फ्लाइट कमांडर दीपक मोहनन नायर (फ्लाइंग-पायलट) हे एप्रिल २०१७ पासून तटरक्षक दलाच्या स्क्वाड्रनपदी प्रतिनियुक्तीवर आहेत. श्रीलंकेच्या पूर्व किनाऱ्यावर ३.४० लाख मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन जाणाऱ्या ऑनबोर्ड एमटी डायमंडवरील आग आणि स्फोटामुळे झालेल्या नुकसानीचे त्यांनी मूल्यमापन केले. ही जबाबदारी सांभाळताना त्यांना वारा व आगीशी संघर्ष करावा लागला. या मिशनवर असताना त्यांनी धैर्याने परिस्थिती सांभाळली. त्याबाबत त्यांनी ‘सकाळ’शी अनुभव कथन केले.
प्रश्न : हवाई दलातील नोकरीचे आकर्षण कसे निर्माण झाले?
उत्तर : पिंपरी-चिंचवडमधील यमुनानगर-निगडीमध्ये माझे लहानपण गेले. फर्ग्युसन महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. सध्या रावेतमध्ये स्थायिक आहे. मेडिकल आणि इंजिनिअरिंग सोडून वेगळं काहीतरी करायचं होतं. भौतिकशास्त्रामध्ये पदवी घेतल्यानंतर त्यात मन रमत नव्हते. अशावेळी मी राष्ट्रीय छात्रसेनेचे (एनसीसी) ‘ए’ ग्रेड प्रमाणपत्र मेहनतीने मिळविले. त्यावेळी मी छोटी-छोटी विमाने बनवत असे. वयाच्या २२ व्या वर्षी मला हवाईदलात थेट प्रवेश मिळाला. प्रशिक्षण घेतले. हे सर्व कठीण होते. चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण झालो. त्याचवेळी हवाई दलात जाण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले. सध्या चेन्नई नंगनल्लूर या ठिकाणी फ्लाइट कमांडर म्हणून कार्यरत आहे. जीवनाची खरी गुणवत्ता या करिअरमध्ये आहे. माझ्या कामातून मला समाधान मिळत गेले.
प्रश्न : श्रीलंकेच्या मिशनवेळी तुमच्यासमोर कोणते सर्वांत मोठे आव्हान होते?
उत्तर : पर्यटननगरी म्हणून श्रीलंकेची ओळख आहे. समुद्रात एखादी आपत्ती ओढवल्यानंतर फार मोठे नुकसान होणार होते. केवळ ऑइल गळती समुद्रात होऊ नये व ते मालवाहू जहाजावर पसरायला नको, यावर मला लक्ष केंद्रित करणे गरजेचे होते. समुद्रात स्फोट झाल्यास हे अपयश माझ्यासाठी पचवणे अवघड झाले असते. चेन्नईच्या हवाईदलामधून हे मिशन यशस्वीपणे करता आले, याचा मला आनंद आहे.
प्रश्न : या मिशनवेळी नेमके काय घडले?
उत्तर : चार सप्टेंबर २०२० रोजी चेतक हेलिकॉप्टरचा कॅप्टन म्हणून मला अत्यंत विलक्षण धैर्य आणि व्यावसायिक कौशल्य दाखवावे लागले. किती दिवस हे मिशन चालेल, हे माहीत नव्हतं. ऑनबोर्ड एमटी डायमंड टॅंकरला लागलेल्या आगीचे स्वरूप भयावह होते. या सात दिवसांच्या मोहिमेदरम्यान, सलग १४ दिवस आम्ही साइटवर होतो. वेळोवेळी दिल्ली आणि श्रीलंकेला मला अपडेट देणे गरजेचे होते. १४.२५ तासांची १२ उड्डाणे केली. भारतीय तटरक्षक जहाजांच्या विविध श्रेणींवर वारंवार डेक लँडिंग आवश्यक होते आणि जहाजांना कार्यक्षम अग्निशामक व्यवस्था आणि तेल गळतीचे हवाई सर्वेक्षण करण्यासाठी दिशानिर्देश दिले जात होते. ही सर्व कामे समुद्रात अतिसामान्य स्थितीत, वाईट दृश्यमानता आणि ३० नॉट्सपेक्षा जास्त वादळी वारा, धोकादायक समुद्री स्थितीत होती. एकावेळी आठ जहाजे समुद्रात होती. जिवाला मोठा धोका असूनही या मिशनचा मी पाठपुरावा केला. वैयक्तिक सुरक्षेची पर्वा न करता शौर्य आणि अटल संकल्प सेवेच्या सर्वोच्च परंपरांच्या भावनेने हे काम केले. अविश्वसनीय आणि उत्साही प्रतिसादाने भीषण आग विझविण्यात मोठे योगदान दिले. त्यामुळेच स्फोट आणि तेल गळतीचा संभाव्य धोका टाळता आला. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात भारतीय तटरक्षक दलाला पूर्ण श्रेय मिळाले. १८ व्या दिवशी मी चेन्नईला परतलो.
प्रश्न : या दरम्यान तुम्ही परिस्थिती कशी हाताळली?
उत्तर : मिशनवेळी श्रीलंकेची विमानेदेखील आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते. सर्व विमानांवर एकाचवेळी नियंत्रण ठेवणेही आवश्यक होते. त्यातच मी जगातील तज्ज्ञांशी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी संपर्कात होतो. योग्य तापमान मेंटेन करणे मला भाग होते. वाऱ्याची तीव्रता इतकी होती की, आग मोठ्या प्रमाणात पेट घेत होती. नॉर्वे, हाँगकाँगच्या टीमही मदतीला होत्या. भारत व श्रीलंका सरकारतर्फे या कामगिरीबद्दल माझा सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.