''अरेबियन सी हम्पबॅक व्हेल'' हा अरबी समुद्रात आढळणारा दुर्मिळ सागरी सस्तन प्राणी आहे.
हर्णे : दापोली तालुक्यातील हर्णे बंदरासमोरील (Harnai Port Dapoli) सागरी परिक्षेत्र हे ‘अरेबियन सी हम्पबॅक व्हेल’चे (Whale Fish) हॉटस्पॉट असल्याची नोंद भारतीय वन्यजीव संस्थेने (Wildlife Institute of India, WII) केली आहे. संस्थेच्या शास्त्रज्ञांनी मच्छीमारांच्या मदतीने केलेल्या सर्वेक्षणाअंती हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या हॉटस्पॉटच्या ठिकाणी लवकर शास्त्रज्ञांकडून व्हेलचा ‘अकूस्टिक’ म्हणजेच ध्वनिविषयक अभ्यासाला सुरुवात होणार आहे.
प्राण्यांना असणारे धोके हे या सर्वेक्षणाचे प्राथमिक लक्ष होते. यामध्ये हम्पबॅक व्हेल वारंवार दिसल्याच्या ठिकाणी त्यांचे हॉटस्पॉट निश्चित करण्यात आले. महाराष्ट्रातील डहाणू, ससून बंदर, बोर्ली, हर्णे, वेलदूर आणि तारकर्ली या सहा प्रमुख बंदरांवर सर्वेक्षण झाले. यामध्ये ४०० मच्छीमारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
यामध्ये हर्णे बंदराचे सागरी परिक्षेत्र ‘अरेबियन सी हम्पबॅक व्हेल’चे हॉटस्पॉट असल्यावर संशोधकांनी शिक्कामोर्तब केले आहे. या ठिकाणी उन्हाळा आणि हिवाळ्यात हम्पबॅक व्हेल दिसत असल्याची माहिती मच्छीमारांनी संशोधकांना दिली. कोकण किनारपट्टीवरील उत्तरेच्या सागरी परिक्षेत्रामध्ये या सागरी सस्तन प्राण्यांना सर्वात जास्त पाहिले गेल्याचे निरीक्षण संशोधकांनी सर्वेक्षणाअंती नोंदवले आहे.
त्यामुळे कोकण किनारपट्टीचे उत्तरेकडील सागरी परिक्षेत्र हे हम्पबॅक व्हेलसाठी महत्त्वाचे स्थान बनले आहे. बहुतांशवेळा हे सागरी सस्तन प्राणी तारली, मांदेली आणि कोळंबींच्या थव्याबरोबर दिसल्याची नोंद करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात अत्याधुनिक मशिनरीच्या साह्याने अभ्यास केला जाणार असून, त्यामध्ये व्हेलची निश्चित संख्याही नोंदली जाणार आहे. या संशोधनामध्ये ''अरेबियन सी हम्पबॅक व्हेल''च्या पूर्वीच्या नोंदी, किनाऱ्यावर वाहून आल्याच्या नोंदी, मासेमारीच्या नोंदी यांचा आढावा घेण्यात आला आहे.
त्यापुढे जाऊन मच्छीमारांच्या मुलाखती घेऊन अंतिम सर्वेक्षण करण्यात आले आहे. गुजरात ते केरळ या समुद्र परिसरात अभ्यास सुरू आहे. गेले दोन दिवस कन्याकुमारी येथे हे पथक अभ्यास करत आहे. हम्पबॅक व्हेलचे निरीक्षण, त्यांची वावरण्याची ठिकाणे यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.
''अरेबियन सी हम्पबॅक व्हेल'' हा अरबी समुद्रात आढळणारा दुर्मिळ सागरी सस्तन प्राणी आहे. भारत, पाकिस्तान, ओमान, इराण, इराक, कतार, अरब राष्ट्र, येमन आणि कुवेत या देशांच्या सागरी परीक्षेत्रामध्ये त्याचा अधिवास आढळतो. ''आययूसीएन''ने या प्राण्याची ''संकटग्रस्त'' प्रजातींच्या यादीत नोंद केली आहे. याच हॅम्पबॅक व्हेलचा भारतीय समुद्रातील अधिवास अभ्यासण्यासाठी देशाच्या किनारपट्टी भागात ''डब्लूआयआय''कडून संशोधन प्रकल्प राबविण्यात येत आहे. ''डब्लूआयआय''चे संचालक विरेंद्र तिवारी यांच्या मार्गदर्शनांतर्गत संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. जे. ए. जॉन्सन यांच्या मार्गदर्शनात संशोधकाचे पथक काम करत आहेत.
हॉटस्पॉटच्या ठिकाणी हम्पबॅक व्हेलच्या आवाजांची नोंद करण्यासाठी लवकरच ध्वनी निरीक्षण उपकरणांचा वापर करून अभ्यासाला सुरुवात होणार आहे. व्हेलची ही प्रजात मार्ग आणि अन्न शोधताना किंवा इतरांशी संवाद साधताना कोणत्या प्रकारचे आवाज काढते याची नोंद होणार आहे. या आवाजांचे रेकॉर्डिंग आणि त्याचे विश्लेषण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या जिवांच्या हालचाली आणि त्यांचे वर्तन समजून घेण्यात येईल.
-डॉ. जे. ए. जॉन्सन, शास्त्रज्ञ, डब्लूआयआय
‘डब्ल्यूआयआय’च्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास केला जात आहे. त्यामधून निश्चितच उपयुक्त अशी माहिती पुढे येत आहे. हा अभ्यास या सागरी सस्तन प्राण्याचे संवर्धनात्मक धोरण राबवण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
-वीरेंद्र तिवारी, संचालक भारतीय वन्यजीव संस्थान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.