ढेबेवाडी (जि.सातारा) : मुंबईतून गावी परतणाऱ्या कुटुंबांना काही दिवसांसाठी शाळांमधून क्वारंटाइन केल्याने त्यांच्यात रुसवे-फुगवे आणि नाराजी वाढल्याचे दिसत असतानाच साबळेवाडी (सागाव, ता. पाटण) येथील प्राथमिक शाळेमध्ये वास्तव्याला असलेले एक कुटुंब मात्र, ही सेवेची संधी समजून दररोज श्रमदानाने संपूर्ण शाळेच्या इमारतीची व परिसराची साफसफाई करताना दिसत आहे.
मुंबईहून गावाकडे आलेल्यांना शाळांच्या इमारतीत किंवा घरात स्वतंत्र क्वारंटाइन करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने गावी परतलेली अनेक कुटुंबे सध्या प्राथमिक व माध्यमिक शाळाच्या इमारतींसह स्वतंत्र घरात वास्तव्याला आहेत. दक्षता समिती, ग्रामपंचायत, तसेच आरोग्य विभागाची यंत्रणा संबंधितांवर लक्ष ठेऊन त्यांना काही हवे-नको बघत आहेत. अनेक ठिकाणी रुसवे-फुगवे, गावांतर्गत वाद आणि प्रतिष्ठेच्या मुद्द्यांवरून वादावादी, तसेच गैरसोयीवरून तक्रारीही सुरू असल्याने संबंधित यंत्रणेपुढे पेच उभा राहात असताना साबळेवाडीतील कुटुंबाने सर्वांसमोर ठेवलेला आदर्श डोळ्यात अंजन घालणारा आणि आदर्शवत असाच आहे. तेथील विजय साबळे कल्याण (मुंबई) येथून 21 तारखेला कुटुंबीयांसह गावी आले.
गावाकडे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत त्यांना क्वारंटाइन करण्यात आले. तेथे त्यांना आवश्यक साहित्य व सुविधा उपलब्ध करून देऊन शाळेचे गेट बंद करण्यात आले. साबळेवाडीच्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत. विजय साबळे हेही याच शाळेचे माजी विद्यार्थी असल्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने शाळेत वास्तव्य करण्याची आलेली वेळ हे आपले भाग्यच समजून त्यांनी पहिल्या दिवसांपासून हातात खराटे व झाडू घेऊन शाळेच्या साफसफाईची मोहीम हाती घेतली आहे. श्री. साबळेंसह पत्नी वनिता, कन्या भाग्यश्री व धनश्री असे चौघे जण या श्रमदानात सहभागी होत असून, शाळा व परिसरासह बगिच्यांची साफसफाई आणि झाडांना पाणी देण्याचेही काम त्यांच्याकडून नियमितपणे सुरू आहे. संबंधित कुटुंबाला शाळेत आवश्यक सुविधा व दैनंदिन गरजेचे साहित्य उपलब्ध करून दिल्याचे सरपंच निवास साबळे, ग्रामसेवक बाळकृष्ण जाधवर, पोलिस पाटील बाळासाहेब साबळे यांनी सांगितले.
ज्या शाळेत शिकलो त्या शाळेची साफसफाई करण्याची संधी कितीतरी वर्षांनी पुन्हा मिळाली आहे. क्वारंटाइनच्या निमित्ताने शाळेतल्या जुन्या आठवणींनाही उजाळा मिळून आमचा प्रत्येक दिवस आनंददायी बनत आहे.
- विजय साबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.