कोकणात पुन्हा एकदा नारायण राणेंविरुद्ध सगळे

कोकणात पुन्हा एकदा नारायण राणेंविरुद्ध सगळे
Updated on

सावंतवाडी - येथील पंचायत समितीच्या उपसभापती निवडणुकीत झालेल्या काँग्रेस भाजप व शिवसेना यांची युती झाल्याने नव्या राजकीय समिकरणाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरवात झाली आहे. स्थानिक निवडणुकात आगामी काळात नारायण राणेंविरुद्ध सगळे असे चित्र दिसले तर नवल वाटणार नाही. येणाऱ्या काळात महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सत्तास्थाने कशा पद्धतीने आपल्या ताब्यात ठेवतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यानंतर भाजपच्या कोट्यातून खासदारकी मिळवलेल्या राणे यांची जिल्ह्यात आता पहिल्यासारखी एकतर्फी ताकद राहिली नाही. यापूर्वी राजकारणात राणेंच्या विरोधात कोणी उघडपणे बोलण्यास तयार नव्हता किंवा बंडखोरीचा विचारही केला जात नसे. गेल्या काही दिवसात त्यांचे विरोधकही खुले आव्हान देताना दिसत आहेत.

काल (ता. ५) झालेल्या सावंतवाडी पंचायत उपसभापती पदाच्या निवडणुकीत याचे संकेत बघायला मिळाले. याठिकाणी नारायण राणे देतील तो उमेदवार स्वीकारला जाईल अशी शक्‍यता होती. त्यानुसार महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे संदीप नेमळेकर यांचे नाव चर्चेत होते; परंतु आयत्या वेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संधान साधून त्याठिकाणी राणे समर्थकामधील मनीषा गोवेकर यांना उमेदवारी दिली.

दुसरीकडे हात या निशाणीवर निवडून आलेल्या अकराही सदस्यांना काँग्रेसने व्हीप बजावण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यातील सदस्य गौरी पावसकर यांनी व्हीप स्वीकारल्यामुळे त्यांची अडचण झाली; मात्र निवडणुकीवेळी त्या अनुपस्थित राहिल्या. त्या आजारी असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत नऊ विरुद्ध ८ असे मतदान घेऊन महाराष्ट्र स्वाभिमानच्या नेमळेकर यांना उपसभापतीपदी संधी मिळाली.

यात स्वाभिमान विरोधात एकवटलेल्यांचा पराभव झाला असला तरी ‘ये तो शुरूवात है’ असे सांगून आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीला आपण आव्हान देणार असल्याचे संकेत काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते जयेंद्र परूळेकर यांनी दिले. त्यामुळे आता आगामी काळात होणाऱ्या स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नारायण राणेंविरुद्ध सर्व अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. या आव्हानांना राणे कसे काय तोंड देतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

स्वाभिमानने घेतली ‘रिस्क’
उपसभापती निवडणुकीत पक्षाकडून व्हीप बजावण्यात आल्यामुळे काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले उमेदवार अडचणीत आले आहेत. व्हाट्‌सअपवर पाठवलेला मेसेज किंवा इलेक्‍ट्रॉनिक मिडीयावर आलेली बातमी व्हीप म्हणून स्वीकारता येऊ शकते, असा नियम असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. यामुळे सर्व सदस्यांच्या मनात धास्ती आहे. तरीही रिस्क घेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी ९ सदस्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याच्या सूचना केल्या; परंतु काँग्रेसच्या दाव्यानुसार या सदस्यांना अडचण होणार असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.