सोलापूर : बार्शी तालुक्यातील मळेगाव ग्रामपंचायत आता ग्रामस्थांना घरोघरी गरम पाणी देणार आहे. त्यासाठी सौरऊर्जेचे पॅनेल बसवून ग्रामपंचायतीच्या टाकीतील पाणी गरम केले जाणार आहे. वृक्षतोड थांबावी. पर्यावरण संवर्धन व्हावे, यासाठी लोकसहभाग आणि विविध कंपन्यांची मदत घेऊन हा प्रकल्प राबविला जाणार आहे.
बार्शी - तुळजापूर रस्त्यावर बार्शीच्या पूर्वेकडे मळेगाव हे साधारण पाच हजार लोकवस्तीचे गाव आहे. शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. गावात एकोपा आहे. गेल्या 45 वर्षांत गावात सगळ्याच स्थानिक निवडणूक बिनविरोध होतात. गावात शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, एक गाव एक गणपती, जलसंवर्धन असे विविध उपक्रम राबविले जातात. संस्थापक बाळासाहेब माळी यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंडळ काम करते. राज्याच्या विविध भागांत पाहिलेल्या आदर्श गावातील उपक्रम आपल्या गावी राबविले जावेत, यासाठी गावातील युवक शिवाजीराव पवार यांनी ध्यास घेतला आहे.
जलयुक्त शिवार अभियानाचा राज्यात प्रथम पुरस्कार या गावाने मिळविला आहे. यापूर्वी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात तालुक्यात प्रथम क्रमांक या गावाने मिळविला असून "तंटामुक्त'चा जिल्ह्यात दुसरा क्रमांकही मिळालेला आहे. एखाद्याला मुलगी झाल्यावर तिच्या नावे भविष्याची तरतूद म्हणून शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने पाच हजार रुपये ठेवले जातात. गावाने नुकतेच पाच समाजाच्या स्मशानभूमीचे एकत्रीकरण केले आहे. गावात संपूर्ण रस्ते सिमेंटचे बांधले असून, प्रत्येकाकडे स्वच्छतागृह आहे.
जलयुक्त शिवारमध्ये गावाने 72 लाख रुपये इतक्या लोकवर्गणीतून सात किलोमीटर ओढा रुंदीकरण व खोलीकरण केले. शिक्षक आमदार दत्तात्रेय सावंत यांच्या निधीतून गावतलावाचे खोलीकरण व मजबुतीकरण करण्यात आले आहे. या सगळ्यांमुळे गावातील विहिरींची पाण्याची पातळी वाढली आहे. गावात दारू, जुगारबंदी आहे. या सगळ्या कामासाठी सरपंच गुणवंत मुंढे, उपसरपंच श्रीमंत गडसिंग आदींसह गावकऱ्यांचा सहभाग असतो.
पर्यावरण संवर्धनाचा हेतू ठेवून ग्रामस्थांना सौरऊर्जेवर मोफत गरम पाणी द्यावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पुण्यात त्याची एक बैठक घेत आहोत. शिवाली उद्योगसमूह त्यासाठी मदत करेल. गावात एकोपा असल्यामुळे इतर उपक्रमांसारखाच आमचा हा प्रयोगही यशस्वी होईल, ही खात्री आहे.
- शिवाजी पवार, शिवाली उद्योगसमूह.
'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
|