक किशन नजन पाटील यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, त्यांना वेटिंगवर राहावे लागले. काळ पुढे सरकला तसा अधिकाऱ्यांच्याही महत्त्वाकांक्षा वाढत गेल्या. चाळीसगाव पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांनीही मध्यंतरी प्रयत्न करून पाहिले.
मात्र, त्यांना हवे ते यश मिळाले नाही. अमळनेर पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, जामनेरचे किरण शिंदे यांनी नव्याने एलसीबी निरीक्षकपदासाठी फिल्डिंग लावून ठेवली आहे. तर, मुक्ताईनगरचे निरीक्षक शंकर शेळके यांचेही नाव आता चर्चेत आले आहे. अनपेक्षितपणे बकालेंची उचलबांगडी झाल्याने या सर्वांच्याच अपेक्षा वाढल्या असून, एलसीबीसाठी धावपळ सुरू केली आहे.
आमदार-खासदार, मंत्र्यांनाही हवा आपला माणूस
गुन्हे शाखा पॉवरफुल ब्रॅंच असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक लोकप्रतिनिधीचा मर्जीतील पोलिस निरीक्षकच या पदावर बसला पाहिजे, असा हट्ट असतो. मुक्ताईनगरचा पूर्वी हुकूम गाजत असे, त्यानंतर जामनेरचा डंका वाजला, पाळधीचाही हट्ट आपल्याच माणसासाठी आहे.
तर, चाळीसगावचे आमदार आणि खासदार दोघांचा प्रयत्न मर्जीतील अधिकाऱ्यासाठी सुरू असल्याने गुन्हे शाखेसाठी इच्छुक अधिकाऱ्यांनी या लोकप्रतिनिधींकडे चकरा मारायला सुरवात केल्याची खात्रीलायक वृत्त आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.