Konkan Railway : कोकण रेल्वेच्या १७ गाड्या रद्द; २४ गाड्यांचा मार्ग बदल

मुसळधार पावसामुळे गोव्यामध्ये पेडणे रेल्वे टनेलमध्ये जमिनीतून पाणी वर येऊ लागल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
kokan railway
kokan railway sakal
Updated on

रत्नागिरी - मुसळधार पावसामुळे गोव्यामध्ये पेडणे रेल्वे टनेलमध्ये जमिनीतून पाणी वर येऊ लागल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मांडवी, तेजस, जनशताब्दी एक्स्प्रेससह १७ रेल्वे रद्द करण्यात आल्या, तर लांब पल्ल्याच्या सुमारे २४ गाड्या अन्य मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत येणाऱ्या गाड्या सुरू ठेवण्यासाठी कोकण रेल्वेचे प्रयत्न सुरू होते. बुधवारी (ता. १०) दिवसभर हा गोंधळ सुरू राहिल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अनेक रेल्वेस्थानकांवर शुकशुकाट होता.

कोकण रेल्वेच्या कारवार रीजनमधील गोव्याच्या हद्दीत समाविष्ट असणाऱ्या मडुरे ते पेडणे दरम्यान रेल्वेच्या भूयारी मार्गात पाणी वाहू लागले आहे. जमिनीतून पाणी येत असल्यामुळे संपूर्ण टनेलमध्ये रूळावर चिखल झाला होता. काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्या भागातील काही काळ वाहतूक थांबवण्यात आली होती.

रात्री १० वाजून १३ मिनिटांनी ट्रॅक फिटनेस सर्टिफिकेट मिळाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र बुधवारी (ता. १०) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पेडणे बोगद्यातून मोठ्याप्रमाणावर पाणी येऊ लागल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वेकडून या मार्गावर धावणाऱ्या गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला.

लोकमान्य टिळक-तिरूअनंतपुरम, मडगाव-चंदिगड, मंगळूरू-एलटीटी, मंगळूरू-सीएसटीएम, सावंतवाडी-मडगाव, तेजस, मांडवी, जनशताब्दी यासह सुमारे १७ गाड्या रद्द केल्या. रद्द केलेल्या गाड्यांच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांचे हाल झाले.

पेडणे येथील टनेलमधील वाहतूक सुरळीत होणे अशक्य असल्यामुळे सकाळी पावणेसात वाजता कोकण रेल्वे प्रशासनाने रद्द केलेल्या गाड्यांची यादी जाहीर करण्यास सुरूवात केली. तर मंगला एक्स्प्रेस, जामनगर एक्स्प्रेस, गांधीधाम एक्स्प्रेस, भावनगर एक्स्प्रेस यासह सुमारे चोविस गाड्या मध्यरेल्वे मार्गाकडे वळवण्यात आल्याचे सांगितले. या समस्येमुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रकच कोलमडले.

अनेक गाड्या मार्गावरच खोळंबून राहिल्या आहेत. गाड्या रद्द केल्याने कोकण रेल्वेकडून तिकिटांचा परतावा तत्काळ देण्याचे काम रेल्वेच्या बुकिंग काउंटर्सवर सुरू आहे. दरम्यान कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे टनेल मधील समस्या सुटली असून लवकरच वाहतूक पूर्वरत होईल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

रात्री ८.३० वाजता टनेल मधील रुळ वाहतुकीसाठी सज्ज झाले होते. तसेच मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधील ५७२ आणि कोकणकन्यामधील ५३५ प्रवाशांना सावंतवाडी ते मडगावपर्यंत एसटी नेण्यात आले. याबाबत कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी मार्ग सुरळीत करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असल्याचे सांगितले.

कोकणकन्या सावंतवाडीहून सुटली

१० जुलै रोजी मुंबईसाठी नेहमी मडगाव येथून सुटणारी मडगाव जंक्शन ते मुंबई सीएसएमटी कोकण कन्या एक्स्प्रेस सावंतवाडी रोड स्थानकातून मुंबईसाठी सोडण्यात आली. पेडणे बोगद्यातील समस्येमुळे हा बदल करण्यात आला. सायंकाळी साडेसात वाजता सावंतवाडीतून ही गाडी सोडण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मडगाव ते सावंतवाडी रोड दरम्यान बुधवारची कोकणकन्या एक्स्प्रेस रद्द केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.