मंडणगड : रायगड-रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा आंबेत पूल दुरुस्तीच्या कामानंतर सहा महिन्यांतच पुन्हा पूर्णतः बंद करण्यात आला. यानंतर विविध माध्यमांतून शासन, लोकप्रतिनिधी, संबंधित विभाग यांच्यावर टीकाटिपण्णी सुरू झाली आहे. पाण्याच्या बाह्य बाजूची पुलाची दुरुस्ती व जेटीसाठी सुमारे १० कोटींचा खर्च केला आहे. आता पाण्यातीलच पिलर धोकादायक झाल्याने अजून १० कोटींची गरज निर्माण झाली आहे तसेच नवीन पुलाच्या निर्मितीसाठी १३० कोटींची आवश्यकता व्यक्त झाली आहे.
कोकणच्या दळणवळणात महत्वाचा दुवा असणारा हा पूल मंडणगड, दापोलीकरांच्या जिव्हाळ्याचा आणि आयुष्याचा भाग बनून गेला आहे. परिणामी त्यावर प्रचंड चर्चा सुरू आहे. अनेक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या या पुलाचे ३० डिसेंबर १९७२ ला बांधकाम सुरू झाले. १६ फेब्रुवारी १९७८ ला सहा वर्षांत बांधून पूर्ण करण्यात आला. त्याला काल (ता. १६) बरोबर ४५ वर्षे पूर्ण झाली. कोकणातील दळणवळण वाढण्याच्यादृष्टीने दूरदृष्टीचा विचार करून या पुलाची बांधणी करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.
पुलाचा पायाभरणी समारंभ ९ एप्रिल १९७३ ला तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते व मत्स्य व्यवसायमंत्री बॅ. ए.आर. अंतुले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी अंतुले यांनी आग्रही भूमिका घेतली होती. पुलाची बांधणी व संकल्प चित्र मेसर्स एस. बी. जोशी आणि कंपनी मुंबई यांनी केले. अनेक अडचणी, अडथळ्यांची शर्यत पार करीत उभारणी करण्यात आलेला हा पूल वैशिष्ट्यपूर्ण आहे. पुलाची लांबी - ३७६ मीटर असून त्याला ४८. २२ मीटर ते ५५. ८९ मीटर असे एकूण ७ गाळे आहेत. पुलावरील रस्त्याची रुंदी ७. ५० मीटर आहे. पायापासून रस्त्यापर्यंत अधिकतम उंची ३०. ४९७ मीटर असून पाण्याची सर्वाधिक खोली ११. ८६ मीटर आहे.
जलवाहतुकीसाठी ८.८४ मीटर उंच व ४०. ५० मीटर रुंद एक गाळा ठेवला आहे. पाया ०. ९१ मीटर जाडीच्या, ४.५७ मीटर अंतर्गत व्यासाच्या सलोह काँक्रिटच्या खडकावर टेकलेल्या विहिरी बांधण्यात आल्या आहेत. भरीव सलोह काँक्रिटचे खांब असून वरती सलोह काँक्रिटच्या हॅमरहेडवर ४१. ५६ मीटर लांबीच्या दोन प्रिस्ट्स्ड तुळ्या बसवण्यात आल्या आहेत.
आंबेत पुलाची बांधणी ही अत्यंत कठीण प्रतिकूल परिस्थितीत करण्यात आली. पाचव्या पिलरच्या ठिकाणी पाण्याचा मोठा भोवरा आहे. या ठिकाणी पिलर उभा करणे फारच कठीण होते. आंबेत पुलाची बांधणी सुरू असताना मी आठ महिने प्रत्यक्ष ठिकाणी काम केले आहे. तसेच बोटीने जाताना पुढे जाऊन वळसा मारून पुन्हा मागे यावे लागत असे.
-अशोक महाजन, कोंझर
एक नजर..
उच्चतम भरतीची समुद्रसपाटीपासून उंचीः १. ४३१ मीटर
नीचतम ओहोटीची उंचीः २. ५१९ मीटर
पुलाच्या बांधकामाचा खर्चः ६२ लाख ९० हजार
जोडरस्त्यासाठी खर्चः ५ लाख १६ हजार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.