जळगाव : शाहूनगरात मंगळवारी (ता. १४) रात्री अकराला चॉपर हल्ला झाला होता. हा हल्ला खुनाच्या गुन्ह्यातून नुकत्याच जामिनावर सुटलेल्या अझरुद्दीन शेख हुस्नोदिन ऊर्फ भुतपलित याने केला असून त्याच्यावर ज्याच्या खुनाचा संशय आहे, त्याच्याच काकावर त्याने चॉपरने हल्ला केला. त्यामुळे पुतण्याच्या खुनानंतर आता काकाला टार्गेट केले आहे. मृताच्या आई- वडिलांना खटल्यात मदत करतो, या संशयावरून त्याने हा हल्ला केल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, रात्रीची गस्त घालणारी पोलिस गाडी गेल्यानंतर काही वेळातच हा थरार शाहूनगरवासीयांनी अनुभवला.
शहरातील शाहूनगर येथील डॉ. बडगुजर यांच्या दवाखान्याजवळ शेख अकील शेख अकबर (वय ३७, रा. मदिना किराणा जवळ) यांच्यावर मंगळवारी (ता. १४) रात्री अकराच्या सुमारास अझरुद्दीन शेख सलीम ऊर्फ भुतपलीत याने अचानक मागून येत चॉपरने हल्ला करून त्याला गंभीर दुखापत केली होती. या हल्ल्यात जखमी झालेल्या अकीलवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. याबाबत जखमी अकील शेखच्या फिर्यादीवरून संशयित अझरुद्दीन शेख हुस्नोदीन ऊर्फ भुतपलीत याच्या विरोधात किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुतण्यानंतर काकाचा नंबर
शाहूनगर परिसरातील जळकी मिलच्या आवारातील टेंट हाऊस गोदामात खुर्चीवर बसण्यावरुन झालेल्या वादात अल्तमश शेख शकील ऊर्फ सत्या (वय २१) याचा २४ जानेवारी २०२० रोजी खून झाला होता. या गुन्ह्यात अझरुद्दीन ऊर्फ भुतपलीत (वय ३०) याला संशयित म्हणून अटक झाली होती. तेव्हापासून तो कारागृहातच होता. दोन- तीन महिन्यापूर्वीच तो जामिनावर सुटला असून त्याने मयत अल्तमशचा काका अकिल शेख अकबर याच्यावर चॉपरने हल्ला करून जखमी केले.
अल्तमशचे कुटुंबीय टार्गेटवर
तरुण मुलाची हत्या झाल्यापासून अल्तमशचे आई वडील पुरते खचले आहेत. पुतण्याच्या हत्येनंतर भावाला मानसिक आधार देत कुटुंब सावरण्याचा प्रयत्न अल्तमशचा काका अकिल शेख अकबर करीत होता. खून खटल्याचे जिल्हा न्यायालयात कामकाज सुरु असून त्यातही आता आई-वडीलांना रस नाही. त्यामुळे काकाच जास्त खटल्यात इंटरेस्ट घेत असल्याच्या संशयातून अझरुद्दीन ऊर्फ भुतपलीत याने अकील शेखवर चॉपर हल्ला करून त्याला संपवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. मात्र, वेळीच परिसरातील तरुण मदतीला धावल्याने अकीलचा जीव वाचल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
पोलिसगाडी जाताच हल्ला
वाढत्या चाकू हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सध्या पोलिस अधीक्षकांच्या आदेशान्वये रात्री दहाला आस्थापना बंद होतात. ही घटना घडली त्याचवेळी शहर पोलिस ठाण्याची गाडी शाहू नगरात गस्तीवर होती. घटनास्थळावरून पोलिसांची गाडी गेल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच चॉपर हल्ल्याची घटना घडल्याने शाहू नगरात भीती पसरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.