तांडेलला डुलकी आली आणि बोटीच्या स्टेअरिंगची साखळी तुटल्याने बोट थेट डोंगराच्या कडेला असलेल्या खडकावर जाऊन अडकली.
गुहागर : तालुक्यातील बोऱ्या बंदरावर विसावायला जाणारी हर्णै बंदरातील समुद्रात मच्छीमारीसाठी आलेली बोट तांडेलला आलेल्या डुलकीमुळे खडकावर चढून अडकली. सुदैवाने, मोठी दुर्घटना घडली नाही. बोटीसह तांडेल, खलाशी असे सातहीजण सुखरूप आहेत. ही घटना गुहागर तालुक्यातील बोऱ्या समुद्रकिनारी देवीच्या डोंगरालगत बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
गुरुवारी दिवसभर बोट काढण्याच्या प्रयत्नाला यश आलेले नाही; मात्र बोटीमधील इंजिन काढण्यात आले असून यामध्ये सुमारे ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाले आहे. दापोली तालुक्यातील हर्णै येथील हरेश वासुदेव कुलाबकर यांच्या मालकीची जानकी इंडिया महाराष्ट्र ४ एमएम १६६९ ही मच्छीमार बोट आहे. बुधवारी रात्री हर्णै बंदरातून गुहागरच्या समुद्रामध्ये जोराच्या वाऱ्यामुळे बोऱ्या बंदरात विसावण्यासाठी येत होती.
बोटीवर नरेश पालेकर हे तांडेल तर ७ खलाशी होते. समुद्रातून बोट बोऱ्या बंदरात आणताना देवीच्या डोंगराच्या बाजूने आणावी लागते. त्याप्रमाणे बोट आणत असताना तांडेलला डुलकी आली आणि बोटीच्या स्टेअरिंगची साखळी तुटल्याने बोट थेट डोंगराच्या कडेला असलेल्या खडकावर जाऊन अडकली. या वेळी सुरू असलेल्या भरतीमुळे बोट थेट खडकावर जाऊन अडकली. भरतीमुळे खडकाचा दणका बसला नाही. यामुळे बोट लगेच फुटली नाही. याचा फायदा घेत प्रसंगावधान राखून तांडेलसह ७ खलाशी सुखरूप खडकावर उतरले.
या घटनेची खबर गुहागरचे मत्स्य परवाना अधिकारी स्वप्नील चव्हाण यांना मिळताच त्या ठिकाणी सागरी सुरक्षारक्षक रवाना केले. तसेच गुरुवारी दिवसभर खडकात अडकलेली ही बोट काढण्याचा प्रयत्न सुरू होते; मात्र त्याला यश आले नाही. खडकावर आदळलेली ही बोट निकामी झाली असून बोटीतील इंजिन काढण्यात आले आहे. बोटमालकाचे सुमारे ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.