लामकानी - दुष्काळामुळे ओसाड लामकानीत (ता. धुळे) लोकसहभागातून परिवर्तन घडलंय. माळरानाला हिरवाईचा शालू चढवत अन् पाणलोट विकासातून भूजल पातळीत वाढ, बागायतीतून प्रगती, पूरक व्यवसायातून रोजगारनिर्मिती, टॅंकरमुक्त गावाचा लौकिक मिळविणारा "लामकानी पॅटर्न' राज्याला दिशादर्शक ठरला.
पिण्याचे पाणी नाही. जनावरांना चारा, शेतीला पाणी नसल्याने हाताला काम नाही, अशी स्थिती होती. रोजगारासाठी तरुणांचा ओढा सुरत (गुजरात), नाशिक, पुण्याकडे होता. त्यामुळे धुळ्यात वैद्यकीय व्यवसाय करणारे लामकानीवासीय डॉ. धनंजय नेवाडकर यांनी पाणलोट क्षेत्र विकासातून परिवर्तन घडविणाऱ्या गावांची माहिती संकलित केली. त्याआधारे परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली.
17 वर्षांपूर्वी त्रिसूत्रीचा श्रीगणेशा
वनसंरक्षण, वृक्षसंवर्धन, जलपुनर्भरण या त्रिसूत्रीचा स्वीकार करीत लामकानीत 2001 मध्ये परिवर्तनाचा श्रीगणेशा झाला. आबाल-वृद्ध, विद्यार्थी, "ग्रीन आर्मी', वारकरी, स्वाध्याय परिवार यांच्यासह वन विभागाच्या सहकार्याने 500 हेक्टरवर माळरान फुलले. सर्वसंमतीने कुऱ्हाडबंदी, चाराबंदी केली. समतल चरांद्वारे जलसंवर्धन, पर्यावरणाचे रक्षण केले. पावसाचा प्रत्येक थेंब अडवला. ईदगाहजवळ 1999 मध्ये खोदलेली कूपनलिका डिसेंबर 2006 मध्ये भरून वाहिली आणि परिवर्तनाला गती आली. दहा वर्षांत भूजल पातळी वाढली. हजार फुटांपर्यंत कूपनलिकेला पाणी नव्हते. आता बागायती क्षेत्र बाराशे हेक्टरपर्यंत आहे. कांदा, उन्हाळी भुईमूग, गहू, कापूस, डाळिंब, पेरू, पपई इत्यादींप्रमाणेच काही शेतकऱ्यांनी केळी लागवडीचा प्रयोग केलाय.
वनग्राम पुरस्काराने सन्मान
गावाची चाऱ्याची समस्या सुटली. दुष्काळात इतर गावांना लामकानीतून चारा जातो. गाव टॅंकरमुक्त झाले. दुभती जनावरे वाढल्याने चार डेअरी सुरू झाल्या. ग्रामस्थांना रोजगार मिळाला. राजकीय वादाने दोन गटांत विभागलेले लामकानी एकोप्याने नांदत आहे. सरकारने 2008-09 मध्ये प्रथम क्रमांकाच्या संत तुकाराम वनग्राम पुरस्काराने "लामकानी पॅटर्न'चा यथोचित गौरव केलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.