कुडाळ (सिंधुदुर्ग) - कोणत्याही परिस्थितीत 20 जानेवारी 2021 मध्ये चिपी विमानतळ प्रकल्प सुरू करण्याचे टार्गेट आहे. 4 जानेवारीला अलायन्स कंपनीचे पथक याठिकाणी येणार आहे. त्यामुळे 20 जानेवारीपर्यंत या प्रकल्पाला डीजीसीएची परवानगी मिळालीच पाहिजे, त्यादृष्टीने महावितरण व बीएसएनएल विभागाने किरकोळ कामे पूर्ण करून घ्यावीत, अशा सक्त सुचना खासदार विनायक राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पहिले येणारे विमान अलायन्स कंपनीचे 70 सीटचे असेल, असेही त्यांनी सांगितले.
प्रजासत्ताक दिनी चिपी विमानतळ सुरू होण्यासाठी प्रशासकीय पातळीवरुन जोरदार हालचाली सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर खासदार राऊत यांनी बुधवारी सायंकाळी चिपी विमानतळ प्रकल्पाला भेट दिली व परिपूर्ण आढावा घेतला. यावेळी श्री. लोणकर यांनी विमानतळ प्रकल्पाची पूर्ण झालेली यंत्रणा दाखवित पूर्ण क्षमतेने सज्ज असल्याचे सांगितले. यावेळी आमदार वैभव नाईक, आयआरबीचे प्रकल्प अधिकारी राजेश लोणकर, जिल्हा परिषद सदस्य सुनील म्हापणकर, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष शैलेश परब, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, रुची राऊत सचिन देसाई, गणेश तारी, विजय घोलेकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता लोकरे आदी उपस्थित होते.
विमानतळासाठी सद्यस्थितीत 11 केव्ही वीज पुरवठा सुरू केला आहे. भविष्यात आवश्यक असलेल्या 33 केव्ही वीज पुरवठ्यासाठी जागा घेतली असुन तेही काम लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत आहोत, असे महावितरणचे कार्यकारी अभियंता देशमुख यांनी खासदारांना सांगितले. विमानतळ प्रकल्पाला आवश्यक असणारा पाणी पुरवठा कुडाळ येथील बंधाऱ्यातून केला जाईल. आठवड्याभरात जलवाहिनीचे काम सूरू करण्याचे आदेश दिले आहे, असे राऊत म्हणाले. पिंगुळी- पाट ते चिपीकडे येणारा रस्ता सुस्थितीत असावा. याकडे लक्ष वेधताच राऊत यांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना केल्या.
गृहमंत्री देशमुखांशी चर्चा
विमानतळावरील सुरक्षेबाबत गृहखात्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळावी, अशी विनंती राजेश लोणकर यांनी केली. यावेळी खासदार राऊत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी मोबाईलवरुन चर्चा केली व सुरक्षा रक्षक (पोलिस) प्रस्तावास मान्यता मिळावी, अशी विनंती केली. उड्डाण योजना सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीतच सिंधुदुर्ग व रत्नागिरी हे दोन्हीही विमानतळ या योजनेत घेण्यात आले आहेत असे खासदारांनी सांगितले. काही अडचणी आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन खासदारांनी केले.
बीएसएनएल सेवा लवकरच
यावेळी राजेश लोणकर यांनी सांगितले, की इंटरनेटसाठी बीएसएनएलला प्रथम 21 लाख रूपये भरावयाचे होते; पण आता ती रक्कम 24 लाखापर्यंत गेली आहे. गुरुवार पर्यंत ती रक्कम भरली जाईल; मात्र आता बीएसएनएलची कनेक्टीव्हिटी कधीही बंद होऊ नये, याची खबरदारी बीएसएनएलने घ्यावी. यावेळी बीएसएनएलचे अधिकारी श्री. देशमुख यांनी सांगितले, की वेंगुर्ला, म्हापण, परूळे मार्गे कनेक्शन देण्याबाबतची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आयआरबीने पैसे भरताच यंत्रणा कार्यान्वीत करू; पण या ठिकाणी राउटर आवश्यक असल्याने हे काम थोडे उशीरा पूर्ण होईल. त्यानंतर येथील कनेक्टीव्हिटीमध्ये खंड पडणार नाही.
संपादन - राहुल पाटील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.