वेल्डिंगच्या माध्यमातून दिला भविष्याला आकार

कोमल चुनारकर
कोमल चुनारकर
Updated on

पुणे - जिद्दीच्या जोरावर यश गाठणाऱ्या मुलींची देशात कमी नाही. कुणाचेही मार्गदर्शन नसताना मिळवलेले यश अधिक महत्त्वाचे ठरते. असेच यश मिळवत कोमल चुनारकर ही चंद्रपूर जिल्ह्यातील पहिली महिला वेल्डर ठरली आहे. सध्या ती पुण्यातल्या एका नामांकित कंपनीमध्ये नोकरी करते.

रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबातील २७ वर्षीय कोमल ही तरुणी आज रोजंदारीवर कुठेतरी काम करताना दिसली असती; परंतु तिने वेल्डिंगसारखे पुरुषबहुल क्षेत्र निवडले. कोमल मूळची चंद्रपूर जिल्ह्यातल्या थुतरा गावची आहे. चंद्रपूर येथील अंबुजा सिमेंट फाउंडेशनच्या ‘स्किल अँड आंत्र्यप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट’ने (एसईडीआय) वेल्डर प्रशिक्षण सुरू केले आणि ही संधी कोमलला मिळाली. 

पारंपरिक दृष्टिकोनातून पुरुषबहुल असलेल्या वेल्डिंग क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याच्या जिद्दीतून कोमलने स्वतःचे नाव या प्रशिक्षणासाठी नोंदवले. या निर्णयामुळे तिच्यापुढे अनेक अडचणी आल्या. 

 तिच्या आजूबाजूच्या लोकांनी व नातेवाइकांनी चेष्टा केली. तरीही कोमलने जिद्द कायम ठेवत तज्ज्ञांच्या मदतीने वेल्डिंगच्या उत्कृष्ट पद्धती शिकून घेतल्या. प्रशिक्षण घेतलेल्या पहिल्या बॅचमधली ती एकमेव महिला प्रशिक्षणार्थी ठरली. सध्या ती पुणेस्थित तैकिशा इंजिनिअरिंग या कंपनीत कार्यरत आहे.

कोमल म्हणाली, ‘‘घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने पुण्यात स्थायिक व्हायला मला अडचणी आल्या. प्रत्येक मुलीने स्वतःच्या क्षमतांवर विश्‍वास ठेवायला हवा. योग्य प्रशिक्षण आणि योग्य वातावरण मिळाले, तर महिलांही परिणामकारक काम करू शकतात.’’

मी वेल्डिंग कार्यशाळेला पहिल्यांदा गेले तेव्हा मला माहिती होते, की वेल्डिंग क्षेत्रात महिलांची संख्या खूपच कमी आहे. स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याची संधी मला इथेच सापडली. 
- कोमल चुनारकर 

कोमल कुटुंबाचा आर्थिक भार उचलण्यास मदत करीत आहे. अत्याधुनिक आणि सुसज्ज केंद्रांतून तरुणांना व्यवसायाच्या विविध संधी निर्माण करून देण्यासाठी त्यांच्यातल्या कौशल्यांना प्रकाशात आणायचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. 
- पर्ल तिवारी, प्रमुख, अंबुजा सिमेंट फाउंडेशन (एसीएफ) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.