Angarki Chaturthi : गणपतीपुळेत भाविकांची अलोट गर्दी; तब्बल 70 हजार जणांनी घेतलं दर्शन, किनाऱ्यावर प्रवेश बंदी

अंगारकीनिमित्त मुख्य पुजाऱ्‍यांनी गणपतीपुळेतील (Ganpatipule Temple) श्रींच्या मूर्तीसमोर पुष्पमालांची आरास केलेली होती.
Ganpatipule Temple Ratnagiri
Ganpatipule Temple Ratnagiriesakal
Updated on
Summary

समुद्राला उधाण असल्यामुळे किनाऱ्‍यावर जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. पोलिसांसह ग्रामपंचायतीने नेमलेले जीवरक्षक दिवसभर तैनात होते.

रत्नागिरी : दीड वर्षांनी आलेल्या अंगारकी चतुर्थीच्या (Angarki Chaturthi) मुहूर्तावर गणपतीपुळे येथील श्रींच्या दर्शनासाठी काल (ता. २५) प्रचंड गर्दी झाली होती. सकाळपासून संततधार पावसातही भक्तगण दर्शनरांगेमध्ये उभे होते. दिवसभरात सुमारे ७० हजार भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले. मुसळधार पाऊस, वेगवान वारे यामुळे समुद्र खवळलेला असल्याने पर्यटकांना किनाऱ्यावर जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे पर्यटकांची पाऊले आपसूकच हॉटेल, दुकानांकडे वळलेली होती.

अंगारकीनिमित्त मुख्य पुजाऱ्‍यांनी गणपतीपुळेतील (Ganpatipule Temple) श्रींच्या मूर्तीसमोर पुष्पमालांची आरास केलेली होती. पहाटेला पूजा आटोपल्यानंतर साडेपाच वाजण्याच्या सुमारास दर्शनाला सुरुवात झाली. कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगावसह मुंबई, पुण्यातील भक्तगण काल मध्यरात्रीपासून गणपतीपुळेत दाखल होण्यास सुरुवात झाली. सुमारे पाचशेंहून अधिक भक्तगण पहाटेला दर्शन रांगेत उभे होते.

Ganpatipule Temple Ratnagiri
Angarki Chaturthi : गणपतीपुळेला जात असाल, तर ही बातमी महत्त्वाची; समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांना असणार बंदी, काय आहे कारण?

काहींनी देवस्थानच्या निवास व्यवस्थेचा तर काहींनी हॉटेल-लॉजिंगचा आधार घेतलेला होता. कालपासूनच रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी सकाळपासून संततधार सुरूच होती. त्यामुळे गर्दी कमी होईल, अशी अपेक्षा होती; परंतु दर्शनरागांमधील जागा मोकळी राहिलेली नव्हती. दुपारी अर्धा तास मंदिर बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा दर्शनासाठी लोकांची गर्दी सुरू झाली.

मंदिरात श्रींचे दर्शन घेतल्यानंतर भक्त थेट दुकानांमध्ये खरेदीसाठी जात होते. दुपारी ३ वाजेपर्यंत ४० हजार लोकांनी दर्शन घेतल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानंतर पुढे रात्री मंदिर बंद होईपर्यंत हा आकडा ७० हजारांवर जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अंगारकी उत्सवानिमित्त संस्थान श्रीदेव गणपतीपुळेच्यावतीने सायंकाळी साडेचार वाजता स्वयंभू श्रींची पालखी मिरवणूक मंदिर प्रदक्षिणामार्गे ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत काढण्यात आली. या मिरवणुकीत देवस्थान समितीचे सरपंच डॉ. श्रीराम केळकर, मुख्य पुजारी यांच्यासह सर्व पंच आणि भक्तगण सहभागी झाले होते. पाऊस असतानाही या मिरवणुकीत भक्तांचा सहभाग उल्लेखनीय होता.

Ganpatipule Temple Ratnagiri
Ashadhi Wari : आषाढी वारीसाठी ओतूरच्या चैतन्य महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रयाण; यंदा पालखी सोहळ्याचे हे तब्बल 64 वे वर्ष

समुद्राला उधाण असल्यामुळे किनाऱ्‍यावर जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. पोलिसांसह ग्रामपंचायतीने नेमलेले जीवरक्षक दिवसभर तैनात होते. किनाऱ्‍यावर कोणीही जाऊ नये यासाठी दोरी बांधण्यात आली होती तसेच कोणीही जाण्याचा आग्रह धरलाच तर त्याला मनाई केली जात होती. अंगारकीसाठी परजिल्ह्यातील सुमारे वीसहून अधिक व्यावसायिकांनी स्टॉल लावले होते. स्थानिकांचे पंचवीसहून अधिक स्टॉल यात्रेच्या ठिकाणी होते. सध्या पावसामुळे पर्यटन हंगाम संपुष्टात आला आहे. त्यामुळे यंदाची अंगारकी व्यावसायिकांच्या पथ्थ्यावर पडली आहे. दिवसभरात साधारणपणे सुमारे एक कोटीच्या घरात उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

पाऊस असतानाही भाविकांनी आज गणपतीपुळे येथे हजेरी लावली. काल मध्यरात्रीपासून भाविकांची येथे येण्यास सुरुवात झाली. लॉजिंगसाठी कमी प्रतिसाद लाभला; मात्र अंगारकीच्या दिवशी दिवसभर ग्राहकांचा राबता होता.

-भालचंद्र नलावडे, गणपतीपुळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.