जळगाव : संशय, गैरसमज व कौटुंबिक कलहामुळे अनेकदा दांपत्यात दुरावा निर्माण होतो. भांडण विकोपाला गेले, की वेळ घटस्फोटापर्यंत जाऊन पोचते. गेल्या वर्षभरात अशा ४२९ जोडप्यांचे समुपदेशनातून मनोमिलन घडविण्यात महिला कक्षाला यश आले आहे.
अलीकडे पती-पत्नीमधील विवादाचे प्रकार वाढल्याचे दिसून येते.
अशी प्रकरणे महिला सहाय्यक कक्षापर्यंत गेली, की स्थानिक गुन्हे शाखेच्या महिला सहाय्यक कक्षाच्या ‘खाकी’तील शिलेदारांना आपले कसब वापरून दोघांमधील वाद, गैरसमज दूर करून एकत्र आणण्याची किमया करावी लागते. गेल्या वर्षभरातील आकडेवारी पाहिल्यास यात सकारात्मक चित्र दिसून येते. येथे दाखल झालेल्या तक्रारींमध्ये २० ते ३० वयोगटांतील दांपत्यांचा सर्वाधिक समावेश दिसून येतो. (Women section won at fixed marriage of 400 in couple jalgaon news)
ही आहेत वादाची कारणे
बऱ्याच तक्रारींमध्ये सासू-सासरेपासून वेगळे होणे, मोबाईलचा अतिवापर, परपुरुष व स्त्रीसोबत जास्त प्रमाणात संवाद करणे, नोकरी न करू देणे, अशी क्षुल्लक कारणे असल्याची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांकडून मिळाली. या समितीपर्यंत येणाऱ्या अनेक दांपत्यांना अपत्ये असतात. अशावेळी त्या चिमुरड्यांचा विचार न करता घटस्फोटाची तयारी ठेवतात. अशावेळी महिला सहाय्यक कक्ष काही घटनांची वाकबगार उदाहरणे देतो.
जोडण्याच्या प्रयत्नांवरच भर
कक्षाचे सर्व अधिकारी सकारात्मकतेच्या दृष्टीने दोन्ही बाजू समजून घेत संसाराची गाडी रुळावर आणण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस निरीक्षक किशन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक कक्षाचे अधिकारी शोभा न्याहाळदे, रत्ना मराठे व नाईक उपाली खरे, रजनी महाडीक, ज्योती पाटील यांच्याकडून प्रभावीपणे समुपदेशन केले जाते.
असे चालते कार्य
अत्याचार पीडित महिलांना त्यांच्या कौटुंबिक जीवनात येणाऱ्या आघातातून बरे होण्यासाठी महिला सहाय्यक कक्षातर्फे मदत दिली जाते. या कक्षामध्ये दाखल झालेल्या खटल्यांमध्ये पती-पत्नी दोघांच्याही कुटुंबीयांना एकत्र बोलावले जाते. कक्षातर्फे त्यांना समुपदेशन करून गैरसमज दूर केले जातात. ज्या प्रकरणांमध्ये तडजोड शक्य नसेल किंवा कोणी दोषी आढळले, तर ४९८ अ या कलमान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची शिफारस कक्षाचे अधिकारी करतात. त्यांच्या शिफारशीनंतरच गुन्हा नोंदविला जातो. यात निष्पाप लोकांवर गुन्हा दाखल होत नाही. त्यामुळे कायद्याचा गैरवापर टळतो.
हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच...
जळगावात दाखल प्रकरणे
(१ जानेवारी ते २७ डिसेंबरपर्यंत)
एकूण ---------------- २,०४३
तडजोड ------------- ४२९
गुन्हे दाखल ---------- ५९२
न्यायालय ------------ ६८६
प्रलंबित ---------------३३६
"वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये किरकोळ वादविवाद होत असतात. अशावेळी आमच्याकडून त्यांचा संसार टिकण्यासाठी पुरेपूर काळजी घेतली जाते. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो. संसार
मोडणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतो."
-उपाली खरे, नाईक
"अर्जदारांकडून आम्हाला (अधिकाऱ्यांना) न्यायालयात खेचण्याची भाषा केली जाते, असे प्रसंग कित्येकदा आले आहेत. अर्जदार क्षुल्लक कारणांवरून वेगळे होण्याचा अर्ज दाखल करतात. त्यांना उत्तमरीतीचे समुपदेशन करणे, हाच हेतू लक्षात घेत आम्ही आमचे काम पार पाडत असतो."
-शोभा न्याहाळदे, हवालदार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.