बिघडले काजूचे अर्थकारण

सातत्याने प्रतिकूल राहीलेले वातावरण, अवकाळी पाऊस, वाढते तापमान, रोग-किडींचा प्रादुर्भाव आदी विविध कारणामुळे नैसर्गिक स्थितीवर अवलंबून असलेल्या काजूचे यावर्षी उत्पादन घटल्याचे चित्र
cashew producers farmers finance crisis rate agriculture
cashew producers farmers finance crisis rate agricultureSakal
Updated on

सातत्याने प्रतिकूल राहीलेले वातावरण, अवकाळी पाऊस, वाढते तापमान, रोग-किडींचा प्रादुर्भाव आदी विविध कारणामुळे नैसर्गिक स्थितीवर अवलंबून असलेल्या काजूचे यावर्षी उत्पादन घटल्याचे चित्र आहे.

तर, दुसर्‍या बाजूला सुक्या काजू बी खरेदीच्या घसरलेल्या दराने काजू उत्पादन शेतकरी, बागायतदारांची चिंता वाढविली आहे. त्यातून, खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसत नसल्याने दरवर्षी कोट्यावधी रूपयांची उलाढाल करणारे आणि शेतकरी, बागायदारांना हक्काचे उत्पन्न मिळवून देणार्‍या काजूचे अर्थकारण बिघडून गेले आहे.

बिघडलेल्या या अर्थकारणातून सावरायचे कसे ? असा प्रश्‍न काजू शेतकरी, बागायतदारांना भेडसावू लागला आहे. त्यातून, प्रक्रीया उद्योग निर्मितीसह अन्य पिकांप्रमाणे काजूला शासनाकडून योग्य त्या हमीभावाची शेतकर्‍यांना अपेक्षा आहे. पुरवठा अधिक, दर कमी, पुरवठा कमी, दर अधिक या बाजाराच्या तत्वाला काजू उत्पादन व्यवसाय उतरलेला नाही. कारण, उत्पादन कमी असतानाही दर कमी अशी बाजाराची स्थिती राहिली आहे.

- राजेंद्र बाईत, राजापूर

असा असतो सर्वसाधारण दराचा अंदाज

ज्यावेळी उत्पादन जास्त असते त्यावेळी कमी आणि उत्पादन कमी असते त्यावेळी दरात वाढ होते असे सर्वसाधारण आर्थिक गणित मांडले जाते. परंतु, यावर्षी काजूच्या उत्पादनात प्रचंड घट झालेली असून सरासरी 40 ते 45 टक्के उत्पादन आलेले आहे.

अशा स्थितीमध्ये सुक्या काजू विक्रीला तुलनेने जादा दर मिळेल असा आशावाद शेतकर्‍यांकडून वर्तविला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात पाहता गतवर्षीप्रमाणे यावर्षीही काजू बी खरेदीच्या दरामध्ये कमालीची घसरण झालेली दिसत आहे. त्यामुळे बिघडलेले अर्थकारण बागायतदारांना चक्रावून टाकणारे आहे.

वाढता मशागत अन् व्यवस्थापन खर्च

सातत्याने राहणारे प्रतिकूल वातावरण, त्यामध्ये अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, वाढते तापमान, किडींचा प्रादुर्भाव याची मिळणारी साथ आदींमुळे काजू पिकासाठी शेतकरी वा बागायतदारांना सातत्याने उपाययोजनांवर खर्च करावा लागतो.

त्यामध्ये खतांची मात्रा, औषध फवारणी यांसारख्या खर्चासह पुरेशा मनुष्यबळाअभावी येणार्‍या अतिरिक्त खर्चाचा समावेश आहे. याच्यातून, काजू पिकाच्या मशागतीसह व्यवस्थापनाचा कमालीचा खर्च वाढतो. त्या तुलनेमध्ये उत्पन्न खूप कमी मिळते. त्यामुळे खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसविताना शेतकर्‍यांना तारेवरची कसरत करावी लागते.

दरातील चढ-उतार

शेतीसह फलोत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ घेत अनेक शेतकर्‍यांनी फळबागा विकसित केल्या आहेत. त्याच्यातून जिल्ह्यातील दरवर्षी काजू लागवडीखालील क्षेत्रामध्ये वाढच होत चालली आहे.

त्याच्यातून उत्पादीत होणार्‍या काजू बीला खर्च आणि सरासरी पन्नास टक्के नफ्याचा विचार करता सरासरी शेतकर्‍यांना प्रतिकिलो 170 ते 180 रूपये भाव मिळणे अपेक्षित आहे. मात्र, सद्यस्थितीमध्ये काजू बीचा भाव 120-125 रूपये प्रतिकिलो दराभोवत घुटमळताना दिसत आहे. या दरामध्ये वाढ होणे अपेक्षित असताना मात्र, त्याच्यामध्ये घसरणच जास्त होताना दिसत आहे. कमी-जास्त होणार्‍या दराने शेतकर्‍यांच्या अपेक्षांवर पाणी पेरल्याचे चित्र आहे.

परदेशी काजू आयातीचा प्रतिकूल

परीणाम विविध प्रक्रीया उद्योगांसाठी काजूगरांना मोठ्याप्रमाणात मागणी असते. काजूवरील तुलनात्मकदृष्ट्या कमी असलेले आयात कर आणि अन्य करांमुळे परदेशातून आयात करण्यात येणार्‍या काजूचा दर देशातील काजूच्या तुलनेमध्ये कमी असतो.

त्यामुळे नफ्याचे गणित डोळ्यासमोर ठेवून प्रक्रीया उद्योग करणार्‍या कंपन्यांकडून सिंगापूर, आफ्रीका, ब्राझील, व्हिएतनाम आदी देशांमधून मोठ्याप्रमाणात काजू बी भारतामध्ये आयात केली जाते. याचा प्रतिकूल परिणाम देशी काजू बीच्या खरेदी दरावर होताना दिसत आहे.

ओले काजूगरांची जादा मागणीसोबत उलाढाल

सुक्या काजू बीच्या गेल्या काही वर्षामध्ये घसरलेल्या दराने शेतकर्‍यांचे अर्थकारण बिघडून गेले आहे. अशा स्थितीमध्ये जादा मागणी आणि तुलनेने जादा असलेल्या ओले काजूगरांच्या विक्रीने शेतकर्‍यांना आर्थिक हात मिळवून दिला आहे.

चविष्ठ, रूचकर असलेल्या ओले काजूगरांना मुंबई, पुणे या मोठ्या शहरांसह दिल्ली, बेंगलोर आदी राज्यांमध्ये मोठ्याप्रमाणात मागणी आहे. ओले काजूगरांना पाचशेपासून थेट एक हजार ते बाराशे-पंधराशे रूपये प्रतिकिलो दराने विक्री होताना दिसत आहे. त्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षामध्ये सुक्या काजू बी विकण्याऐवजी शेतकर्‍यांनी ओले काजूगर काढून त्याची विक्री करण्यावर भर दिल्याचे चित्र दिसत आहे.

असे आहे ओले काजूगराचे अर्थकारण

सुक्या काजू बीच्या एक किलोमध्ये सरासरी 180 ते 250 बियांचा समावेश असतो. गेल्या काही वर्षामध्ये सुक्या काजू बियांना मिळालेल्या प्रतिकिलो सरासरी दराचा विचार करता एक सुकी काजू बीची किंमत सरासरी 57-90-120 पैसे ठरताना दिसते.

दुसर्‍या बाजूला ओल्या काजूंचा विचार करता साधारणतः 280 ते 360 ओल्या काजू बी फोडल्यानंतर त्याच्यातून एक किलो एवढे ओले काजूगर मिळतात. ओल्या काजूगराला मागणीप्रमाणे मिळणार्‍या दराचा विचार करता एका काजूगराला सरासरी 2 ते 4 रूपये भाव मिळताना दिसतो. तुलनात्मकदृष्ट्या विचार करता सुक्या काजू बियांच्या दराच्या तुलनेमध्ये ओल्या काजू गरांना मिळणारा दर जास्त दिसत आहे.

वन्यप्राण्यांकडून काजूचे नुकसान

सुकलेल्या काजू बिया झाडाचा बुंधा वा परिसरामध्ये जमिनीवर पडलेल्या असतात. रात्रीच्यावेळी मुक्तसंचार करणार्‍या साळींदरसारख्या प्राण्यांकडून या काजू बिया फोडून त्यातील काजूगर फस्त केला जातो. याद्वारे होणार्‍या नुकसानीचे प्रमाण वरकरणी हाताच्या बोटावर मोजण्याइतके दिसत असले तरी,

त्याचा आर्थिक फटका शेतकरी, बागायतदार यांना सहन करावा लागतो. त्याचवेळी गवा रेड्यांच्या कळपांकडूनही उभ्या असलेल्या काजूच्या झाडांची मोडून-तोडून नासधूस केली जाते. गेल्या काही वर्षामध्ये गवा रेड्यांकडून होणार्‍या या त्रासाच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे.

प्रक्रीया उद्योग शून्य

गेल्या काही वर्षामध्ये काजू लागवडीखालील आणि काजू उत्पादीत क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. त्यातून, मोठ्याप्रमाणात काजू बोंडांची निर्मिती होत आहे. मात्र, काजू बोंडावर प्रक्रीया उद्योग नसल्याने दरवर्षी हंगामामध्ये निर्माण होणारे लाखो टन काजूबोंड हे मातीमोल होत आहे. काजू बोंडावर प्रक्रीया करून विविध उत्पादनांची निर्मिती झाली असती तर,

त्याच्यातून रोजगार निर्मिती आणि शेतकर्‍यांना आर्थिक समृद्धीही साधता आली असती. त्याचवेळी कराच्या स्वरूपामध्ये शासनाच्या महसूलातही वाढ झाली असती. मात्र, त्यादृष्टीने सकारात्मक निर्णय वा विचार होताना दिसत नाही. मात्र, भविष्यात काजू बोंडावर प्रक्रीया उद्योग उभारणीवर शासनाने भर द्यावा अशी शेतकर्‍यांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कमी मनुष्यबळाचा फटका

भातशेतीप्रमाणे काजू पिकालाही कमी मनुष्यबळाचा फटका बसत आहे. झाडांना पाणी-खते देणे, औषध फवारणी करणे, काजू बी गोळा करणे, काजू बोंडापासून बी वेगळी करणे यांसह काजू पिकासंबंधित अन्य व्यवस्थापनाची कामे करण्यासाठी मोठ्यासंख्येने मनुष्यबळाची आवश्यकता असते.

मात्र, त्यासाठी शेतकरी वा बागायतदारांच्या अपेक्षेप्रमाणे पुरेसे मनुष्यबळ मिळत नसल्याचा त्याचा फटका बसत आहे. त्याच्यातून, व्यवस्थापन खर्चामध्ये वाढ होवून खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसताना दिसत आहे. एकंदरीत, भातशेती, आंबा पिकासह काजू पिकालाही कमी मनुष्यबळाचा फटका बसताना दिसत आहे.

विविधांगी मशीनची निर्मितीवर संशोधन सुरू

लांजा येथील प्रगतशील शेतकरी अमर खामकर शेती क्षेत्रातील विविध समस्यांवर मात करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करणारे विविध प्रकारचे संशोधन करीत आहे. त्याचवेळी शेतीतील नाविण्यपूर्ण प्रयोग करीत असून त्या अंतर्गंत त्यांनी काजूची नवीन जात ही विकसित केली आहे.

काजू झाडांच्या खाली पडलेली आणि झाडावर सुकून लगडलेली काजू बी गोळा करण्यासह काजू बोंडापासून बी वेगळी करण्यासाठी कामगारांची आवश्यकता असते. मात्र, त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ मिळत नाही.

मात्र, काजू बोंडापासून बी वेगळी करण्यास उपयुक्त ठरणारी मशीनरी परदेशामध्ये विकसित करण्यात आलेली आहे. ती मशीनरी खरेदी करणे सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या आवाक्याबाहेरची आहे. त्याचवेळी ओल्या काजू बियांपासून सहजपणे काजूगर अलग करणारी अद्ययावत मशीन उपलब्ध नाही.

मात्र, नव्या तंत्रज्ञानाची जोड देणारी तशास्वरूपाची मशीनरी निर्मिती करण्याचे प्रयत्न अमर खामकर यांच्याकडून गेल्या काही वर्षापासून सुरू आहेत. त्यामध्ये त्यांना यश आल्यास व्यवस्थापन खर्चावरील निम्मा भार कमी होण्याचा अंदाज अमर खामकर यांनी वर्तविला आहे.

दृष्टीक्षेपात काजू दर काजू

हंगामाला असलेला दर - 120-125 रूपये सध्या असलेला काजू बी दर ः लहान बी ः 110 रूपये, वेंगुर्ला काजू बी - 120-125 रूपये

  • प्रतिकूल वातावरणाचा काजूला असा फटका

  • मोहोर आणि फळधारणेचे प्रमाण घटले

  • वाढत्या तापमानाचा काजू बीला चटका

  • अवकाळी पाऊस, धुके-ढगाळ वातावरणामुळे भुरी करपा रोगासारख्या अन्य रोगांचा प्रादुर्भाव

  • प्रतिकूल वातावरणामुळे मोहोर काळवंडला, गळती

  • उत्पादनामध्ये घट - सरासरी 40-45 टक्के उत्पादन

काजूच्या संकटाची ही आहेत कारणे

  • प्रतिकूल हवामान, त्यातून, व्यवस्थापन खर्चात दुपटीने वाढ

  • खते, फवारणी औषधांच्या दरामध्ये वाढ मात्र, काजू बी खरेदीच्या दरामध्ये वाढ नाही

  • पुरेशा मनुष्यबळाचा अभावाचा फटका तुलनात्मकदृष्ट्या कमी असलेल्या आयात करामुळे परदेशी कजूचा दर कमी जादा दरामुळे स्थानिक काजूपेक्षा परदेशी काजूला मोठी मागणी मोठ्या कंपन्या आणि घाऊक व्यापार्‍यांकडून विविध कारणे सांगत कमी दराने काजू बी खरेदी

  • अन्य पिकाप्रमाणे अपेक्षित असलेल्या हमीभावाचा अभाव

काय आहेत काजू उत्पादक शेतकर्‍यांच्या मागण्या....

  • अन्य पिकांप्रमाणे काजूचा दरवर्षी हमीभाव निश्‍चित करावा

  • आयात करण्यात येणार्‍या परदेशी काजूवर करवाढ करावी

  • आंब्याप्रमाणे कोकणातील काजूगराला जीआय पॅकींगची सक्ती करावी

  • घाऊक व्यापारी आणि मोठ्या कंपन्यांच्या मनमानीवर नियंत्रण ठेवावे

  • काजू बोंडावरील प्रक्रीया उद्योगांना चालना मिळावी. त्यासाठी शासन अनुदान मिळावे

  • काजू उद्योगाला उपयुक्त ठरणार्‍या विविध मशीनरी निर्मितीवर संशोधन व्हावे उत्तम रोगप्रतिकारशक्ती असणार्‍या आणि भरघोस उत्पन्न देणार्‍या जाती तयार कराव्यात

दृष्टीक्षेपात रत्नागिरी जिल्हा

काजूचे एकूण क्षेत्र ः 1 लाख 10 हजार हेक्टर

काजूचे उत्पादन ः हेक्टरी 3 टन

सरासरी उलाढाल ः 150 कोटी

सरासरी काजू बोंड निर्मिती ः60 टक्के

विजय खांडेकर, शेतकरी

“ प्रतिकूल आणि सातत्याने बदलणार्‍या वातावरणामुळे फळधारणा न झाल्याने आधीच उत्पन्न निम्यावर आले आहे. त्यामध्ये मजूरी, खते, औषधे यांच्या दरांमध्ये झालेल्या वाढीमुळे उत्पादन खर्चामध्ये तिप्पट वाढ झाली आहे. त्या तुलनेमध्ये काजू बी खरेदीला अपेक्षित भावत मिळत नाही. त्यामुळे शासनाने अन्य पिकांप्रमाणे काजूचा हमीभाव निश्‍चित करावा. रोजगार निर्मिती करणार्‍या छोट्या काजू प्रक्रीया उद्योगांना चालना देण्याबाबत सकारात्मक विचार होवून शासनाने धोरण निश्‍चित करावे.”

अमर खामकर, सह्याद्री शेतकरी संघटना, लांजा

“ प्रतिकूल वातावरणाचा फटका बसू आधीच उत्पादन घटलेले असताना मजूरी, खते, औषधे यांच्या दरांमध्ये झालेल्या वाढीमुळे उत्पादन खर्चही वाढला आहे. मात्र, त्या तुलनेमध्यये काजू बी खरेदीला योग्य भाव मिळत नाही. त्यातून, खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बिघडत चालला आहे. काजूच्या आयात करामध्ये झालेल्या कपातीचाही काजू बीच्या खरेदी दरावर प्रतिकूल परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे शासनाने काजूला हमीभाव देताना काजू शेतकरी, उत्पादक, प्रक्रीया उद्योजक यांना आर्थिक पाठबळ मिळेल असा सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. त्याचवेळी काजू उद्योग वा शेतकर्‍यांना उपयुक्त ठरतील अशा कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञानाच्या मशीनरींची निर्मिती होणे गरजेचे आहे. ” .

डॉ. शैलेश शिंदेदेसाई, काजू अभ्यासक

" ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, धुके या नैसर्गिक पर्यावरणीय बदलातून रसशोषक किटकांची मोठ्याप्रमाणात वाढ होवून काजू पिकावर गंभीर परिणाम होत आहे. त्याच्यातून पिकाच्या उत्पादनामध्ये घट होते. मात्र, शेतकर्‍यांनी हवामानातील बदलांचा अभ्यास करून योग्यवेळी योग्यप्रमाणात किटकनाशकांची फवारणी करणे यांसारख्या उपाययोजना करताना सामुहिकरीत्या एकात्मिक किटकनियंत्रणाचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्या माध्यमातून किडींचा प्रादुर्भाव रोखला जावून वा कमी होवून पीक उत्पादन वाढीच्यादृष्टीने त्याचा उपयोग होईल."

जयप्रकाश नारकर, पाचल, राजापूर

" काजू बीला उत्पादन खर्चापेक्षा तुलनेने कमी दर मिळत आहे. त्यातून, शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्याचवेळी चार वर्षापूर्वी केंद्र शासनाने काजू बीच्या आयात करामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यातून, परदेशातून काजू बी आयात करण्याचे प्रमाण वाढल्याने त्याचा स्थानिक काजू बीच्या दरावर परिणाम होताना दिसत आहे. याचा प्राधान्याने विचार होणे गरजेचे आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.