Exclusive:पुष्‍पाताई म्हणजे शेतीतील चालते बोलते विद्यापीठ!;शेती कसण्याची उमेद कायम

pushapatai
pushapatai
Updated on

साठाव्या वर्षी निवृत्ती होणारी नोकरदार मंडळी कुठे आणि ६३व्या वर्षी ३५ वर्षांपूर्वीची शेती कसण्याची उमेद जैसे थे असणाऱ्या पुष्पाताई पांडुरंग कव्हर या शेतकरी महिला कुठे ! पुष्पाताई या शेतीतील चालते बोलते विद्यापीठ म्हणता येईल, अशा करारी बाण्याच्या महिला शेतकरी. पतीच्या निधनानंतर कुटुंबाची प्रमुख म्हणून घरदार या दोन्ही आघाड्यांवर त्या कणखरपणे उभ्या राहिल्या, त्यांचा जीवनसंघर्ष आणि प्रवास पाहिला, तर त्यांच्या करारी कर्तृत्वाला आणि कर्तव्याला सलाम ठोकावाच लागतो...!   

गेल्या ३५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून शेतीत राबणाऱ्या पुष्पाताईंनी कोरडवाहू, ओलितापासून तर संरक्षित शेतीपर्यंत सर्वच टप्प्यांवर काम केले. आज त्या वयाच्या ६३ वर्षांनंतरही तितक्याच उत्साहाने शेतीत राबतात. या प्रवासात त्यांनी अनेक चढउतार बघितले. पतीच्या निधनानंतर तर कुटुंबाची प्रमुख म्हणून घरदार या दोन्ही आघाड्यांवर त्या कणखरपणे उभ्या राहल्या. पुष्पाताई या सातवी शिकलेल्या असूनही पिकावर कुठली कीड आहे, काय नुकसान होऊ शकते, काय केले पाहिजे यावर अनुभवातून खटाखट बोलत असतात. त्यांनी आपल्या मुलांना उच्चशिक्षण देऊन नोकरीला लावले आणि आता शेतीतील सर्व व्यवस्थापन सांभाळतात. तरुणांनाही लाजवेल असा त्यांचा करारीबाणा आहे.

वाशीम जिल्ह्यातील तामशी या छोट्याशा गावात पारंपरिक पिकांची वाट सोडून आधुनिक पद्धतीने शेती करण्यास कव्हर कुटुंबाने सुरुवात केली.

२०११-१२ पासून शेडनेटमध्ये विविध पिकांचे उत्पादन काढले जात आहे. त्यांच्याकडे अर्ध्या एकरावर शेडनेट उभारलेले आहे. त्यात वर्षभर काकडी, मिरची व इतर पिकांचे बीजोत्पादन, व्यावसायिक पद्धतीने पीक घेतले जाते.

पुष्पाताई यांना दोन मुले आहेत. पतीचे २००६ मध्ये निधन झाले. त्यानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी पुष्पाताईंच्या खांद्यावर येऊन पडली. पती होते तोपर्यंतही त्यांच्या साथीने शेतीतील कामे पुष्पाताई करीत होत्या. पतीच्या निधनानंतर त्यांना ही धुरा आणखी सक्षमपणे पेलावी लागली. जेमतेम अक्षर ओळखीचे शिक्षण घेतल्यानंतर त्या पूर्णवेळ शेतीत रमल्या. मुलांना मात्र उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे आज दोन्ही मुले नोकरी करतात. शेतीचा संपूर्ण भार त्या उचलत आहेत. त्यांचे आजचे वय हे खरे तर घरात बसून आराम करण्याचे आहे. तसेही मुले नोकरीला असल्याने पैशांची तितकी चिंता नाही. मात्र पुष्‍पाताईंना अशा सुखाचा कुठलीही अभिलाशा नाही. दिवसभरातील किमान दहा तास त्या आजही या वयात शेतात राबतात. गावाच्या जवळच चार एकर शेती आहे. या शेतात कव्हर कुटुंबीय बारमाही भाजीपाल्याची पिके पिकवतात. नऊ वर्षांपूर्वी उभारलेल्या अर्ध्या एकरातील शेडनेटमध्ये व्यावसायिक शेती केली जाते. प्रामुख्याने बीजोत्पादन घेतले जाते. कधी काकडी, कधी सिमला कधी खरबूज लावतात. उर्वरित शेतातही पारंपरिक पिकांऐवजी कमी दिवसांत येणारी पिके घेतली जातात.

आईने शेतात जाऊ नये असे मुलांना सातत्याने वाटते. तू, आता काम करू नकोस असेही ते म्हणतात. परंतु मी रिकामी राहून काय करू. माझे शेत, माझे पीक यांच्यासोबतीनेच माझा दिवस चांगला जातो. आरोग्य ठणठणीत राहते, असे सांगत त्या कणखर आवाजात बोलू लागतात. पुष्पाताईंच्या शेताला भेट दिली तेव्हा त्यामध्ये खरबूज, बटाटा व शेडनेटमध्ये मिरची पिकाची लागवड केलेली होती. मल्चिंगवर लागवड केलेल्या खरबुजाच्या वेलींकडे, पानांकडे पाहून त्यावर कुठली कीड आली, सध्या कुठले कीटक आहेत याची तज्ज्ञांप्रमाणे माहिती सांगत होत्या. गेल्या आठवड्यात किडीसाठी कशाची फवारणी घेतली हेही सांगितले. 

कव्हर कुटुंबाकडे स्वतःची १२ एकर शेती आहे. सोबतच दुसऱ्यांची शेतीही ते करतात. या शेतात कुठली पिके लावायची हे पुष्पाताईच ठरवतात. यंदा कोरोनामुळे शेतमाल विक्रीत प्रत्येक शेतकऱ्याला अडचणी आल्या. पण मुलांच्या पाठीशी सक्षमपणे उभ्या राहून त्यांनी धैर्य दाखवले. सिमला मिरची, टरबूज, खरबूज, कोबी या सर्व शेतीमालाची थेट विक्री केली. खरबूज, टरबूज, मिरची, फुलकोबी विक्रीतून तीन लाखांवर मिळकत झाली. आईचा उत्साह, करारीबाणा पाहून मुलेही आता नोकरी सांभाळतानांच शेतीचे व्यवस्थापन करतात. नफ्याच्या शेतीचे सूत्र गवसलेले आहे. आज त्यांची शेती लाखोंचे उत्पन्न मिळवून देत आहे.

संपर्क - दिलीप कव्हर (मुलगा) मो. ९५११६८६०४६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.