रत्नागिरी : १५ गावांमध्ये बांबू लागवडीच्या सूचना

भूस्खलन टाळण्यासाठी सर्वेक्षणानंतर उपाय; १९ ठिकाणी निवारा केंद्रे
Ratnagiri Latest Marathi News
Ratnagiri Latest Marathi News sakal
Updated on

रत्नागिरी - मागील पावसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर आणि भूस्खलनाचे प्रकार कोकणातील प्रामुख्याने चिपळूण, खेड, राजापूर व संगमेश्वर तालुक्यात झाले. याचा अभ्यास करून भूवैज्ञानिकांनी काही उपाययोजना सुचविल्या आहेत. पावसाळ्यातील धोका टाळण्यासाठी १५ गावांमध्ये बांबू लागवड तर १९ ठिकाणी निवारा केंद्रे उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत. गतवर्षी २२ जुलैच्या अतिवृष्टीत चिपळूण शहरासह परिसराला महापुराने विळखा घातला होता. कोट्यवधीच्या हानी झाली. त्यामधून बाधित कुटुंबे सावरली असली तरी भविष्यात पुराची धास्ती कायम राहिली आहे. अतिवृष्टीत पेढे कुंभारवाडीसह पूर्व विभागातील दसपटी विभागात भूस्खलन झाले होते. त्यामुळे डोंगरच्या डोंगर खाली कोसळण्याची भीती होती. याबाबत तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण पथकाने सर्वेक्षण केले होते. २०१५-१६ व २०१६-१७ या आर्थिक वर्षातील अहवालानुसार गोवळकोटमधील तीस घरांचे पुनर्वसन कापसाळमधील शासकीय जागेत करावे अशी सूचना केली होती. चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील तिवरे, ओवळी, नांदीवसे, कोळकेवाडी आदी १९ ठिकाणी पावसाळ्याच्या कालावधीत आपत्तीचा धोका आहे. त्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर निवारा केंद्रे उभारण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला केल्या आहेत. १५ गावांत तीव्र डोंगर उतारावर बांबूची लागवड करावी लागणार आहे. अतिवृष्टीत दसपटीत अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. येत्या पावसाळ्यात पुन्हा तेथे आपत्तीची शक्यता आहे. भूवैज्ञानिकांनी ३५ ठिकाणांच्या डोंगर उतारावर संरक्षक भिंत, नाल्याचे खोलीकरण करा असे सूचित केले आहे. तशा सूचना जिल्हा परिषद बांधकाम विभागाला दिल्या असून, अंदाजपत्रक तयार करण्यास सांगण्यात आले आहे. (Ratnagiri Latest Marathi News)

एक नजर...

डोंगर उतारावर भिंत, नाल्याचे खोलीकरण होणार : ३५ ठिकाणे

दसपटीतील ११ ग्रामपंचायत हद्दीत सर्वेक्षण : ३७ ठिकाणे

तीव्र डोंगर उतारावर बांबूची लागवड होणार : १५ गांवे

दोन शाळांचे पुनर्वसन

अतिवृष्टीत तिवडी व कोळकेवाडी येथील जिल्हा परिषद शाळांनाही फटका बसला आहे. आगामी काळातही या शाळांना धोका असल्याने तिवडी राळेवाडी व कोळकेवाडी माच धनगरवाडी या जिल्हा परिषद शाळा स्थलांतरित करण्याच्या सूचना भूवैज्ञानिकांनी दिल्या आहेत. त्यानुसार चिपळूण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्‍यांना या दोन्ही शाळा स्थलांतरित करण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.