अलिबाग : रायगड जिल्ह्यात भातकापणी आणि मळणीची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे सरकारने तातडीने हमीभाव भात खरेदी केंद्रे सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून आठवडाभरात जिल्ह्यात टप्प्या-टप्प्याने २४ भात खरेदी केंद्रे सुरू होणार आहेत. केंद्रावर भाताला एक हजार ९४० रुपये भाव मिळणार आहे. यामुळे दिवाळी आधीच शेतकऱ्यांची दिवाळी होणार आहे. गेल्या वर्षी भाताला प्रतिक्विंटल एक हजार ८६८ रुपये भाव मिळाला होता.
मजुरांअभावी यंदा भाताचे भारे घरात न आणता शेतातच झोडणी करून भाताची परस्पर विक्री करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. मात्र भात खरेदी केंद्रे सुरू न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी ती सुरू करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून पुढील आठवड्यापासून भातखरेदी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनने दिली. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सरकारने या वर्षासाठी सर्वसाधारण दर्जाच्या भाताला प्रतिक्विंटल एक हजार ९४० रुपये हमीभाव जाहीर केला आहे.
गतवर्षी भातासाठी १,८६८ रुपये हमीभाव आणि ७०० रुपये बोनस असे एकूण दोन हजार ५६८ रुपये दर शेतकऱ्यांना देण्यात आला. यात ‘अ’ दर्जाच्या भाताच्या किमतीत साधारण २० रुपयांचा फरक असणार आहे. तसेच यावर्षीही सरकारकडून अतिरिक्त दिल्या जाणाऱ्या बोनसची रक्कमदेखील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
ज्या शेतकऱ्यांना भाताची विक्री सरकारी खरेदी केंद्रावर करायची आहे, त्या शेतकऱ्यांची खरेदी केंद्रावर आगाऊ ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. गेल्या वर्षी विक्रमी भातखरेदी रायगड जिल्ह्यात दोन लाख ३० हजार क्विंटल इतकी विक्रमी भाताची खरेदी २०१८ मध्ये झाली होती. हा विक्रम मागील वर्षी मोडीत निघाला असून एका वर्षात तब्बल ४ लाख १० हजार क्विंटल भात खरेदी महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून झाली.
समाधानकारक पाऊस आणि लॉकडाऊनमध्ये गावाकडे आलेल्या शेतकऱ्यांनी शेतीकडे अधिक लक्ष दिल्याने उत्पादनात वाढ झालेली असावी, अशी विविध कारणे दिली जात आहेत. या वर्षीच्या खरिपात भातपिकाचे अधिक उत्पादन मिळणार नसल्याचे येथील शेतकऱ्याचे म्हणणे आहे.
खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश सरकारकडून प्राप्त झाले आहेत. विक्रीसाठी पाठवलेल्या भाताची आर्द्रता किती असावी, वाहतूक, विक्री पद्धत या संदर्भातील माहिती सहकारी संस्थांना देण्यात आलेली आहे.
- के. टी. ताटे, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी
उत्पादन खर्च कमीत कमी करण्यासाठी झोडणीनंतर भात घरी न आणता तो परस्पर विकण्याचा प्रयत्न असतो. यासाठी लवकरात लवकर खरेदी केंद्र सुरू होणे आवश्यक आहेत. हळव्या जातीचे भातपीक तयार झालेले आहे.
- शांताराम पाटील, प्रयोगशील शेतकरी, अलिबाग
रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये भात कापणी सुरू आहे. त्या ठिकाणाहून अहवालानुसार दरहेक्टरी १२ ते १५ क्विंटल हेक्टर भाताचे पीक मिळत आहे.
- उज्ज्वला बाणखेळे, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.