Positive Story: नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेतीत करिअर ‘करून दाखविले’

vishal-ghodekar
vishal-ghodekar
Updated on

निरगुडसर -  नोकरीच्या मागे न लागता त्यांनी आपल्या शेतातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. उच्चशिक्षित असलेले सचिन व विशाल घोडेकर बंधू गेली पाच वर्षे स्ट्रॉबेरीचे पीक घेत असून, अवघ्या सहा महिन्यांत दोन एकरांत १० लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवत आहे. यंदा तर प्रतिकिलो २५० ते ३०० रुपये दर मिळत असल्याने या वर्षीचा नफा १५ लाख रुपयांवर जाणार आहे.

स्ट्रॉबेरी म्हटले की आपल्यासमोर येते ते थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर. अशा वातावरणातच स्ट्रॉबेरीचे पीक येते. परंतु त्याला आंबेगाव तालुक्‍यातील मंचर-भीमाशंकर रस्त्यावर असलेल्या पळस्टिका फाटा घोडेगावनजीक सचिन व विशाल जनार्दन घोडेकर बंधू अपवाद ठरले आहेत. त्यांची साडेतीन एकर शेती आहे. सचिन व विशाल या दोघांचेही  एमकॉमपर्यंत शिक्षण झाले आहे. सचिनने सुरुवातीला पुण्यात एका खासगी कंपनीत तीन वर्ष नोकरी केली. परंतु गावाकडची शेती त्याला स्वस्त बसू देत नव्हती. शेवटी १० वर्षांपूर्वी हक्काची नोकरी सोडून सचिन गावी परतला आणि आपल्या कुटुंबासमवेत शेतात घाम गाळू लागला. सुरुवातीला तरकारी पिके घेण्याबरोबर नर्सरी व्यवसाय सुरू केला. त्यातही चांगला दम बसवला आणि हे करता करता वाचनाची आवड असलेल्या सचिन व विशालला शेतीविषयक ॲग्रोवन वाचण्याचीही आवड होती. महाबळेश्वर, पाचगणी, सातारा परिसरातील शेतकऱ्यांच्या स्टॉबेरीच्या यशोगाथा वाचून स्ट्रॉबेरी शेती करण्याचा निर्णय या दोघांनी घेतला. 

जुन्नर तालुक्‍यातील १४ नंबर येथील मॉलला मालाची विक्री केली जाते. अजून १० ते १२ टन माल हमखास निघणार असल्याचे सचिन घोडेकर यांनी सांगितले. दोन एकरासाठी रोपे, खते, औषधे, मजुरीपोटी ८ ते ९ लाख रुपये खर्च आला असून खर्च वजा जाता यंदाच्या वर्षी १५ लाख रुपयांचा निव्वळ नफा शिल्लक राहणार आहे. स्टॉबेरी शेती ऑरगॅनिक पद्धतीने केली जात असून पिकासाठी रासायनिक पद्धतीचा ८ ते १० टक्के वापर होत आहे. यामुळे फळाला चांगली गोडी व क्वालिटी असून बाजारात चांगली मागणी आहे.

अशी केली सुरुवात
  पाच वर्षांपूर्वी अवघ्या १० गुंठ्यांवर पीक घेतले आणि यशस्वी झाले
  त्या वेळी ४०० रुपये प्रतिकिलो दर मिळाला
  अवघ्या सहा महिन्यांत तीन लाख रुपयांचा नफा मिळवला
  १० गुंठ्यानंतर दोन एकर क्षेत्रावर सलग तीन वर्ष लागवड करून प्रत्येक वर्षी १० लाख रुपयांचा नफा मिळवला
  यंदा दोन एकरात त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली असून तोडणी सुरू
  आत्तापर्यंत २५० ते ३०० रुपये किलो दराने एक टनाची विक्री
 दररोज १०० ते १५० किलो माल निघत आहे

रोपे घरी बनवली जातात
घोडेकर बंधू लागवडीसाठी रोपे घरीच बनवतात. त्यासाठी मदरप्लॅंट बाहेर देशातून इटली, पोलंड या ठिकाणावरून आणली जातात. साधारण २५ गुंठे क्षेत्रावर लागवड करून त्यातून दोन लाख रोपे तयार होतात. घरी ७० हजार रोपे लागतात. उर्वरित रोपांची विक्री केली जाते. तसेच मागणीनुसारही अजून रोपे तयार केली जातात. या कामात दोघांना त्यांची आई नंदा घोडेकर व सचिनची पत्नी प्राची घोडेकर व विशालची पत्नी वृषाली यांची मदत मिळत आहे. तसेच त्यांना कामासाठी मजूरही घ्यावे लागत आहे. 

‘ॲग्रोवन’मुळे यशस्वी
सचिन घोडेकर म्हणाले की, सकाळ प्रकाशित असलेल्या शेतीविषयक दैनिक ॲग्रोवन वाचण्याची आवड असल्यामुळे शेतीतील यशस्वी प्रयोगाचे वाचन करायचे आणि त्याचे कात्रण काढून ठेवायचे. अशाच प्रकारे महाबळेश्वर, पाचगणी, सातारा परिसरातील विविध शेतकऱ्यांच्या स्ट्रॉबेरीच्या यशोगाथा ॲग्रोवन अंकात प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या आधारावरच स्ट्रॉबेरी शेती करण्याचा निर्णय घेतला आणि यशस्वी झालो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.