रत्नागिरी : अंगारकी संकष्टी चतुर्थीला गणपतीपुळेच्या श्रींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. जिल्हा प्रशासनाकडून किनार्यावर जाण्यास बंदी घातल्यामुळे दर्शन घेतल्यानंतर भाविक परिसरात रेंगाळत न थांबताच माघारी परतत होते. दिवसभरात चाळीस हजाराहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. किनार्यावर बंदी घातल्यामुळे भाविकांची मंदिर परिसरात गर्दी दिसत नव्हती.
जिल्हा प्रशासन आणि पोलिस दल यांच्यासह आरोग्य विभागाने नियोजन केल्यामुळे गणपतीपुळे येथील अंगारकी चतुर्थी यात्रा शांततेत पार पडली. कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर सर्वांना मंदिर प्रवेशाची मुभा मिळाली. यानंतरची ही पहिलीच चतुर्थी असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामधून सर्वाधिक भाविकांनी गणपतीपुळेत हजेरी लावली होती. अंगारकीनिमित्त परजिल्ह्यातून येणार्या व्यावसायिकांना स्टॉल लावण्यास मनाई केली होती. त्यामुळे परिसरात गर्दी होत नव्हती. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मंदिरात पुजा-अर्चा झाली.
त्यानंतर दर्शनाला सुरवात झाली. एकावेळी हजारहून अधिक भाविक रांगेत उभे राहतील अशी मंडप व्यवस्था केली होती. त्यामुळे कडकडीत उन्हाचा त्रास झाला नाही. शांततापुर्ण वातावरणात भाविक दर्शन घेत होते. दरवर्षीप्रमाणे जत्रेचे स्वरुप नसल्यामुळे गर्दी जाणवत नव्हती. दुपारी चार वाजता श्रींची पालखी प्रदर्शनासाठी बाहेर पडली होती. त्यावेळीही भाविकांची गर्दी नव्हती. देवस्थानचे पुजारी, प्रतिनिधी आणि मोजकेच ग्रामस्थ यामध्ये सहभागी झाले होते.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार वादळ आणि पावसाची शक्यता लक्षात घेऊन भाविकांची सुरक्षिततेसाठी किनार्यावर जाण्यास बंदी घातली होती. त्यामुळे किनार्यावर दिवसभर शुकशुकाट पसरलेला होता. अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले होते. देवस्थान, ग्रामपंचायत यांनी योग्य पध्दतीने भुमिका घेतल्यामुळे कोणतीही अडचण आली नव्हती. वाहने लावून ठेवण्यासाठी मंदिर परिसराच्या बाहेर जागा ठेवण्यात आल्यामुळे वाहतूक कोंडी झाली नाही. तिन वेगवेगळ्या ठिकाणी वाहनतळाच्या जागा ठेवलेल्या होत्या. वाहतूक पोलिसांमुळे भाविकांनाही अडचण आली नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातर्फे येणार्या भाविकांची तपासणी, ऐच्छीक लसीकरणासाठी पथके नियुक्त केली होती.
त्या व्यावसायिकांची पंचाईत
किनार्यावर जाण्यासाठी बंदी घातल्यामुळे हजारो पर्यटक येऊनही सागरी क्रिडा प्रकारांसह अन्य मनोरंजनात्मक खेळातून उत्पन्न मिळवणार्या व्यावसायिकांची पंचाईत झाली आहे. यामध्ये पाच-दहा लाखांचा फटका बसला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. अनेक पर्यटकांनी पर्याय म्हणून मालगुंड, आरे-वारे या किनार्याकडे मोर्चा वळवला होता.
भाविक दर्शन घेऊन निघून जात असल्यामुळे मंदिर परिसरात गर्दी दिसत नव्हती. समुद्रावर कोणीही थांबलेले नव्हते. वाहतुक कोंडी टाळण्यासाठी वाहनतळांच्या जागा निश्चित केल्या होत्या. दर्शनानंतर फिरण्यासाठी गणपतीपुळे ऐवजी अन्य किनार्यांवर जात होते.
- जे. एस. कळेकर, सहाय्यक पोलिस निरीक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.