शेती उत्पन्नावर अवलंबून न राहता तब्बल २७ वर्षांपासून 'या' व्यवसायात..

prakashrao-deshmukh
prakashrao-deshmukh
Updated on

परभणी येथील प्रकाशराव देशमुख यांनी केवळ शेती उत्पन्नावर अवलंबून न राहता तब्बल २७ वर्षांपासून पोल्ट्री व्यवसायात सातत्य टिकवले आहे. चारशे ब्रॉयलर कोंबड्यांच्या संगोपनापासून सुरू केलेला व्यवसाय तीनहजार पक्षांपर्यंत पोचला आहे. अभ्यासू वृत्ती, जिद्द, चिकाटी, दीर्घ अनुभवाच्या जोरावर जोडीला पोल्ट्रीखाद्य निर्मिती करून एकूण खर्चात बचत करीत वाटचाल यशस्वी सुरू आहे.

परभणी येथील राजेश्वरराव, प्रकाशराव, सुनीलराव या देशमुख बंधूंची परभणी तसेच नांदखेडा शिवारात सुमारे ९८ एकर शेती आहे. खरीप व रब्बी हंगामातील पिके ते घेतात. यंदा प्रथमच चार एकरांवर हळद लागवड केली आहे. सिंचनासाठी तीन विहिरी, बोअरची व्यवस्था आहे. मोठे क्षेत्र असल्यामुळे यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. राजेश्वरराव शेतीचे व्यवस्थापन तर प्रकाशराव पोल्ट्री व्यवसाय सांभाळतात. सुनीलराव यांचा संगणक क्षेत्रातील विक्री व्यवसाय आहे. 

पोल्ट्री व्यवसायातील वाटचाल
सततच्या नैसर्गिक संकटांमुळे पीक उत्पादन व उत्पन्नाची खात्री नसल्यामुळे अनेक शेतकरी पूरक व्यवसायाकडे वळत आहेत. प्रकाशराव देखील जिल्ह्यातील जुन्या, जाणत्या, अभ्यासू पोल्ट्री उद्योजकांपैकी आहेत. त्यांनी सन १९९३ मध्येच पोल्ट्री व्यवसायात करिअर करण्याचे निश्चित केले. त्यासाठी आवश्यक सहा महिन्यांचे प्रशिक्षण पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन येथे पूर्ण केले. त्यानंतर परभणी येथील आपल्या मळ्यात शेड उभारून चारशे ब्रॅायलर पक्षांपासून व्यवसायाची सुरुवात केली. अनुभव, सातत्य व योग्य व्यवस्थापनातून हळूहळू त्यात जम बसत गेला. सन १९९५-९६  मध्ये स्वभांडवल तसेच बँकेचे अर्थसाहाय्य घेत या व्यवसायाचा विस्तार केला. गेल्या २७ वर्षांत आपल्या कुलस्वामिनी पोल्ट्री फार्म ची सर्वदूर ओळख तयार करण्यात त्यांना यश आले आहे. 

कोरोना काळातही तगून राहिले 
यंदाच्या कोरोना संकटात अफवेमुळे चिकनच्या मागणीवर परिणाम झाला. पक्षांचे दर थेट किलोला ४ रुपयांपर्यंत आले. अनेक पोल्ट्रीधारकांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला. व्यवसायाचे अर्थकारण कोलमडल्याने अनेकांचे व्यवसाय मोडीतही निघाले. अशा स्थितीतही न डगमगता प्रकाशरावांनी  संयम ठेवला. कमी दराने पक्षांची विक्री करून तोटा सहन करण्यापेक्षा पक्षांचे आणखी काही काळ संगोपन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खाद्यावरील खर्च वाढणार होता.साधारण तीन ते साडेतीन महिन्याच्या कालावधीत व्यवस्थितरीत्या संगोपन केले. पक्षांचे वजन चार ते साडेचार किलोपर्यंत वाढले. पुढे परिस्थितीत बदल झाला.. चिकनचे दर वाढले. प्रति किलो ८० ते ११० रुपये तर प्रतिपक्षी ३२० ते ४५० रुपयांपर्यंत दर मिळाले. त्यामुळे संकटातही प्रकाशराव नुकसानीत न जाता तगून राहिले.

देशमुख यांचा व्यवसाय दृष्टिक्षेपात 
  सध्या दर पंधरा दिवसाला तीन हजार ब्रॅायलर पक्षांची बॅच घेण्याची क्षमता 
  या क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीकडून एक दिवस वयाचे पक्षी खरेदी केले जातात. 
  एकूण सहा शेडस. पिल्ले व वाढत्या वयाचे पक्षी असे त्याचे वर्गीकरण.
  दोन शेडच्या छतांसाठी सिमेंट पत्र्याचा वापर. छत टीन पत्र्याचे. त्यामुळे उन्हाळ्यात तापमानात वाढ झाल्यास छतावर छोट्या तुषार संचाव्दारे फॅागिंग. 
  दोन्ही बाजूंनी तागाचे पोते. त्यामुळे वाढत्या तापमानात पक्षी संगोपन सुकर होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खाद्यनिर्मितीतून स्वयंपूर्णता 
सुमारे तीनहजार पक्षांसाठी खाद्यही तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर लागते. त्यासाठी विकतचे खाद्य घेणे आर्थिक दृष्ट्य़ा परवडणारे ठरत नाही. त्यामुळे प्रकाशरावांनी स्वतःच खाद्य निर्मितीत उतरण्याचे ठरवले. सन १९९६ मध्ये छोट्या प्रमाणात सुरुवात केली. पुढील चार वर्षांतच त्याचाही विस्तार केला. त्यासाठी अद्ययावत मिक्सर, ग्राइंडर यंत्र आणून ते मळ्यातील गोदामात स्थापित केले. .मका, सोया डिओसी, तेल आदींसोबत बाजारातील पोषक घटकांचे मिश्रण करून खाद्य तयार केल्या जाते. प्री स्टार्टर, स्टार्टर, फिनिशर असे त्याचे तीन प्रकार असतात. दिवसाला मोठ्या पक्षांसाठी ३ ते ४ टन तर पिल्लांसाठी दोन टन खाद्यनिर्मितीची क्षमता आहे.  

हळद युक्त खाद्यनिर्मिती 
यंदा प्रथमच खाद्यात विशिष्ट प्रमाणात हळदीचा वापर सुरू केला. त्यातून पक्षांना सर्दीचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे निरीक्षण आढळून आले आहे. रोगप्रतिकार क्षमता वाढल्याने औषधांवर होणारा खर्च कमी झाला आहे. पक्षांना यंत्राव्दारे शुद्ध केलेले पाणी दिले जाते. या सर्व बाबींमधून पक्षी मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.

अर्थकारण 
प्रत्येक बॅच ४५ दिवसांच्या कालावधीत पूर्ण होते. 
सरासरी अडीच ते पावणेतीन किलोपर्यंत वजन झाल्यानंतर पक्षी विक्रीसाठी तयार होतात. 
पोल्ट्री फार्म परभणी शहरानजीक असल्याने स्थानिक व्यापारी जागेवर येऊन पक्षांची खरेदी करतात. 
मार्केटमधील मागणी लक्षात घेऊन ऑक्टोबर ते जुलै या कालावधीत बॅचेस घेण्यावर अधिक भर 
वर्षभराची सरासरी लक्षात घेतली तर किलोला ७० ते ७५ रुपये दर मिळतो. 
खर्च जमेत धरून व सर्व बाबी अनुकूल राहिल्यास किलोला सुमारे पाच ते सात रुपये नफा मिळतो. काहीवेळा नुकसानही मोठ्या प्रमाणात होते. 
खाद्य विक्री 
दर महिन्याला ६० ते ९० टनांपर्यंत खाद्य निर्मिती. गरजेनुसार आपल्या व्यवसायात वापरून उर्वरित खाद्याची विक्री प्रति क्विंटल २५०० ते २९०० रुपये दराने केली जाते. जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांकडून या दर्जेदार खाद्याला मागणी असते. 
पोल्ट्री आणि खाद्य निर्मिती व्यवसायात चार जणांना वर्षभराचा रोजगार मिळाला आहे.

पोल्ट्री व्यवसायात उत्पादन खर्च मोठा आहे. त्या तुलनेत नफा कमी आहे. अशावेळी स्वतः पोल्र्टीखाद्य निर्मिती केली. त्यामुळे कंपन्यांकडील खाद्यावरील खर्च कमी केला. अन्य व्यावसायिकांनाही कमी मार्जिनमध्ये खाद्यविक्री करतो. त्यामुळे त्यांच्याकडूनही चांगली मागणी असते.
- प्रकाशराव देशमुख, ९४२२८७६४७१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.